लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलिकडेच गुजरात काँग्रेसच्या काही नेत्यांवर भाजपाशी संगनमत केल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना त्यांनी २० ते ३० लोकांना पक्षातून काढून टाकण्यास तयार असल्याचे महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केले होते. या विधानामुळे राज्यातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. आता सर्वांचे लक्ष गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि खासदार शक्तीसिंह गोहिल यांच्यावर आहे.
एका मुलाखतीत गोहिल यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यापासून ते आगामी एआयसीसी अधिवेशनापर्यंत राज्यात पक्षाचा दृष्टिकोन कसा बदलला पाहिजे यावर भाष्य केले.
राहुल गांधी इतके आक्रमक होतील याची अपेक्षा तुम्हाला होती का?
राहुल गांधी त्यांचे मत मांडतात. अहमदाबादमध्ये हे विधान करायच्या एक दिवस आधीच ते जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, समिती अध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना भेटले. मी कार्यकर्त्यांना सांगितले की माझ्या चुकांसह त्यांना काय वाटतं ते मोकळपणे सांगू शकतात. काँग्रेसमध्ये असताना काही लोक भाजपा नेत्यांशी मैत्री करत होते अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली. कार्यकर्त्यांनी आपली मतं मांडली. भाजपाकडून होणाऱ्या दादागिरीबाबत सर्वजण बोलत होते.
सकारात्मक बोलायचं तर काँग्रेस सरकारचे गांधीवादी प्रारूप आपल्याला पुन्हा स्थापित करावं लागेल, जेव्हा शिक्षण आणि आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट आणि परवडणाऱ्या मानल्या जात होत्या.
आता नेत्यांचं खरोखरच शुद्धीकरण होणार आहे का?
कोणाच्या मनात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी काही एक्स-रे नाही. आता, राहुलजींनी असे म्हटले आहे तेव्हा आपल्याला त्याकडे बारकाईने पहावं लागेल. एका जिल्ह्याच्या पक्षाच्या अध्यक्षांनी शेअर केलेल्या ऑडिओत कोणीतरी भाजपाशी मैत्री करत असल्याचे समजते आणि भाजपाशी हातमिळवणी करणाऱ्या त्या नेत्याला डच्चू द्यावा असं त्यांना वाटतं. मी परवानगी दिली पण गटबाजीच्या राजकारणाचा भाग म्हणून नाही. आमच्या अनेक मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडला, ज्यांच्यावर कधी संशयही आला नसता. पण आता जिथे पुरावे मिळतील तिथे आम्ही कारवाई करूच, मग ते साधे कार्यकर्ते असो किंवा मोठे नेते.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बदलण्याचीही चर्चा आहे…
हा पूर्णपणे पक्षाच्या हायकमांडचा अधिकार आहे. मी पक्षाचा एक सैनिक आहे. जेव्हा मला बिहारची जबाबदारी देण्यात आली तेव्हा सगळे म्हणायचे की ते काम करण्यासाठी सर्वात कठीण राज्य आहे आणि मला शिक्षा झाली आहे. पण पक्षाचा सैनिक म्हणून मला माझी भूमिका निवडण्याचा अधिकार नाही.
जेव्हा पक्षाकडून मला गुजरात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत सांगण्यात आले तेव्हा मी एआयसीसीचे सरचिटणीस वेणुगोपाल यांना सांगितले की वय आणि वेळ निघून गेली आहे. महा महिन्यांनंतर पक्षाच्या हायकमांडने सांगितले की आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. उद्या पक्षाने पद सोडायला सांगितलं तर मी तात्काळ सोडेन आणि कार्यकर्ता म्हणून काम करेन.
पण आजपर्यंत असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. हायकमांडने काहीही सांगितलेले नाही. उलट त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे.
पुढच्या महिन्यात गुजरातमध्ये अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) अधिवेशन घेण्याचे महत्त्व काय आहे?
महात्मा गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचे जन्मगावही गुजरातमध्येच आहे म्हणून गुजरातमध्ये होणाऱ्या अधिवेशनाला महत्त्व आहे. तसंच सरदार वल्लभभाई पटेल यांची १५०वी जयंती आणि ७५वी पुण्यतिथी आहे. २०२५मध्ये या तीन महत्त्वाच्या घटना आहेत.
सरदार पटेल यांनी २५ वर्षे गुजरात प्रदेश प्रमुख म्हणून सर्वात जास्त काळ काम केले. मी विनंती केली होती की आपण गुजरातमध्ये एआयसीसीचे अधिवेशन घ्यावे आणि काँग्रेस कार्यकारिणीने ती मान्यही केली. मी स्वत:ला खूप भाग्यवान आणि कृतज्ञ मानतो.
भाजपाविरूद्ध जिंकण्यासाठी आणि गुजरातमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला काय करावे लागेल?
१९९०पासून मी जिंकलेल्या आणि हरलेल्या निवडणुकांनी मला भाजपा आणि मोदी यांच्याविरूद्ध जिंकण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल खूप काही शिकवलं. प्रत्येक निवडणुकीत बदल आवश्यक आहेत. गोष्टी बदलल्या पाहिजे आणि ते आम्ही करतच आहोत.
गुजरातमध्ये काँग्रेससाठी सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे? भाजपाशी जवळीक साधणारे नेते की अंतर्गत बंडाळ्या?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणांमध्ये आप सरकार स्थापन करेल असं भाकीत केलं गेलं होतं. आपच्या स्वत:च्या सर्वेक्षणात असे म्हटले होते की पक्ष मोठ्या बहुमताने सरकार स्थापन करेल आणि त्यांना दिल्लीत हातमिळवणी करायची नव्हती. मात्र, आपचा पराभव झाला.
आपण खूप कष्ट करायला हवेत, रणनीती आखली पाहिजे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो. गुजरातमध्ये परिस्थिती खूप वाईट आहे. जर आपण लोकांना हे समजवू शकलो तर…
गुजरातमधील शहरी मतदार काँग्रेसकडे आकर्षित का होत नाहीत?
आमचा कमकुवतपणा असा आहे की आम्ही शहरी भागांत संघटनात्मक जाळं पसरवू शकलो नाही. सर्व अडचणींवर मात करत शहरी भागातही आमच्याच चिन्हावर निवडणुका लढवू शकतो ही आमची ताकद आहे. आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत असा भाग नाही पण बूथ आणि वॉर्डपर्यंतचं आमचं जाळंच हरवलं आहे.
दुसरं म्हणजे भाजपा शहरी मतदारांच्या गरजा पूर्ण शकला नाही. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही मतदारांना आमच्या सकारात्मक मॉडेलबाबत पटवून देऊ शकलो नाही. आम्ही अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडलो.
आज शहरी मध्यमवर्ग अडचणीत आहे. आपण त्यांना सत्य दाखवले पाहिजे. काँग्रेस शहरी भागातून जिंकू शकत नाही असं अजिबात नाही.
गुजरातमधील एकमेव मुस्लिम आमदार इमरान खेडावाला यांनी म्हटले की बिगर मुस्लिम आमदार अल्पसंख्याकांच्या समस्यांसाठी उभे राहत नाहीत असं का?
द्वारकामधील अतिक्रमण कारवाई, पोरबंदर किंवा अबारी कॉलनीतील घटना असो, मी या ठिकाणांना भेट दिली आणि बोललोही आहे.
ज्या अल्पसंख्याकांवर अन्याय होत असेल तर जे अल्पसंख्याक नाहीत त्यांनीच आवाज उठवला पाहिजे. फक्त अल्पसंख्याकच का? जर दलितांवर अन्याय होत असेल तर फक्त दलित नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणींनीच बोलावे का? शक्तीसिंह गोहील यांनीही बोललं पाहिजे. जर हिंदूंवर अन्याय होत असेल, तर काँग्रेसच्या मुस्लिम नेत्याने बोलावं, तर ती धर्मनिरपेक्षता.
२०२२च्या गुजरात निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसला पुनरूज्जीवित करण्यासाठी कोणते सुधारात्मक उपाय केले गेले?
गुजरात विधानसभा निवडणुकांतील दारुण पराभवानंतर पक्षाने चुकांतून शिकून काही निर्णय घेतले, रणनीतीत सुधारणा केल्या. वासनिक यांची गुजरात प्रभारीपदी नियुक्ती हे त्याचं उत्तम उदाहरण. वासनिक यांचा प्रदीर्घ अनुभव गुजरात काँग्रेसला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
त्याव्यतिरिक्त राहुल गांधी दोन दिवस गुजरातमध्ये होते. काँग्रेसने ६४ वर्षांनंतर एआयसीसी अधिवेशनासाठी गुजरातची निवड केली.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतरच्या प्रचंड गर्दीचे रूपांतर मतांमध्ये झाले नाही. का?
२०१७मध्ये, आम्ही दिवंगत अहमद भाई यांची राज्यसभेची निवडणूक जिंकली. यामुळे संदेश असा पोहोचला की मोदी आणि शहा यांचा पराभव होऊ शकतो.
त्यानंतर राहुल गांधींनी गुजरात दौरा केला. आम्ही आमच्या पक्षाचे सकारात्मक मुद्दे आणि भाजपाच्या अपयशासह प्रचारात उतरलो होतो आणि आम्हाला अपेक्षित निकाल मिळाला.
प्रत्येक निवडणूक तुम्हाला काहीतरी शिकवते. २०२७ची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला आपल्या ताकदीवर अधिक भर दिला पाहिजे आणि कच्चे दुवे बळकट करायला हवेत.
२०१७मधील विजयाचे श्रेय पाटीदार आंदोलन आणि पाटीदारांमधील असंतोषाला गेले…
अशा मतदारसंघांकडे पहा जिथे पाटीदार मतदार नव्हते. विशेषत: आदिवासी पट्ट्यात, लोकांनी आम्हाला मतदान केले. पाटीदारांवर अन्याय झाला आणि या आंदोलनामुळे काँग्रेसलाही निश्चितच फायदा झाला.
काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. कोणी पक्षाबाहेर जाण्याला तुम्ही सर्वात मोठं नुकसान समजता का?
नेता कितीही मोठा हिरो असला तरी त्यांची विचारसरणी बदलली की ते शून्य होऊन जातात. वैयक्तिकरित्या फायदा होऊ शकतो पण जनतेच्या दृष्टीने ते शून्यावर येतात. अशा लोकांच्या बाहेर पडण्याने पक्षाला कधीच कोणते नुकसान झालेले नाही. २०१७मध्ये सर्वाधिक नेत्यांनी राजीनामे दिले आणि त्यानंतरच्या निवडणुकीत चांगला निकाल आला.
काँग्रेसमध्ये आकर्षित करण्यासारखे काय आहे?
पक्षाने मोठ्या नेत्यांना खूप काही दिलं आहे. त्यांना नायक बनवले आहे. पण याच नेत्यांना एकतर विकत घेतले गेले किंवा मग घाबरवले गेले. सामान्य कार्यकर्ते वैचारिकदृष्ट्या वचनबद्ध आहेत. गुजराती लोक या ताकदीला नक्कीच आशीर्वाद देतील आणि आम्ही सरकार स्थापन करू.
एआयसीसीमुळे काय बदल होतील असे तुम्हाला वाटते?
आम्ही तरूणांना इतिहासाबाबत सांगू. सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १९३८च्या हरिपुरा अधिवेशनात स्वातंत्र्योत्तर विकास कसा करायचा याचा एक आराखडा दिला होता. जवाहरलाल नेहरू यांनी याच आराखड्यावरून नियोजन समितीची स्थापना केली होती. एकूणच एआयसीसीमध्ये दिशा आणि दृष्टी दाखवली जाईल.