येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात तयारी केली जात आहे. भाजपाने तर राज्याराज्यात विशेष रणनीती आखली आहे. हा सोहळा एखाद्या सणाप्रमाणे साजरे करा, असे भाजपाकडून सांगितले जातेय. दरम्यान, या सोहळ्याला काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांनी उपस्थित न राहण्याची भूमिका घेतली आहे. असे असतानाच गुजरात प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांनी काँग्रेसने अशा प्रकारच्या राजकीय निर्णयापासून दूर राहायला हवे होते, असे म्हटले. मोधवाडिया यांच्या या विधानामुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्जुन मोधवाडिया नेमकं काय म्हणाले?

मोधवाडिया यांनी १० जानेवारी रोजी एक्सवर एक पोस्ट लिहिली होती. त्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे सरचिटणीस (संघटना) जयराम रमेश यांनी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन करगे तसेच काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आदरपूर्वक नाकारले आहे, असे सांगितले होते. जयराम रामेश यांच्या या भूमिकेनंतर मोधवाडिया यांनी एक्सवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. “प्रभू राम हे देव आहेत. हा विषय देशातील लोकांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा आहे. काँग्रेसने अशा प्रकारे राजकीय निर्णय घेण्यापासून दूर राहायला हवे होते,” असे अर्जुन मोधवाडिया आपल्या एक्सवरील पोस्टवर म्हणाले.

मोधवाडिया यांच्या भूमिकेनंतर काँग्रेसची अडचण

मोधवाडिया हे गुजरात प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच ते गुजरातमध्ये विरोधी पक्षनेतेदेखील राहिलेले आहेत. त्यामुळे मोधवाडिया यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे.

तीन वरिष्ठ नेत्यांची मोधवाडिया यांच्याशी चर्चा

मोधवाडिया यांच्या या भूमिकेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. त्यांनी मात्र यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे मोधवाडिया यांनी एक्सवरील ही पोस्ट अद्याप हटवलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून ती पोस्ट डिलीट करण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीदेखील मोधवाडिया यांनी ती पोस्ट हटवलेली नाही.

“भाजपाला टीका करण्यासाठी मुद्दा मिळाला”

मोधवाडिया यांच्या भूमिकेवर गुजरात काँग्रेसच्या एका नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली. “जयराम रमेश यांची दिलेले निवेदन हे बहिष्काराप्रमाणे आहे. सध्या संपूर्ण देश राममय झाला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रभू रामाचा विरोध करत आहे, असा संदेश त्या निवेदनातून जातोय. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तोंडावरही ही भूमिका जाहीर करता आली असती. आता काँग्रेसवर टीका करण्यासाठी भाजपाला चांगला मुद्दा मिळाला आहे,” असे हा नेता म्हणाला.

“…प्रभू रामाचे नाव पुढे केले जाते”

दुसरीकडे मोधवाडिया यांच्या या भूमिकेनंतर गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शक्तीसिंह गोहील यांनी प्रतिक्रिया दिली. “मोधवाडिया यांनी केलेले विधान ही त्यांची स्वत:ची भूमिका आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रामनवमीपेक्षा अधिक योग्य दिवस दुसरा कोणताही नाही. केलेल्या कामाला पाहून लोक मत देत नसल्यावर प्रभू रामाचे नाव पुढे केले जाते. निवडणुकीसाठी हे केले जात आहे,” असे गोहील म्हणाले.

“शंकराचार्यांची भूमिका योग्य”

शंकराचार्यांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा विरोध केलेला आहे. मंदिराचे काम पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अशा स्थितीत प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही, अशी सर्व चार शंकराचार्यांची भूमिका आहे. गोहील यांनी शंकराचार्यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे.

गुजरातमध्ये काँग्रेसची स्थिती काय?

दरम्यान डिसेंबर २०२२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आले होते. २०१७ साली काँग्रेसचा ७७ जागांवर विजय झाला होता. तर डिसेंबर २०२२ मधील निवडणुकीत काँग्रेसची १७ जागांपर्यंत घसरण झाली. २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat arjun modhwadia on ram temple event congress in trouble prd
First published on: 13-01-2024 at 20:02 IST