गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने इशुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे केले. मात्र, ही घोषणा केल्याच्या दुसऱ्या दिवशी ‘आप’नेते आणि राजकोटचे माजी आमदार इंद्रनील राज्यगुरू यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. इंद्रनील राज्यगुरू हे ‘आप’च्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. मात्र, केजरीवाल यांनी इशुदान गढवी यांचे नाव घोषित केल्यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच त्यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ‘आप’वर गंभीर आरोप केले. भाजपाला मदत करणाऱ्या व्यक्तीला ‘आप’ने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवले असल्याचा आरोप इंद्रनील राज्यगुरू यांनी केला.
हेही वाचा – Gujarat Election : गुजरातमध्येही ‘एमआयएम’ इतर राजकीय पक्षांचं गणित बिघडवणार?; विरोधी पक्षांची चिंता वाढली!
दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यगुरू यांनी ‘आप’वर गंभीर आरोप केले. ”आपने भाजपाला मदत करणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवले आहे. तसेच मी ‘आप’ला मिळालेल्या देणगीची माहिती मागितली होती. मात्र, मला त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव सहा महिन्यांपूर्वीच ठरले होते, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, राज्यगुरू यांच्या आरोपाला ‘आप’नेही प्रत्युत्तर दिले आहे. ”आपने मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव घोषित करावे, अशी राज्यगुरू यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी पक्षातील वरिष्ठांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी त्यांच्या मर्जीतल्या १५ आमदारांना उमेदवारी द्यावी, यासाठी हट्ट धरला होता. यापैकी बऱ्याच ठिकाणी उमेदवारांची घोषणाही झाली होती”, अशी प्रतिक्रिया गुजरात ‘आप’चे अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी दिली.
कोण आहेत इंद्रनील राज्यगुरू?
इंद्रनील राज्यगुरू हे एकेकाळी गुजरातमधील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक होते. २०१७ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या विरोधात त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला होता. मात्र, मुख्यमंत्री पदावरून झालेल्या मतभेदांनंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसध्ये प्रवेश केला.