Loksabha Election 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मायभूमी असलेल्या गुजरातमध्ये क्षत्रिय समाज तापला आहे. राजकोट लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी ऐन निवडणूक काळात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण समाज पेटून उठलाय. या प्रकरणाची सारवासारव आता भाजपाकडून केली जात आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ पैकी २६ जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य आहे. परंतु, क्षत्रियांच्या नाराजीसमोर ‘मोदी मॅजिक’ किती प्रभावी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गुजरातमधील काही भागांत वातावरण शांत झाल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या राज्यातील पहिल्या सभेसाठी मोदी गुजरातमध्ये दाखल होण्यापूर्वी, गुजरात राजपूत समाज संघटनांच्या समन्वय समितीने जाहीर केले की, ते पंतप्रधानांच्या कोणत्याही सार्वजनिक सभांमध्ये निषेध करणार नाहीत. पण, राजकोट येथील क्षत्रिय समिती कार्यालयात निदर्शनांची तयारी सुरू आहे. याचे नेतृत्व भाजपा राजकोट शहर युनिटचे माजी सरचिटणीस, राजकोट महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व युवा भाजपचे माजी अध्यक्ष राजभा झाला करीत आहेत. “आम्हाला अहंकारी भाजपला धडा शिकवायचा आहे,” असे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा प्रचार सभांमध्ये केंद्रस्थानी, दावे-प्रतिदावे नेमके काय?
क्षत्रियांनी उधळून लावल्या भाजपाच्या सभा
भाजपाचा असा विश्वास आहे की, राजकोटमध्ये काहीच अडचण निर्माण होणार नाही. कारण – येथील राजपूतांची संख्या केवळ ८० हजार आहे. क्षत्रियांच्या संख्येचा विचार केला, तर २० लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात चार टक्के, जामनगर व कच्छसारख्या मतदारसंघात ११ टक्के व आनंदमध्ये ६० टक्के इतके क्षत्रिय आहेत. या मतदारसंघांतील भाजपाच्या सभा क्षत्रियांनी विरोध करून उधळून लावल्या आहेत.
राजभा झाला यांच्या मते, राजकोटमध्ये काँग्रेसचे उमेदवार परेश धनानी यांना पाठिंबा देणार्या मतदारांची संख्या वाढली आहे. १.५ लाख क्षत्रियांसह लेउवा पाटीदार मते आणि मालधारी मते मिळतील, असेही झाला यांनी सांगितले. काँग्रेसचे उमेदवार परेश धनानी लेउवा पाटीदार आहेत; तर रूपाला कडवा पाटीदार आहेत. विशेष म्हणजे ते दोघेही स्थानिक नसून, अमरेलीचे आहेत.
‘क्षत्रिय अस्मिता धर्म रथ’
रूपाला यांच्या वक्तव्यानंतर करणी सेनेने याच्याविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. महाराणा प्रताप ते भावनगरचे तत्कालीन महाराजा कृष्णकुमारसिंह गोहिल यांच्यापर्यंत सर्वांच्या कार्याचा या निदर्शंनांमध्ये लेखाजोखा मांडण्यात आला आहे. समाजाची संरक्षक देवता असलेल्या आशापुरा माँ यांच्या सन्मानार्थ पाच ‘क्षत्रिय अस्मिता धर्म रथ’ क्षत्रिय बहुल गावातून फिरविले जात आहेत, तर मायाबा जडेजा यांसारख्या महिला नेत्या निवासी सोसायट्यांमध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करीत आहेत.
रूपाला यांना निवृत्त करा, अन्यथा भाजपाचा पराभव निश्चित
क्षत्रियांकडून आता गोहिल यांना भारतरत्न देण्यात यावे, असेही आवाहन केले जात आहे. राजकोट शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या १४०० लोकसंख्येच्या रावकी गावात पाटीदार आणि क्षत्रिय राहतात. पाटीदार महिलांच्या गटाचा एक भाग असलेल्या सरोजबेन फचरा म्हणतात की, त्यांच्यासाठी निवडणुकीतील भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा आहे. रूपाला यांच्या वक्तव्याबद्दल माहिती नसल्याचा दावा त्या करतात. रावकीच्या एका प्रमुख राजपूत कुटुंबाशी संबंधित असलेले यशपालसिंह जडेजा म्हणतात की, त्यांचे स्वतःचे पाटीदारांशी कोणतेही मतभेद नाहीत. परंतु, भाजपाने रूपाला यांना निवृत्त करावे किंवा पराभव पत्करावा.
“फक्त मोदी साहेबच योग्य”
वृद्ध पाटीदार शेतकऱ्यांचा एक गट सांगतो की, यापेक्षा जास्त चिंता आहे ती सरकारने कांद्याच्या निर्यातीवर केलेल्या बंदीची. पीक मुबलक असल्याने भाव कोसळले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. ते २०१५ च्या पाटीदार आरक्षण आंदोलनाचा उल्लेख करतात, ते म्हणतात त्या आंदोलनात १४ पाटीदारांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या आंदोलनाने त्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाच्या निवडणुकीचे निकाल उलथवून टाकले. ते पुढे म्हणाले की, पण त्यातून काय साध्य झाले? भाजपा काहीही करू शकते. या सगळ्यात फक्त मोदी साहेबच योग्य आहेत.
जामनगरपासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेल्या खंभलिया गावात ‘क्षत्रिय धर्म रथ’चे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मंदिरांमध्ये जोरदार भाषण करण्यात आले. “आम्ही इथे राजपूत एकतेसाठी आलो आहोत. रूपाला यांना हटवायला आलो आहोत,” असे भाषणांमध्ये बोलण्यात आले. भाजपाने जामनगरमधून दोन वेळा खासदार राहिलेल्या अहिर ओबीसी नेत्या पूनम मॅडम यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने वकील जे. पी. मराविया यांना उमेदवारी दिली आहे. ते लेउवा पाटीदार समाजातून येतात.
काँग्रेसला मत देण्याची शपथ
रथ मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या श्री करणी सेनेच्या स्थानिक युनिटचे अध्यक्ष उपेंद्रसिंह जडेजा म्हणतात की, क्षत्रिय महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे सामान्य नाही. पण, रूपाला यांच्या वक्तव्यांनी त्यांना खूप दुखावलं आहे, असं ते म्हणतात. खरं तर, त्याच जास्त दु:खी आहेत. कारण- हे वक्तव्य त्यांच्यावर करण्यात आल्याचे जडेजा सांगतात. रथयात्रेत काँग्रेसला मत देण्याची शपथ घेतली जाते. उपेंद्रसिंह म्हणतात की, त्यांना दुसरा पर्याय नसल्यामुळे हे पाऊल उचलावे लागले आहे. शेतकरी नरेंद्रसिंह जडेजा म्हणतात की, क्षत्रिय निषेधाच्या पार्श्वभूमीवर इतर समुदाय जे बोलण्याची हिंमत दाखवीत नाहीत, ते आमच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत.
रूपाला यांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात
रूपाला यांच्या प्रचारासाठी भाजपाने कर्नाटकचे माजी राज्यपाल वजुभाई वाला, माजी केंद्रीय मंत्री वल्लभ कथिरिया व माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांसारख्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले आहे. भाजपाचा एक नेता म्हणतो की, रूपाला एका नवीन रणनीतीचा भाग म्हणून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. मंगळवारी ते राजकोटमधील भागवत सप्ताह प्रवचनात निमंत्रित पाहुणे होते; जिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा : हिंदुत्ववादी महिला असदुद्दीन ओवेसींचा गड भेदणार का?
काँग्रेसचे धनानी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी २००२ मध्ये रूपाला यांचा पराभव केला होता. ते निवासी सोसायट्यांमधील छोट्या मेळाव्यात सहभागी होत आहेत. अशाच एका बैठकीत मुस्लिमांसह इतर रहिवाशांना संबोधित करताना धनानी म्हणाले, “लक्षात ठेवा, मतदान करण्याची ही तुमची शेवटची संधी आहे.”