आम आदमी पार्टीने काल(सोमवार) निवडणूक आयोगाकडे गुजरातमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये लावण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो काढण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. आम आदमी पार्टीने दावा केला आहे की, या कार्यालयांमध्ये मोदींचे फोटो लावणे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे, कारण मोदी गुजरातमध्ये सत्तारुढ भाजपाचे स्टार प्रचारक आहेत.
गुजरातमध्ये एकूण १८२ विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यांमध्ये एक आणि पाच डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर निकाल ८ डिसेंबर रोजी असणार आहे. आम आदमी पार्टीचे कायदेशीर सेलचे पुनीत जुनेजा यांनी म्हटले की, भाजपाचे स्टार प्रचारक घोषित झाल्याने, सरकारी कार्यालयांमध्ये मोदींचे फोटो आचार संहितेचे ठरत उल्लंघन आहे.
निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या निवेदनात आम आदमी पार्टीने म्हटले की, सरकारी कार्यलायात एका राजकीय पक्षाच्या स्टार प्रचारकाच्या फोटोमुळे निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. राज्यात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमधील पंतप्रधान मोदींचे फोटो काढण्यास किंवा झाकण्याचे निर्देश देता येतील.
काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली होती. काँग्रेसचे निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांनी ही यादी जाहीर करताना सांगितले होते की, पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने या उमेदवारांची निवड केली आहे.
गेल्या वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या वेळी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तिथे केजरीवाल यांनी लोकांकडून मतदान घेऊन मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडला होता. विशेष म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला मोडीत काढत आपनं भाजपाला धूळ चारली आणि भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री झाले. तसाच काहीसा आश्चर्याचा धक्का यंदाही अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या मतदारांसोबतच राजकीय वर्तुळालाही दिला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं तगडं आव्हान पेलण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी इसूदनभाई गढवी यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे भगवंत मान यांच्याप्रमाणेच इसूदनभाई गढवीही ‘डार्क हॉर्स’ ठरणार का? अशी चर्चा गुजरातच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.