यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत १५० पेक्षा जास्त जागा जिंकत भाजपाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या निवडणुकीत भाजपाला एकूण ५२.५ टक्के मतं पडली असून काँग्रेस आणि ‘आप’च्या अनेक उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे. यामध्ये काँग्रेसच्या ४२, तर आम आदमी पक्षाच्या १२८, एआयएमआयएमच्या १३, बसपाच्या १०० आणि समाजवादी पक्षाच्या १७ उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, यंदा काँग्रेसला एकूण २७.२८ टक्के, तर ‘आप’ला १२.९२ टक्के मतं मिळाली आहेत.
हेही वाचा – “गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने ‘खेळ’ बिघडवला”; काँग्रेसच्या पराजयावर पी चिदंबरम यांचं विधान
गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या मतदारसंघात काँग्रेस आणि ‘आप’च्या उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे. भुपेंद्र पटेल यांना ८३ टक्के, तर काँग्रेसचे उमेदवार आणि राज्यसभा खासदार अमीन यागनीक यांना ८.२६ टक्के मतं मिळाली आहेत. तसेच आप उमेदवार विजय पटेल यांना ६.२८ टक्के मतं मिळाली आहेत.
घाटलोढीयाशिवाय बारडोली, चोरियासी, एलिसब्रिज, हालोल, झगडिया, कलोल, मजुरा, मणिनगर, मांजलपूर, नारणपुरा, पारडी, राजकोट दक्षिण, राजकोट पश्चिम, साबरमती, सुरत पश्चिम, उधना, वाघोडिया आणि वलसाड या मतदारासंघामध्येही काँग्रेस आणि ‘आप’च्या उमेवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे. यापैकी झगडिया हा भारतीय आदिवासी पक्षाचा बालेकिल्ला समजला जात असतानाही याठिकाणी भाजपाने विजय मिळवला आहे. २०१७ मध्ये बीटीपीचे छोटूभाई वसावा यांनी विजय मिळवला होता. मात्र, यंदा भाजपाला वसावा यांच्यापेक्षा ३३ हजार मतं अधिक मिळाली आहेत. तर काँग्रेसला ७.७१ आणि ‘आप’ला ९.९१ टक्के मतं मिळाली आहेत.
हेही वाचा – घराणेशाहीच्या राजकारणापासून काँग्रेसची फारकत; हिमाचल प्रदेशात नवा पायंडा
पोरबंदरमधील कुटीयाना मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या कांढल जाडेजा यांचा विजय झाला असून त्यांना ४६.९४ टक्के मतं मिळाली आहेत. याठिकाणी भाजपाला २६.३ टक्के, ‘आप’ला १५.११ टक्के आणि काँग्रेसला ६.८३ टक्के मतं मिळाली आहेत. काही दिवसांपूर्वीच जाडेजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून समाजवादी पक्षात प्रवेश केला होता.
यासंदर्भात बोलताना, काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी म्हणाले, “डिपॉझिट गमावलेल्या उमेवादारांची आकडेवारी अद्याप माझ्याकडे आलेली नाही. मात्र आम्ही प्रत्येक जागेचे विश्लेषण करत आहोत. याद्वारे पक्षाच्या खराब कामगिरीची कारणे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा नवी सुरूवात करू”, तर “भाजप आणि काँग्रेसने जातीय समीकरणांच्या आधारे उमेदवार निश्चित केले होते. मात्र, आम्ही प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्य असलेले उमेदवारांना तिकीट दिले होते”, अशी प्रतिक्रिया आपचे प्रवक्ते योगेश जाडवाणी यांनी दिली. “काँग्रेस आणि भाजपासारखी प्रचार यंत्रणा आमच्याकडे नव्हती. आमच्या प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीसाठी केवळ ८ ते १० लाख रुपये खर्च केले. तर काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांनी यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले.” असेही ते म्हणाले.
हेही वाचा – कॉंग्रेसला आणखी एक धक्का! गुजरात निवडणुकीतील पराभवानंतर आता विरोधी पक्षनेते पद गमावण्याचीही शक्यता
दरम्यान, समाजावादी पक्षाने गुजरातमध्ये १७ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र, १६ जागांवर त्यांच्या उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे. बसपाच्या १०१ जागांपैकी १०० जागांवर ‘डिपॉझिट’ जप्त झाली आहे. तर एमआयएमच्या १२ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे.