गुजरातमध्ये लिंबायत विधानसभा मतदारसंघातून तब्बल ३० मुस्लीम अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. १ डिसेंबरला पहिल्या टप्प्यात या मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. लिंबायत विधानसभेची जागा गुजरात भाजपाचे अध्यक्ष सी.आर.पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नवसारी लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या भागातून तब्बल ४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात मुस्लीम समाजाचे ३० टक्के मतदार आहेत.
शेजारच्या सुरत पूर्व मतदारसंघातूनही सात अपक्ष मुस्लीम उमेदवार निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करणारे मिनहाज पटेल या उमेदवारांपैकी एक आहेत. या मतदारसंघातून एकूण १४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सुरत शहरातील एका कपड्यांच्या कंपनीत रोजंदारीवर काम करणारे वसीम शेख हेदेखील आपले नशीब आजमावत आहेत. “कोणीतरी मला अर्ज भरण्यास सांगितले जे मी केले. मला उमेदवार बनवले जात आहे, याची मला जाणीव नव्हती”, अशी प्रतिक्रिया शेख यांनी दिली आहे.
सुरत पूर्वमधून काँग्रेसनेही उमेदवार उभा केला आहे. या मतदारसंघात मतांचं विभाजन करण्यासाठी दोन जागांवर सत्ताधारी भाजपाने संशयास्पद उमेदवार उभे केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सुरत पूर्वमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खेर परेश आनंदभाई यांनीही असाच आरोप केला आहे.
सुरतमधील मतदारसंघामध्ये अनेक तळागाळातील लोक निवडणूक लढवत आहेत. घरकाम करणारे सैयद सुरैया लतीफ हे लिंबायत मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. कमिशन एजंट म्हणून काम करणारे हमीद शेख, हमीद माधवसांग राणा हेदेखील आपलं नशीब आजमावत आहेत. मतांचं विभाजन करण्यासाठी मुस्लीम उमेदवार भाजपानं उभे केल्याचा काँग्रेसचा दावा या उमेदवारांनी फेटाळला आहे. भाड्याने ऑटो रिक्षा चालवणारे अयुब शाहदेखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कुटुंबियांसोबत हिंदू बहुल भागासह सर्वच ठिकाणी प्रचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सुरत पूर्वमधून भंगार व्यापारी समीर फकरुद्दीन शेख हेदेखील निवडणुकीत उतरले आहेत. “बस असंच निवडणूक लढवण्याची इच्छा झाली”, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी या निवडणुकीबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली आहे. समाजसेवा करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.