गुजरात विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरूवात झाली असली तरी सौराष्ट्रात काँग्रेसमध्ये उत्साह कमी असल्याचे चित्र आहे. राहुल गांधींच्या सुरत आणि राजकोट येथील रॅलीपूर्वी येथील काँग्रेस कार्यालये निर्जन असल्याचे दिसून आले होते. याउलट पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसीय दौऱ्यापूर्वी भाजपा कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र होते.
महत्त्वाचे म्हणजे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत याच सौराष्ट्रमध्ये काँग्रेसने २८ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाची ३० वरून १९ वर गच्छंती झाली होती. मात्र, त्यामुळे भाजपा सौराष्ट्रात आपले अस्थित्व पुन्हा सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. यावेळी आम आदमी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक काँग्रेससाठी आव्हानात्मक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते आलोक शर्मा म्हणाले, ही काँग्रेस पक्षाची शैली आहे. आम्ही अगदी जमिनीशी जुळलेली लोकं आहोत. आम्ही इतरांसारखे गाजावाजा करत प्रचार करत नाही.
दरम्यान, इंद्रनील राज्यगुरुंच्या काँग्रेसमध्ये परतण्याने काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी २०१७ मध्ये केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती काँग्रेस पुन्हा करू शकेल का याबाबत शंका आहे. तसेच २०१७ मध्ये सौराष्ट्रात काँग्रेसला पाटीदार समाजाचा पाठिंबा मिळाला होता. मात्र, यंदा पाटीदार समाज कोणाच्या पाठिशी उभा राहतो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.
हेही वाचा – राहुल यांच्या यात्रेमुळे राज्य काँग्रेसमधील मरगळ दूर, आता आव्हान यश मिळविण्याचे
२०१७ च्या विधानसभाच्या निवडणुकीत सौराष्ट्रात झालेला पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे भाजपाने यंदा संपूर्ण लक्ष सौराष्ट्रवर केंद्रीत केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान भाजपाने सौराष्ट्रात खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात केली होती. या दोन दिवसांत येथील भाजपा कार्यालये कार्यकर्त्यांनी गजबजलेली होती. एकंदरीतच भाजपात उत्साह असल्याचे दिसून आले.