गुजरात विधानसभेची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. पूर्वीपासून भाजप आणि काँग्रेसमध्ये होत असलेल्या पारंपरिक लढाईत यंदा आम आदमी पक्षाने उडी घेतली आहे. पाटीदार बहुल भाग असलेल्या सुरतमध्ये विधानसभेची सुरत (पूर्व) ही जागा काँग्रेस, भाजपासह आम आदमी पक्षानेही प्रतिष्ठेची केली. मात्र, दोन दिवसांत घडलेल्या अपहरण नाट्यानंतर आता आम आदमी पक्षाचे उमेदवार कांचन जरीवाला यांनी अचानकपणे माघार घेतली आहे. भाजपाने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे अपहरण करून त्यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
हेही वाचा – Gujarat Election: “आम आदमी पार्टी शर्यतीत नाही, मुख्य लढत भाजपा-काँग्रेसमध्ये होणार” अमित शाहांचं मोठं विधान
कांचन जरीवाला २०२१ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुरत महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या. २०१७च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला या जागेवर नोटा पेक्षा जास्त मतं मिळाली. कांचन जरीवाला यांनी २०२१ मध्ये या मतदारसंघातील एका प्रभागातून काँग्रेसच्या तिकीटावर लढलेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि भाजपने सर्व १५ जागा जिंकल्या होत्या. सुरत महानगरपालिकेत काँग्रेसला मुख्य विरोधी पक्ष म्हणून सुरतमधील पाटीदार बहुल भागात काँग्रेसने २७ जागा जिंकल्या असताना सुरत (पूर्व) प्रभाग त्यावेळी भाजपाच्या पाठिशी राहिला होता.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सुरत (पूर्व) मध्ये आम आदमी पक्षाने फारशी मजल मारली नव्हती. त्यावेळी आम आदमी पक्षाने राज्यात लढवलेल्या २९ जागांपैकी सूरत (पूर्व) मध्ये केवळ ०.२२ टक्के मतं मिळवली. त्यापेक्षा जास्त म्हणजे ०.८६ टक्के मतं नोटाला होती. त्यावेळी ही लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच राहिली. आता आम आदमीचे उमेदवार कांचन जरीवाला यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार अस्लम सायकलवाला यांनी आता ‘आप’च्या नेत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. “जरीवाला यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या निर्देशानुसारच हे सर्व झाले आहे. तुम्हाला लोकशाही आणि समाजातून अशा समाजकंटकांना संपवायचे असेल, तर सुरत पूर्वच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा द्या.”, असे ते म्हणाले. तर सुरत शहर भाजपाचे प्रवक्ते जगदीश पटेल यासंदर्भात बोलताना म्हणाले, “आता भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. आमचा विजय निश्चित आहे. निवडणुकीत ‘आप’च्या उपस्थितीने आम्हाला काही फरक पडत नाही.”
२०१७ मध्ये याच जागेवर १४ उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी भाजपाच्या अरविंद राणा यांनी काँग्रेसच्या नितीन भरुचा यांचा १३ हजार ३४७ मतांनी पराभव केला होता. यावेळी, काँग्रेसने मुस्लीम उमेदवार दिल्याने, मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला चांगली संधी आहे. यातही एक ट्विस्ट आहे तो म्हणजे, भाजपा आणि काँग्रेससह रिंगणात असलेल्या १७ उमेदवारांपैकी १४ उमेदवार हे मुस्लीम आहेत.
सुरत (पूर्व) मधील २.१२ लाख लोकसंख्येपैकी, जवळपास ९२ हजार मुस्लीम मतदार आहेत. त्यानंतर ४० हजार राणा आणि २० हजार खत्री आहेत. जरीवाला हे खत्री आहेत. सूरतची (पूर्व) जागा २००७ पासून राणा समाजाच्या उमेदवाराने जिंकली आहे. सुरत शहरातील गोपीपुरा भागात राहणारे जरीवाला हे स्टेनलेस स्टील किचन कॅबिनेट विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी जरी वर्कचे युनिट चालवते.
कांचन जरीवाला यांनी आता माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराने आता आम आदमी पक्षाकडे पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. आता आम आदमी पक्ष या जागेवर काँग्रेसला पाठिंबा देणार का? जरीवाला यांच्या माघारीनंतर भाजपापुढे कोणती आव्हाने उभी राहणार आहेत? जरीवाला यांच्या माघारीचा भाजपासह काँग्रेसला दिली फायदा होतो? हे पाहणे महत्त्वाचे आहे.