गुजरातमध्ये सलग पाचव्यांदा भाजपाची सत्ता स्थापन झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत १८२ पैकी १५६ जागा जिंकत भाजपाने ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र पटेल यांनी १२ डिसेंबरला सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह १६ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
आता मंत्रिपदाबरोबरच या आमदारांवर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. नवीन जबाबदाऱ्यांमध्ये प्रत्येक मंत्र्याला एक जिल्हा देण्यात आला आहे. सुशासन तसेच अंमलबजावणी आणि व्यवस्थापनच्या ‘जिल्हा प्रभारी’ पदाची जबाबदारी मंत्र्यावर देण्यात आली आहे. गृह राज्यमंत्री हर्ष सांघवी यांच्यावर वडोदरा आणि गांधीनगरची जबाबदारी दिली आहे.
अर्थ, उर्जा मंत्री कून देसाई यांना सुरत आणि नवसारीचे प्रभारी बनवण्यात आलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हृषिकेश पटेल यांच्याकडे अहमदाबाद, खेडा आणि आनंदचे जिल्हा प्रभारीपद दिलं आहे. कृषीमंत्री राघवजी पटेल यांच्याकडे राजकोट आणि जुनागड, उद्योगमंत्री बलवंत सिंह राजपूत यांना साबरकांठा आणि बनासकांठाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.अमरेली-गिर सोमनाथची जबाबदारी पुरुषोत्तम सोलंकी यांच्याकडे दिली आहे.
हेही वाचा : काँग्रेस-जेडीएसच्या बालेकिल्ल्यातून अमित शाह प्रचाराला करणार सुरुवात
कुंवरजी बावलिया ( पोरबंदर, देवभूमी द्वारका ), मुलुभाई बेरा ( जामनगर आणि सुरेंद्रनगर ), कुबेर दिंडोर ( दाहोद आणि पंचमहाल ), भानुबेन बाबरिया ( भावनगर आणि बोताड ), जगदीश विश्वकर्मा ( मेहसाणा आणि पाटण ) या मंत्र्यांनाही ‘जिल्हा प्रभारी’पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.