गुजरात विधानसभेच्या निवडणूका जवळ येत चालल्या आहेत. प्रत्येक पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. गुजरातमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपाने या निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने पक्ष सोडून विरोधी पक्षात गेलेल्या नेत्यांना भाजपात पुन्हा परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ४ जून रोजी माजी मंत्री खुमानसिंह वांसिया यांना पुन्हा पक्षात सामावून घेतले आहे. भाजपामध्ये पुन्हा प्रवेश केल्यानंतर वांसिया यांनी गुजरातमधील दारू बंदी उठवण्याचे खबळजनक विधान केले. जर भाजपाने दारूबंदी उठवली तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा गुजरातमधील सर्वच्या सर्व १८२ जागा जिंकेल असे विधान करून गोंधळ उडवून दिला. 

पक्ष प्रवेशाच्याच वेळीच वांसिया यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर वांसिया यांनी हे माझे वैयक्तिक मत असून त्याच्याशी भाजपाचा कुठलाही संबंध नाही असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे केशुभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पहिल्या भाजपा सरकारमध्ये मंत्री असणारे वांसिया हे सुरवतीपासूनच दारूबंदी उठवण्याच्या बाजूने होते.

गुजरातच्या मंगरोळ तालुक्यातील आसरमा गावातील मूळ रहिवासी असणाऱ्या ६७ वर्षीय वांसिया यांनी के. जे पॉलिटेक्निकल कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. १९८० मध्ये त्यांची पक्षाच्या भरुच युनिट प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली. तेव्हापासून हे भाजपासोबत होते. ते १९९५-९६ दरम्यान वन आणि पर्यावरण राज्यमंत्री झाले. पुढे त्यांच्याकडे महसूल राज्यमंत्री पदाची जबादारी देण्यात आली. 

१९९७ मध्ये, जेव्हा शंकरसिंह वाघेला यांनी केशुभाईंच्या विरोधात बंड पुकारले तेव्हा वांसिया हे वाघेला यांच्यासोबत गेले. पुढे वाघेला यांनी त्यांचे सरकार स्थापन केले तेव्हा वांसिया नगरविकास मंत्री झाले. वाघेला यांच्याप्रमाणे पुढे तेसुद्धा कॉंग्रेसवासी झाले. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेससोडून भाजपामध्ये सामील झाले. २०१७ मध्ये पुन्हा वांसिया यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली. पक्षाच्या उमेदवारविरुद्धच निवडणूक लढवल्याबद्दल भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केले. 

दारू बंदी मागे घेण्याच्या आपल्या मागणीचे समर्थन करताना ते म्हणतात ” गुजरातमध्ये दारूबंदी असतानाही शेजारच्या राज्यातील दारू उत्पादक गुजरातमध्ये निकृष्ट दर्जाची दारू विकतात. या दारूमुळे किनारी भागातील गावे त्रस्त आहेत. या खराब दारूमुळे इथे लोकांचा अकाली मृत्यू होत आहे. गुजरातमधील दारूबंदी उठवल्यास गुजरातच्या प्रमाणित दर्जाची दारू उपलब्ध होईल. वांसिया यांच्या विधानामुळे भाजपा पाठोपाठ विरोधी पक्षांतही खळबळ उडाली आहे. काँग्रेसने दारूबंदी उठवण्याचा निर्णयाचा निषेध केला आहे.

Story img Loader