गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानाला अवघे काही दिवस बाकी आहेत. निवडणुकीच्या या रणधुळीत सर्वच पक्षांकडून एकमेकांवर प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच आता नेहरु-पटेल मुद्दा सुद्धा प्रचाराच्या केंद्रस्थानी आला आहे. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आणंद जिल्ह्यातील खंबाट येथे जाहीर सभेला संबोधित करताना, काँग्रसने नेहमीच पटेलांचा अपमान केला, असा गंभीर आरोप केला. तसेच काँग्रेसने सरदार पटेलांचे अंत्यसंस्कारही अनौपचारीक पद्धतीने केले होते, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

”मला आश्चर्य वाटते, की आज काँग्रेस नेते सरदार पटेल यांचं कौतुक करतात. मात्र, मी माझ्या लहानपणीपासून कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यांना सरदार पटेलांबाबत बोलताना, त्यांचं कौतुक करताना बघितलं नाही. काँग्रेसने कधीच पटेलांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही. त्यांचे अंत्यसंस्कारही अनौपचारीक पद्धतीने करण्यात आले. याबरोबरच त्यांचे स्मारक बनू नये, यासाठीच काँग्रेसने प्रयत्न केले. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी ‘स्टॅचू ऑफ युनिटी’ बांधून सरदार पटेलांना खरी श्रद्धांजली दिली, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात मतभेद असल्याने नेहरू सरदार पटेलांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित नव्हते, असा दावा भाजपाकडून नेहमीच करण्यात येतो. मात्र, भारतात सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वेबसाईनुसार या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. या वेबसाईटनुसार नोव्हेंबर १९५० मध्ये सरदार पटेल यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना बॉम्बे ( मुंबई) आणण्यात आले. हृदयविकारच्या झटक्याने त्यांचे १५ डिसेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यानंतर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह काही नेतेही मुंबईत दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी क्विन रोजी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ”भारताने आजपर्यंत अनेक संकटं बघितली. मात्र, सरदार पटेलांच्या मृत्यू इतके दुःखदायक काहीही नाही”, अशा शब्दात नेहरुंनी पटेलांना श्रद्धांजली वाहिली होती, असेही या पोर्टलवर सांगण्यात आले आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, पटेलांच्या निधनानंतर एक आठवड्याचा शोक व्यक्त करण्यात आला होता. तसेच सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम स्थगित करण्यात आहे होते. दरम्यान, पटेलांच्या निधनानंतर पंडित नेहरु संसदेत म्हणाले होते. ”सरदार पटेल एक मित्र, एक सहकारी म्हणून कायम स्मरणात राहतील. याच बाकावर बसून आम्ही अनेक वर्ष सोबत काम केले आहे. आज रिकाम्या बाकाकडे बघून मला दुखं होत आहे. माझे सहकारी राजगोपालचारी आणि मी लगेच पटेलांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबई जातो आहे. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रपतीही लवकरच मुंबईला पोहोचतील.”

२०१३ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंडित नेहरू सरदार पटेलांच्या अंत्यसंस्काराला गैरहजर होते, असा दावा केला होता. मात्र, त्यानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत नेहरु हे सरदार पटेलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते, हे सिद्ध केले. मात्र, त्यानंतर मोदींनी त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचे म्हटले होते.

त्यानंतर काही दिवसांनी भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनीही अशा प्रकारचा दावा केला होता. ”पंडित नेहरुच नाही, तर देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसादही पटेलांच्या अंत्यसंस्काराला गैरहजर होते, असे ते म्हणाले होते. तसेच नेहरु आणि पटेल यांच्यात मतभेद होते. सरदार पटेलांना १९९१ मध्ये भारतरत्न पीव्ही नरसिम्मा राव यांच्या सरकारमध्ये देण्यात आले. मात्र, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या सरकारने त्यांना भारतरत्न दिला नाही”, असेही ते म्हणाले होते.