महेश सरलष्कर

दत्त, दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची साय, सायीचे लोणी, लोण्याचे तूप… यामध्ये केंद्र सरकारने फक्त दत्त आणि दत्ताची गाय या दोघांना वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) चौकटीत आणलेले नाही, बाकी दूध, साय, लोणी, तूप सगळ्या वस्तूंवर ‘जीएसटी’ लागू केला आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना हाणला.

लोकसभेत सोमवारी महागाईवर अल्पकालीन चर्चा झाली. दोन तासांच्या या चर्चेत भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचाही उल्लेख झाला. तृणमूल काँग्रेसच्या कोकीला घोष तसेच, सुप्रिया सुळे यांनी, लोकसभेत स्वराज विरोधी पक्षनेत्या असताना महागाईवर तडाखेबंद बोलत असत असे सांगितले. सुळे यांनी स्वराज यांच्या लोकसभेतील विधानाचा पुनरुच्चार केला. ‘सामान्य माणसाला आकड्याचा खेळ कळत नाही. सामान्य माणसाला त्यांच्या खिशाला किती टाच बसली हे कळते. खिशातून किती पैसे जातात आणि त्या बदल्यामध्ये काय हाती आले हे कळते, असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या’, अशी आठवण सुळे यांनी करून दिली.

हेही वाचा… काँग्रेससह विरोधक राऊतांच्या पाठिशी, राज्यसभेत शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसही निदर्शनांसाठी सभापतींसमोरील हौदात

हेही वाचा… औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्रीची संघटन बांधणी

पेन्सिलसाठी छोट्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. आता पेन्सिवरही ‘जीएसटी’ लागू झालेला आहे, असे सुळे म्हणाल्या. ‘जीएसटी’ परिषदेमध्ये सर्वानुमते निर्णय घेतला गेला असे नेहमीचे उत्तर निर्मला सीतारामन देतील. पण, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना अन्नधान्य आणि अन्य वस्तूंवर ‘जीएसटी’ लागू करू नका, अशी विनंती करणारे पत्र महाविकास आघाडी सरकारने दिले होते. ‘जीएसटी’ परिषदेमध्ये सर्व निर्णय सर्वानुमते होत नाहीत. अन्नधान्यांवरील ‘जीएसटी’ लागू करण्याला कोणी विरोध केला हे सांगितले पाहिजे. नाही तर, राज्यांच्या नावावर निर्णय लादले जातील, अशा शब्दांत केंद्राच्या ‘जीएसटी’ निर्णयांचे वाभाडे सुळे यांनी काढले.

पाहा व्हिडीओ –

बँकेतील सर्व व्यवहारांवर शुल्क आकारले जात आहे. ‘एटीएम’मधून पाचपेक्षा जास्त वेळा पैसै काढल्यास ग्राहकाला त्याचेच पैसे काढण्यासाठी शुल्क भरावे लागते. ‘डेबिट कार्ड’वर वार्षिक शुल्क घेतले जाते, पैसे दुसऱ्या खात्यात जमा करायलाही शुल्क द्यावे लागते, चेकबुक घ्यायलाही शुल्क द्यायचे. ग्राहकाला फक्त बँकेत मोफक जा- ये करता येते, अशी खरडपट्टी सुळेंनी काढली.

केंद्र सरकार आणि भाजपचे नेते सातत्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार असल्याचे सांगत असतात. त्यांचे उत्पन्न खरोखर किती वाढले? शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट होणाऱ्या आश्वासनावर केंद्र सरकारने श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी लोकसभेत केली.

Story img Loader