गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये निडणुका जाहीर झाल्या आहेत. गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर हिमाचल प्रदेशमधील मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. दरम्यान, या निडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून विविध आश्वासने देण्यात येत आहेत. भाजपा आणि काँग्रेसप्रमाणेच ‘आप’नेही गुजरातमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही घोषणा केल्या आहेत. १८ वर्षांवरील महिलांना एक हजार रुपये प्रतिमहिना आर्थिक मदत ३०० युनीटपर्यंत मोफत वीज आणि बेरोजगार युवकांना तीन हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे आपकडून सांगण्यात आले आहे. यावरून गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी एका मुलाखतीत बोलताना टीका केली आहे.
पूर्वीच्या आणि आताच्या निवडणुकीच्या राजकारणात तुम्हाला कोणते फरक दिसतो? या प्रश्नाला उत्तर देतान वाघेला म्हणाले, “तेव्हा विधानसभा निवडणूक ५ हजार रुपये आणि लोकसभा निवडणूक १५ हजार रुपयांमध्ये लढवली गेली. १९७७ मध्ये मला ५ लाख रुपये (पक्ष निधी म्हणून) मिळाले आणि आम्ही कच्छ, राजकोट आणि कपडवंज या तीन जागा लढवल्या. मी पक्ष निधीतून १.१० लाख रुपये खर्च केले. मी अर्ज भरण्यासाठी थेट तुरुंगातून गेलो होतो.आज निवडणुकीच्या जाहीरनाम्यातून पक्ष फसवणूक करत आहेत. निवडणूक आयोगाने पक्षांकडून हिशोब मागितला पाहिजे आणि जर त्यांनी पाच वर्षात आश्वासने पूर्ण केली नाहीत तर त्यांना बाहेर काढावे, जेणेकरून त्यांनी पुन्ही अशी आश्वासने देऊ नयेत.”
याशिवाय, “मोफत काहीही नाही. ही ३०० युनिट मोफत वीज(आपचं वचन) काय आहे? कोणाच्या बापाची दिवाळी आहे का? हा तुमचा सार्वजनिक पैसा आहे. मला सांगा कोणत्या पक्षाने मोफत शिक्षणाचे आश्वासन दिले आणि नंतर दिलेले वचन पाळण्यासाठी २०० कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले?. मी गुजरात आणि देशातील मतदारांना सांगोत, प्रलोभनांच्या आहारी जाऊ नका. कोणत्याही पक्षाने असा निधी उभा केला आहे का ज्यातून ते आपली आश्वासन पूर्ण करतील? जनतेच्या पैशाच्या जोरावर हे सर्व सांगणे सोपे आहे. असं म्हणत त्यांनी आम आदमी पार्टीच्या आश्वासनावर टीका केली.”
याचबरोबर, “आज जे लोक राजकारणात येतात, ते स्वत:साठी येतात. मला राष्ट्रीय स्वयंसेवक संगाने जनसंघात येण्याचे निमंत्रण दिले होते, पण आता येणाऱ्या लोकांना कोणी आमंत्रित केले आहे? तिकिटांची भीक मागण्यासाठी ते पक्षांमध्ये जात आहेत. हा विचारधारा सर्वत्र दिसत आहे. कोणत्याही पक्षात विचारधारा नाही, काँग्रेस नाही, जनसंघ नाही, सीपीएम मध्येही नाही. असंही वाघेला यांनी यावेळी म्हटलं.”