आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गुजरातमधील सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपाला बंडखोरांमुळे फटका बसण्याची शक्यता आहे. या बंडखोरांवर पक्षाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या सात जणांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ‘फिल्डिंग’; ४० मतदारसंघातील प्रचारासाठी २९ नेते मैदानात
हर्षदभाई वसावा, अरविंदभाई लाडानी, छत्रसिंग गुंजरिया, केतनभाई पटेल, भरतभाई चावडा, उदयभाई शहा आणि करणभाई बरैया अशी निलंबित करण्यात आलेल्या उमेदवारांची नावं आहेत. दरम्यान, २००२ गुजरात दंगलीतील आरोपी मनोज कुकरानीची मुलगी पायल कुकरानी यांना उमेदवारी देण्यावरुन भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. त्यावर पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. “न्यायालयाच्या आदेशानुसार मनोज कुकरानीला दोषी ठरवण्यात आले होते. या गुन्ह्यासाठीची शिक्षा कुकरानीने पूर्ण केली आहे. पायल कुकरानी या डॉक्टर असून विवाहित आहेत. जेव्हा गुजरात दंगलीची घटना घडली तेव्हा त्या १० ते १५ वर्षांच्या असतील”, असे पाटील यांनी म्हटले आहे.
“राहुल गांधी गुजरातविरोधी”, ‘भारत जोडो’ यात्रेत मेधा पाटकरांच्या सहभागानंतर भाजपाचा हल्लाबोल
गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागांसाठी १ आणि ५ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदार आपला हक्क बजावतील. या निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला लागणार आहे.
या निवडणुकीसाठी भाजपासह काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये चार सभांना संबोधित करणार आहे. त्यांची एक सभा गीर सोमनाथ जिल्ह्यात नुकतीच पार पडली. मोफत वीज, शिक्षण आणि उत्तम आरोग्य सुविधांचे आश्वासन देत आम आदमी पक्षही गुजरातमध्ये प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.