सुरत पश्चिम हा भारतीय जनता पार्टीचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. ५७ वर्षीय पूर्णेश मोदी हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांना सष्टेंबर २०२१ मध्ये भूपेंद्र पटल यांच्या सरकारमध्ये ‘रस्ते आणि इमारती’ विभागाचे मंत्रीपद देण्यात आलं होतं. पण अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे गुजरातमधील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली. त्यामुळे अनेक नागरिकांनी खराब रस्त्यांचे फोटो, मीम शेअर करत ‘गुजरात मॉडेल’ची खिल्ली उडवली. त्यामुळे अवघ्या ११ महिन्यात पूर्णेश मोदी यांची मंत्रीपदावरून गच्छंती झाली. आता मोदी ही जागा कायम राखण्याचा प्रयत्न करतील.
खरं तर, पूर्णेश मोदी यांनी मंत्रिपदाची चांगल्या प्रकारे सुरुवात केली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांनी स्वत:च्या नावाने एक मोबाइल अॅप्लिकेशन लॉन्च केलं होतं. या अॅपद्वारे लोक खराब रस्त्यांशी संबंधित तक्रारी करू शकत होते. पण जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील प्रमुख महामार्गावर खड्डे पडले आणि अनेक रस्ते खचले. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आणि सोशल मीडियावर गुजरात विकास मॉडेलची खिल्ली उडवणाऱ्या मीम्सचा पूर आला.
दुसरीकडे, १५ ऑगस्ट रोजी तत्कालीन रस्ते व इमारत मंत्री पूर्णेश मोदी यांनी गुजरात सरकारच्या ‘श्रवण तीर्थ दर्शन योजने’चा भाग म्हणून आपल्या मतदारसंघातील सुमारे ४ हजार ज्येष्ठ नागरिकांना सोमनाथ यात्रेला पाठवलं. त्यासाठी सुमारे ७५ बसेस भाड्याने उपलब्ध करून दिल्या. यानंतर पाचच दिवसांनी त्यांच्याकडून रस्ते आणि इमारती विभागाचं मंत्रीपद काढून घेण्यात आलं.
भाजपाशी संबंधित सुरत महानगरपालिकेच्या एका सदस्याने सांगितले की, पूर्णेश मोदी हे स्वतःला पक्षापेक्षा मोठे असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना (मोदी) ‘रस्ते आणि इमारती’ हा विभाग देण्यात आला होता. हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या विभागाचा थेट जनतेशी संपर्क येतो. अशा स्थितीत एखादा मंत्री सार्वजनिक समस्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर पक्ष संघटनेच्या नेत्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे याच्या तक्रारी जातात.