गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. ‘आप’ने इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यांच्यासाठी आप नेत्यांकडून गुजरातमध्ये झंझावाती प्रचार करण्यात येत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधी गढवी गुजरातमधील ‘वीटीवी गुजराती’चे संपादक होते. त्यांनी या नोकरीचा राजीनामा देत निवडणूक लढवण्याच्या निर्णय घेताच त्यांना कुटुंबियांच्या विरोधाचा सामना करावा लागला.
गुजरातमधील भाजपाचा प्रचार अस्मिता, ध्रुवीकरणाच्या अपेक्षित वळणावर
‘वीटीवी गुजराती’ या वृत्त वाहिनीवरील ‘महामंथन’ हा त्यांचा प्राईम टाईम कार्यक्रम गुजरातमध्ये लोकप्रिय होता. या वाहिनीतून अचानक राजीनामा देण्याचा निर्णय वाहिनीतील सहकाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी धक्कादायक होता. गढवी यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाला सुरवातीला घरातून कडाडून विरोध झाला. पत्रकारांचा लोकांवरील प्रभाव मर्यादित असल्याचे सांगत त्यांनी कुटुंबाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. “त्यांच्या शोमध्ये नेहमीच शक्तीशाली राजकारणी सहभागी होत असत. मात्र, कुटुंबाच्या दृष्टीने विचार करताना मला वाटतं की राजकारणामुळे आमच्या आयुष्यात आणखी समस्या निर्माण होतील. आम्ही कोणत्याही प्रकारच्या राजकारणाचा भाग नाही”, अशी प्रतिक्रिया इसुदान गढवी यांच्या पत्नी हिरवाबेन यांनी दिली आहे. गढवी दाम्पत्याच्या संसाराला १६ वर्ष पूर्ण झाली आहेत.
पत्रकारितेत करिअरसंदर्भातही गढवी यांना कुटुंबातून विरोध झाला होता. “महामंथनच्या प्रत्येक एपिसोडनंतर मी काळजीपोटी इसुदानला रागवायचे. तो त्याच्या वडिलांचं नेहमी ऐकायचा. २०१४ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर कोणताही निर्णय घेण्याआधी तो माझ्याशी सल्लामसलत करायचा. मात्र, यावेळी त्याने आपला निर्णय घेतला होता”, असे इसुदान यांच्या आई मनीबेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Gujarat Election 2022: रवींद्र जडेजाची बहीण आणि पत्नी आमने-सामने, प्रचारादरम्यान केला गंभीर आरोप
राजकीय योजनांपासून परावृत्त करण्याचा कुटुंबियांनी प्रयत्न केल्याचे इसुदान गढवी सांगतात. “आपल्या कुटुंबात कोणी साधा सरपंचदेखील नाही, असं घरातील सदस्य म्हणायचे. त्यांना समजावण्यासाठी मला दोन दिवस लागले”, असं गढवी सांगतात. दरम्यान, आता गढवी कुटुंबीय घरोघरी जाऊन इसुदान यांच्यासाठी प्रचार करत आहेत. खंभालिया मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या गढवी यांना काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम मदाम आणि भाजपाच्या माजी आमदार मुलू बेरा यांचं आव्हान आहे.
Gujarat Elections : …म्हणून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक जिंकणं हार्दिक पटेलांसाठी असणार मोठं आव्हान!
जातीय समीकरणांमुळे खंभालिया मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात गढवी समाजाची केवळ १४ हजार मतं आहेत. ३.२ लाख मतदार असलेल्या या क्षेत्रात अहिर समाजाची सर्वाधिक ५४ हजार मतं आहेत. या समाजाने नेहमीच भाजपा किंवा काँग्रेसला समर्थन दिले आहे. या समाजाकडून ‘आप’ला पाठिंबा मिळणे अवघड मानले जात आहे. “या मतदारसंघात जातीय समीकरणं जरी असली, तरी ‘आप’साठी कामचं युएसपी ठरेल”, असा विश्वास गढवी यांना आहे.