Gujarat Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजपाचा दरारा पाहायला मिळाला. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर झालेल्या निकालात भाजपाने २,१७१ पैकी १,६०८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. ज्यात महानगरपालिका, नगरपालिका महामंडळे आणि जिल्हा व तालुका पंचायतींचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, मतदान झालेल्या ६६ नगरपालिकांमध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्याही वाढली. अल्पसंख्याक समुदायाचे मतदार असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचा विजय झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१८ मध्ये गुजरातमधील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाच्या तिकिटावर ४६ मुस्लीम उमेदवार निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत ही संख्या ७६ वर पोहोचली आहे. निवडून आलेल्या मुस्लीम उमेदवारांमध्ये ३३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने एकूण १०३ मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवले होते. यापैकी अनेक उमेदवारांनी पाटण, खेड़ा, पंचमहल आणि जुनागढ जिल्ह्यांमधील नगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. गेल्या निवडणुकीत या जिल्ह्यांमध्ये भाजपाचा एकही मुस्लीम उमेदवार विजयी झाला नव्हता.

गुजरातमध्ये मुस्लीम उमेदवारांची संख्या वाढली

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २०१८ च्या तुलनेत विजयी झालेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. २०१८ मध्ये नगरपालिका निवडणुकांमध्ये २५२ मुस्लीम उमेदवार निवडून आले होते, तर यावर्षी ही संख्या २७५ वर पोहोचली आहे. यामध्ये भाजपाच्या तिकिटावर विजयी झालेले २८ टक्के मुस्लीम उमेदवार आहेत. सात वर्षांपूर्वी भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्या १८ टक्के होती. सर्वाधिक ३९ टक्के मुस्लीम उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. तर आम आदमी पार्टीकडून निवडून आलेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्या ४.९ टक्के इतकी आहे. आपचे १३ मुस्लीम उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत. ज्यामध्ये जामनगरमधील सलाया नगरपालिकेतील ११ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाला येथील एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.

आणखी वाचा : Political News : उत्तराखंडमध्ये भाजपा अडचणीत? अर्थमंत्री अडकले वादाच्या भोवऱ्यात; कारण काय?

मुस्लीम समुदायाने भाजपाला पाठिंबा का दिला?

भाजपाच्या राज्य अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोहसीन लोखंडवाला यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले, “गुजरातच्या मुस्लिमांनी काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाऐवजी भाजपाच्या विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या सरकारी योजनांचा मुस्लीम समुदायाला फायदा झाला आहे. भारतीय जनता पक्ष मुस्लीम समुदायातील लोकांबरोबर कोणताही भेदभाव करत नाही. अल्पसंख्याक समुदायाला आतापर्यंत अनेक सरकारी योजनांचे फायदे मिळाले आहेत.”

पुढे बोलताना मोहसीन लोखंडवाला म्हणाले, “भाजपातील सक्रिय मुस्लीम सदस्यांनी निवडणूक लढवण्यासाठी त्यांना तिकिटे देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आम्ही वरिष्ठांकडे जवळपास १५० नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची यादी सादर केली. राज्य युनिटने निवडून आलेल्या आमदार, खासदार आणि स्थानिक नेत्यांबरोबर चर्चा करून १०३ जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. या विजयातून हेच ​​दिसून येते की, मुस्लीम समुदायाने काँग्रेसची साथ सोडली असून भाजपाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. अल्पसंख्याक उमेदवारांवर विश्वास ठेवून तिकिटे दिल्याबद्दल आम्ही पक्षश्रेष्ठीचे आभारी आहोत.”

अनेक मुस्लिमबहुल भागात भाजपाचा विजय

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत, खेडा जिल्ह्यातील तीन नगरपालिकांमध्ये भाजपाचे मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. तर पाटणच्या राधनपूर जिल्ह्यात पाच, जुनागढ नगरपालिकेत सहा आणि पंचमहल जिल्ह्यातील दोन नगरपालिकांमध्ये पाच नवीन जागांवर भाजपाचे मुस्लीम नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय गीर सोमनाथ आणि जामनगर या किनारी जिल्ह्यांमध्येही भाजपाचे मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. या भागात स्थानिक प्रशासनाने सरकारी जमिनी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. तेव्हा एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केलं जात आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.

गिर सोमनाथ जिल्ह्यातील कोडिनारचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष जिशान नकवी म्हणाले, “जिल्हा प्रशासनाने धार्मिक स्थळे पाडल्याबद्दल मुस्लिमांमध्ये प्रचंड संताप होता. अशा कृतीमुळे आम्हीही नाराज होतो. मात्र, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आम्ही भाजपाला पाठिंबा देण्यासाठी अल्पसंख्याक समुदायाची मनधरणी केली. भाजपाला साथ दिल्याने आमच्या प्रभागांमध्ये अनेक विकासकामे होतील आणि स्थानिकांचे प्रश्नही सुटतील. काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने आमचे दोन उमेदवार (कोडिनारमध्ये) बिनविरोध विजयी झाले.” असंही जिशान यांनी सांगितलं.

मुस्लिमांची मते भाजपाकडे का वळत आहेत?

२०१८ मध्ये काँग्रेसने गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २०६४ पैकी ६३२ जागांवर विजय मिळवला होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीत त्यांना केवळ २५२ जागांवरच विजय मिळवता आला. विशेष म्हणजे, काँग्रेसकडून विजयी झालेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्याही १३३ वरून १०९ पर्यंत आली. गुजरात विधानसभेतील एकमेव मुस्लीम आमदार इम्रान खेडावाला यांनी दावा केला की, “आमच्या अनेक मुस्लीम उमेदवारांनी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली नाही. त्यांनी अपक्ष अर्ज भरला आणि निवडून आले. कारण, आपापल्या प्रभागांमध्ये काम करून घेण्यासाठी त्यांनी प्राथामिकता दिली आहे.”

हेही वाचा : CAG चा अहवाल, शीशमहल ते आमदारांचं निलंबन, दिल्ली विधानसभेतला मंगळवार का ठरला वादळी?

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सामाजिक शास्त्रांचे माजी प्राध्यापक घनश्याम शाह आपल्या ‘India’s 2014 Elections — A Modi-led BJP Sweep’ या पुस्तकात लिहितात, “२००२ च्या दंगलींपासून मुक्त आणि २०१० पर्यंत काँग्रेसचे राज्य असलेल्या सलाया नगरपालिकेला विकासकामांपासून दूर राहावं लागलं होतं. २००७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काही मुस्लीम नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. २००८ मध्ये पहिल्यांदाच चार मुस्लीम उमेदवारांनी भाजपाच्या तिकिटावर नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि निवडून आले. त्यानंतर, शहराला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून निधी मिळू लागला. २०१३ मध्ये, भाजपाचे २७ पैकी २४ जागांवर मुस्लीम उमेदवार निवडून आले होते.”

एआयएमआयएमकडून हिंदू उमेदवारांना तिकीट

पुढे बोलताना घनश्याम शाह म्हणाले, “मुस्लिमांसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यांना माहीत आहे की, काँग्रेसकडून आपल्याला कुठलीही मदत मिळणार नाही. अल्पसंख्याक समुदायाला पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांची गरज आहे. दुर्दैवाने, काँग्रेसचे याकडे दुर्लक्ष असून त्यांना गुजरातमध्ये कोणत्याही निवडणुका जिंकण्याची इच्छा आहे असं वाटत नाही.” दरम्यान, हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षानेही गुजरात नगरपालिका निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते, परंतु ते राजकोट जिल्ह्यातील उपलेटा तालुक्यापुरतेच मर्यादित होते.

एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष साबीर काबलीवाला यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, आमच्या ७१ उमेदवारांपैकी १२ उमेदवार हिंदू होते आणि त्यांच्या पॅनलमध्ये मुस्लिम उमेदवार होते. निवडणुकीत आमच्या मतांचा टक्का वाढल्यामुळे आमच्या एकाही उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली नाही. आमचा पक्ष राज्यात नवीन असून येणाऱ्या निवडणुकीत आमचे उमेदवार नक्कीच विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.