गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे पाच दिवस बाकी आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. यंदा आम आदमी पक्ष गुजरामध्ये निवडणूक लढवत असून ‘आप’कडून गुजराती भाषेतून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘आप’ने नुकताच एक व्हिडिओ जारी केला असून या व्हिडिओतून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे गुजराती भाषेतून मतदारांना साद घालत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ‘आप’कडून काँग्रेसच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हेही वाचा – मालधारी समाजाकडून भाजपाला मतदान न करण्याचा निर्धार, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाची चिंता वाढली?
आम आदमी पक्षाने जारी केलेल्या व्हिडिओत, अरविंद केजरीवाल हे काँग्रेसच्या मतदारांशी गुजरातीतून संवाद साधताना दिसून येत आहे. ”तुम्ही काँग्रेस समर्थक आहात? आजपर्यंत तुम्ही काँग्रेसला मतदार करत आला आहात? मात्र, माझी तुम्हाला विनंती आहे. यंदा काँग्रेसला मत देऊन आपले मत वाया जाऊ देऊ नका, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. तसेच काँग्रेस नेते जिंकून आल्यानंतर पुन्हा भाजपाला समर्थन देतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही काँग्रेसवर टीका करताना आमदार जिंकून आल्यानंतर भाजपाला मदत करतात, असा आरोप केला होता. गेल्या काही आठवड्यापासून मान आणि केजरीवाल यांनी अनेकदा गुजरातमध्ये येऊन प्रचार केला आहे. दोघांनीही गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणत रोडशो आणि जाहीर सभा घेतल्या आहेत. यावेळीही त्यांनी गुजराती भाषेतून प्रचार केला होता. एकंदरीतच गुजरातमध्ये सध्या काँग्रेस हा भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. मात्र, ही जागा आता ‘आप’ बळकावू पाहते आहे.