आम आदमी पार्टीला गुजरात राज्यात चांगलाच धक्का बसला आहे. या राज्यात एकूण पाच आमदारांपैकी भूपेंद्र भयानी यांनी आपल्या आमदारकीचा तसेच आम आदमी पार्टीच्या (आप) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकांची सेवा करण्यासाठी आम आदमी पार्टी योग्य पक्ष नाही, असे भयानी राजीनामा दिल्यानंतर म्हणाले. त्यांचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला असून लवकरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
आपचा पाच जागांवर विजय
गुजरात राज्यात गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपाने चांगलीच मुसंडी मारत एकूण १८२ पैकी तब्बल १५६ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत पाच जागांवर आपचाही विजय झाला. याच आप आमदारांमध्ये भूपेंद्र भयानी यांचादेखील समावेश होता. आगामी सहा महिन्यांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या रुपात आपने गुजरातमध्ये आपले खाते उघडले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करण्याची ‘आप’ला अपेक्षा होती. मात्र भूपेंद्र भयानी यांनी आमदारकी तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामळे आपला चांगलाच धक्का बसला आहे.
“आम आदमी पार्टी अयोग्य पक्ष”
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भयानी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना “मी एक राष्ट्रवादी व्यक्ती आहे. विकास आणि लोकांची सेवा यावर माझा विश्वास आहे. लोकांची सेवा करण्यासाठी आम आदमी पार्टी हा पक्ष योग्य नाही. कोणतीही राष्ट्रवादी व्यक्ती आपमध्ये जास्त काळासाठी राहू शकत नाही,” असे भयानी म्हणाले.
“…तर मी पोटनिवडणूक लढवण्यास तयार”
“मी लवकरच भाजपात प्रवेश करणार आहे. कारण मी मूळचा याच पक्षाचा कार्यकर्ता आहेत. आमदार होण्याआधी साधारण २२ वर्षे मी या पक्षात काम केलेले आहे. आमच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास मी माझ्या मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्यास तयार आहे. आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही,” असेदेखील भयानी यांनी स्पष्ट केले.
“भयानी यांना त्रास दिला गेला”
दरम्यान, आम आदमी पार्टीचे दुसरे आमदार इसुदान गढवी यांनी भयानी यांच्यावर भाजपाने दबाव टाकला, असा आरोप केला आहे. “भाजपा आम आदमी पार्टीला फोडण्याचा सुरुवातीपासूनच प्रयत्न करत आहे. सत्ताधारी भाजपाने काही दिवसांपूर्वी भयानी यांच्याशी संपर्क साधला होता. आमच्या संपर्कात आणखी दोन आमदार आहेत, त्यामुळे तुम्हीदेखील पक्षांतर करा. तुमच्या पक्षाचे आणखी दोन आमदार असल्यामुळे पक्षांतरविरोधी कायदा लागू होणार नाही, असे भयानी यांना सांगितले जात होते. भयानी यांनी नकार दिल्यानंतर त्यांना त्रास दिला गेला. तसेच राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले,” असा आरोप गढवी यांनी केला.
भाजपाने सर्व आरोप फेटाळले
दरम्यान, भाजपाने गढवी यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपला त्यांचे आमदार एकत्र ठेवता आले नाहीत, म्हणून आमच्यावर अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत, असे भाजपाने म्हटले आहे.