आगामी लोकसभा निवडणुकीला काही दिवस बाकी असतानाच आता गुजरात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच पाच वेळा खासदार राहिलेल्या नारन राठवा आणि त्यांचे पूत्र संग्रामसिंग राठवा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता काँग्रेस आमदार अर्जुन मोधवाडिया यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. अर्जुन मोधवाडिया यांचे पक्षातून बाहेर पडणे, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो आहे.
काही दिवसांत राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुजरातमध्ये दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी गुजरात काँग्रेसच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, या पत्रकार परिषदेला अर्जुन मोधवाडिया हे अनुपस्थित होते. त्यानंतर ते पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशातच काही तासांनी आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे अर्जुन मोधवाडिया यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – “निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही”; भाजपा खासदाराची प्रतिज्ञा
यासंदर्भात बोलताना, मला काँग्रेस पक्षात आता गुदमरल्यासारखे होत असून मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया अर्जुन मोधवाडिया यांनी दिली. तसेच मी मागील ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी जोडलो गेलो आहे. जर माझ्यासारख्या व्यक्तीला काँग्रेस सोडण्यासाठी भाग पाडले जात असेल, तर काँग्रेसने यासंदर्भात विचार करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
सोमवारी अर्जुन मोधवाडिया यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित पक्षाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. ”राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनुपस्थित रहात काँग्रेसने रामाचा अपमान केला आहे. एवढंच नाही, तर त्याच दिवशी राहुल गांधी यांनी आसामध्ये तेथील प्रशासनाशी वाद घातला. यावरून माझ्या मतदारसंघातील लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे मी जड अंत:करणाने आपल्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
महत्त्वाचे म्हणजे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित न राहण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर अर्जुन मोधवाडिया यांनी टीका केली होती. तसेच त्यांनी या संदर्भात एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्टही केली होती. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट करावी, यासाठी काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी मोधवाडिया यांना विनंती केली. मात्र, त्यांनी ही पोस्ट डिलीट करण्यास नकार दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पक्षात त्यांच्याविरोधात नाराजी असल्याची चर्चा होती.
दरम्यान, अर्जुन मोधवाडिया यांचे पक्षातून बाहेर पडणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो आहे. गुजरातमधील काँग्रेसचा ओबीसी चेहरा अशी अर्जुन मोधवाडिया यांची ओळख होती. त्यांनी १९९३ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००२ साली ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले. २००४ ते २००७ या काळात ते गुजरातचे विरोधी पक्षनेताही होते. त्यानंतर ते गुजरातचे प्रदेशाध्यक्षही झाले. २०१२ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभवही झाला. दिवंगत अहमद पटेल यांच्यानंतर ते गुजरात काँग्रेसमधील दुसरे मोठे नेते होते. ते अहमद पटेल यांना आपले राजकीय गुरु मानत.
२०१४ मध्ये वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या मतभेदामुळे त्यांना गुजरात काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले. त्यामुळे ते पक्षात नाराज असल्याचे सांगितले जाते. यादरम्यान ते काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमातही अनुपस्थित असल्याचे बघायला मिळाले. याशिवाय राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हे मतभेद आणखीच वाढले. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला असल्याचे सांगितले जाते. अर्जुन मोधवाडिया यांच्या पक्ष सोडण्याने सौरष्ट्रात पोकळी निर्माण होईल, ती भरून काढण्यासाठी काँग्रेसला बरीच मेहनत करावी लागेल.
अर्जुन मोधवाडिया यांच्याबरोबरच काँग्रेस नेते अंबरीश डेर यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. दोघेही भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अर्जुन मोधवाडिया यांनी याची पुष्टी केलेली नाही. त्यांची पुढची राजकीय दिशा काय असेल? याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल? याबाबत कार्यकर्ते आणि मित्र परिवाराशी चर्चा केल्यानंतर ठरवेन, असे अर्जुन मोधवाडिया म्हणाले.