गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे (आप) इशुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे केले जात आहे. ‘आप’कडून शुक्रवारी तशी घोषणा करण्यात आली. ही घोषणा करताना दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले, केजरीवाल यांनी सांगितले, की आम्ही गुजरातवासीयांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडण्याचे आवाहन केले होते. यासाठी १६ लाख नागरिकांनी मतदान केले. त्यापैकी ७३ टक्के जनतेने गढवी यांना पसंती दिली.
हेही वाचा – “…ती बेईमानी नव्हती का?”; मंत्री शंभुराज देसाईंचा अजित पवारांना सवाल!
गेल्या आठवडय़ात केजरीवाल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी ‘आप’चा उमेदवार निवडण्यासाठी व्हॉट्स अॅप, मोबाइल संदेश किंवा ई मेलद्वारे आपली मते ३ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत जनतेने आपली मते कळवावीत, त्यानुसार ४ नोव्हेंबर रोजी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडला जाईल, असे आवाहन केजरीवाल यांनी केले होते.
केजरीवालांनी घोषणा केल्यानंतर इशुदान गढवींनी म्हटले की, “माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या कुटंबातील एकाही सदस्याने राजकीय पद भूषवलेलं नाही, अगदी सरपंचपदही नाही. मी राजकारणात छंद म्हणून नाही, तर मजबुरी म्हणून प्रवेश करतोय. कारण मी गुजरातच्या नागरिकांचे दु:ख सहन करू शकणार नाही.”
इशुदान गढवींनी २०२१ मध्ये भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशा तिन्ही पक्षांकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा दावा केला आहे. “मला लोकांसाठी काम करायचं होतं. त्यामुळे मी पत्रकारिता सोडली. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशा तिन्ही पक्षांकडून मला पक्षप्रवेशासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. पण नंतर एक दिवस अरविंद केजरीवाल यांनी मला भेटायला बोलवलं. लोकांसाठी काम करायला मिळेल म्हणून मी आपमध्ये प्रवेश केला. आपमध्ये मी जे काम करतोय, त्यामध्ये मी समाधानी आहे. पक्षात कोणतेही मतभेद नाहीत”, असं गढवींनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.
पाटीदार समाजाच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे ‘आप’चे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्याशी या उमेदवारीसाठी गढवी यांचा सामना झाला. गढवी द्वारका जिल्ह्यातील पिपलिया गावातील शेतकरी कुटुंबातील इतर मागास समाजातील आहेत. गुजरातच्या लोकसंख्येत इतर मागासवर्गीय ४८ टक्के आहेत.
कसं ठरलं इशुदान गढवींचं नाव? –
गुजरातमध्येही केजरीवाल यांनी पंजाबप्रमाणेच लोकांकडून मुख्यमंत्री निवडीचं आवाहन केलं होतं. मोबाईल मेसेज, व्हॉट्सअॅप, व्हॉइस मेल आणि इमेल अशा सर्व माध्यमातून आपकडून नागरिकांना कोण मुख्यमंत्री हवेत? यासंदर्भात मत देण्याचं आवाहन केलं होतं. या सर्वेक्षणात जवळपास १६ लाख नागरिकांनी मतदान केल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. यापैकी ७३ टक्के नागरिकांनी इशुदान गढवी मुख्यमंत्री म्हणून हवेत, असं मत दिल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं आहे.
पत्रकारितेचं शिक्षण ते दूरदर्शनमधील नोकरी –
इशुदान गढवी यांचा जन्म गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील पिपलिया गावात झाला. १० जानेवारी १९८२ रोजी जन्मलेल्या गढवींना ४०व्या वर्षी आपकडून मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मिळाली आहे. त्यांचा हा प्रवास आधी पत्रकारिता, नंतर चॅनल हेड आणि राजकीय पदार्पणाच्या दुसऱ्याच वर्षी मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी असा झाला आहे. ओबीसी समाजातून आलेल्या गढवी यांनी गुजरात विद्यापीठातून २००५ साली त्यांची पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली.
दूरदर्शनपासून त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर २००७ साली त्यांनी इटीव्ही गुजरातीसाठी पत्रकारिता सुरू केली. २०१५ साली गढवींनी व्हीटीव्ही या गुजराती वृत्तवाहिनीवर अँकर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. या काळात ते वाहिनीचे स्टार अँकर झाले. गुजरातमध्ये या वाहिनीच्या माध्यमातून ते जनमाणसात पोहोचले. २०२१ साली त्यांनी वाहिनीचे संपादक म्हणून राजीनामा दिला आणि आम आदमी पक्षात प्रवेश करून राजकीय विश्वात पदार्पण केलं.