येत्या १ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्य्याचे मतदान पार पडणार आहे. याच कारणामुळे येथे प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस, आप पक्षांसह भाजपानेदेखील आपली कंबर कसली आहे. मागील २७ वर्षांपासून येथे भाजपाची सत्ता आहे. असे असताना महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे. सध्या गुजरातमध्ये विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. या निवडणुकीत भाजपा १४५ पेक्षा जास्त जागांवर विजयी होणार आहे. यावेळीदेखील गुजरातमध्ये भाजपाचीच सत्ता येणार आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत. ते आज (२२ नोव्हेंबर) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> साई रिसॉर्ट प्रकरण: “हिंमत असेल तर…,” अनिल परब यांचं किरीट सोमय्यांना जाहीर आव्हान

“जेव्हा-जेव्हा एखाद्या प्रदेशात निवडणूक लागते, तेव्हा आम्ही तेथे प्रचारासाठी जात असतो. पक्षाचा प्रचार करण्यासाठी कोणीही कोणाला बोलवत नाही. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता उठतो आणि प्रचाराला जातो. कोणालाही बोलवण्याची गरज भासत नाही. ती आमची सवय आहे. मागील २७ वर्षांत गुजरातमध्ये भाजपाचे सरकार आहे. यावेळीदेखील आम्ही १४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. तसे वातावरण गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये विरोधी पक्ष नाहीये. येथे आम्ही १४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत,” असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>अनिल परब आक्रमक, किरीट सोमय्यांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करणार, म्हणाले “त्यांना पक्षात कोण…”

राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच इतर सर्व नेते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानूनच काम करतात. मोदी यांनी जेवढे निर्णय घेतले, त्या सर्व निर्णयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा दाखला आहे. त्यामुळे राज्यपालांना केंद्र सरकारचा पाठिंबा कसा राहील. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेतलेली आहे. मात्र त्या दिवशी दोन नेत्यांना पदवी दिली जात होती. या कार्यक्रमात कोश्यारी यांनी जे विधान केले त्याचे समर्थन कोणीही करत नाही,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat election 2022 chandrashekhar bawankule said bjp will win 145 seats prd