सांगली :  भाजपचे जेष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष निवडून आलेल्या काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर जाहीरपणे दिली. पक्ष प्रवेशाचे हे खुले आवाहन खुद्द खासदार पाटील यांनी नाकारले असले तरी दादांचा रोख प्रत्यक्ष कुणाकडे आहे याचीच चर्चा सुरू झाली.
चंद्रकांत दादांनी खासदारांना भाजप प्रवेशाचे खुले आमंत्रण दिले जाण्यापुर्वी १२ तास अगोदर  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी माजी मंत्री हर्षवर्धन  पाटील आणि शशिकांत शिंदे यांना सोबत घेउन मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी पक्ष बळकटीबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे स्पष्टपणे सांगितले. यामुळे चंद्रकांत दादांचा कही पे निगाहे, कही पे आणि निशाणा असा प्रकार नव्हे ना अशीच शंका राजकीय वर्तुळात उपस्थित केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

आ. जयंत पाटील यांच्या मुंबईतील वक्तव्यावरून ते भाजप प्रवेशाचा मुहुर्त कधी जाहीर करतात असा सवाल  उपस्थित केला जात होता. मात्र, आ. पाटील यांनी भाजप प्रवेशाचा मुहुर्त तर जाहीर केलाच नाही, उलट आपले पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या  नुसत्याच वावड्या असल्याचे दाखवले. एक मात्र खरं की  आ. पाटील यांच्या मनात काय चालले आहे, काय शिजतय हे कोडे भल्या-भल्यानंा उलगडलेले नाही.

बाहुबलीमधील कटाप्पाला का मारलं याचे उत्तर जसे मिळत नाही तसेच आ. पाटील यांची उघड भूमिका आणि प्रत्यक्षातील कृती याचा अंदाज आजतागायत  राजकीय धुरिणांना लागलेला नाही. अगदी २०१४ मध्ये झालेल्या   लोकसभा निवडणुकीपासून ही स्थिती आहे. यावेळी मात्र, इस्लामपूरमध्ये त्यांच्याच मतदार संघात त्यांना मिळालेले मताधियय लाखाचे बारा हजार झाले. गेल्या एक  दशकापासून त्यांच्या भूमिकेबाबत संशयाचे धुके तयार झाले आहे. कारण काँग्रेसचा गड असणार्‍या सांगलीत कृष्णाकाठी कमळ फुलण्यास त्यांची अप्रत्यक्ष मदतच झाल्याचे सांगितले जाते. यामुळेच भाजपमधील एका गटाला जेेजीपी म्हटले जात होते.

आता मात्र, भाजप स्वयंभू झाला आहे. पक्षाचा विस्तार मोठ्या  प्रमाणात झाला. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत आयारामांना पक्षात घेउन सत्ताही काबीज करत  काँग्रेेस आणि राष्ट्रवादीला कट्टयावर बसविण्यात चंद्रकांतदादांचा पुढाकार होता. त्यावेळी दादांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व तर होतेच, पण याचबरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदही होते. आता मात्र त्यांना खासदारांची गरज का आहे हे कळायला मार्ग नाही. कारण लोकसभेत भाजपला खासदारांची अधिक गरज  आहे अशीही स्थिती नाही.

तरीही दादांनी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आणि काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व  स्वीकारलेल्या विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाचे खुले निमंत्रण कशासाठी असा रास्त सवाल सांगलीकरांना पडलेला आहे.विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून चार आमदार भाजपचे निवडून आले आहेत. म्हणजे निम्मा जिल्हा भाजपचा झाला आहे. नजीकच्या काळात लोकसभा विधानसभा निवडणुका नाहीत. संख्याबळाचा तर प्रश्‍नच नाही तरीही दादांनी अपक्ष खासदारांसाठी पायघड्या कशासाठी घातल्या याचे कोडे पडले आहे.

विशाल  पाटील यांना खासदार पदी निवडून आणण्यामध्ये माजी मंत्री आ. विश्‍वजित कदम यांचा सिंहाचा वाटा आहे. एकीकडे महाविकास आघाडीत बेबनाव होणार नाही याची दक्षता घेत त्यांनी सांगलीत भाजपला चारीमुंड्या चित करून दाखवले. यात  वसंतदादा घराण्याचा करिष्माही तेवढाच महत्वाचा ठरला असला तरी राजकीय मोट बांधणीही  यशस्वी ठरली. ही मोट बांधणी विधानसभा निवडणुकीत विस्कटली असली तरी सांगली विधानसभा निवडणुकीत खासदार पाटील यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसची जागा अडचणीत आली.

श्रीमती जयश्री पाटील यांची बंडखोरी भाजप पुरस्कृत होती असा आरोप पृथ्वीराज पाटील यांनी जाहीरपणे केला. यामुळे पडद्याआड बरेच काही शिजत असावे असे वाटत असले तरी हे आडाखे अंकगणितासारखे निश्‍चितच मांडता येणार नाहीत. यामागे बीजगणिताचा हिशोब असावा अशी रास्त शंका सांगलीकरांना आहे. याची उत्तरे महापालिका निवडणुकीत मिळतील का यावरच राजकीय पटलावर प्यादी कोणत्या स्थानी राहणार याची प्रचिती येणार आहे.

कदाचित आ. पाटील यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल  म्हणून खासदार पाटील यांना  पक्ष  प्रवेशाचे खुले आमंत्रण दादांनी दिले असावे. जिल्ह्यातील दादा-बापू या वादाला खतपाणी घालून आ. पाटील यांना उचकावण्याचा तर दादांचा हा प्रयत्न नाही ना अशी शंका वाटत आहे. मात्र, दादांच्या  या पवित्र्याने भाजपमध्ये खळबळ माजली नसती तरच नवल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister chandrakant patil invites sangli independent mp vishal patil to join bjp print politics news zws