Gujarat Local Body Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या भाजपाने गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थेतही आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. येत्या रविवारी (१६ फेब्रुवारी) गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन हजार १७८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्याआधी काँग्रेसच्या तब्बल २१५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, ज्यामुळे निवडणुकीतील स्पर्धा कमी झाली असून या सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. २०२७ मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाला २०१७ च्या निवडणुकीत मोठा फटका

२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. राज्यातील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा भाजपाला मोठा फटका बसला होता. मात्र, तरीही सत्ता राखण्यात पक्षाने यश मिळवलं होतं. त्यानंतर २०२२ च्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. दरम्यान, भाजपाने बिनविरोध जिंकलेल्या २१५ जागांपैकी १९६ जागा नगरपालिकांमध्ये, १० जागा जिल्हा आणि तालुका पंचायतींमध्ये, तर ९ जागा जुनागढ महानगरपालिकेतील आहेत. जुनागढ महानगरपालिकेतील ६० जागा १५ वॉर्डमध्ये विभागलेल्या आहेत. त्यापैकी दोन वॉर्डांमधील काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे.

२०२२ मध्ये काँग्रेसची गुजरातमध्ये घसरण

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गुजरातमध्ये तब्बल ७७ जागा जिंकल्या होत्या. मात्र, २०२२ मध्ये पक्षाला केवळ १७ जागांवरच विजय मिळवता आला. यापैकी पाच आमदारांनी काँग्रेसला रामराम केला आणि भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून पुन्हा विधानसभेत प्रवेश केला. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात केवळ एकच जागा जिंकता आली. दुसरीकडे भाजपाने पुन्हा २५ जागांवर दणदणीत विजय मिळवला.

आणखी वाचा : Lok sabha Elections 2024 : निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही; राजकीय पक्षावर अशी वेळ का ओढवली?

वडोदरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश देसाई हे दक्षिण गुजरातमधील वलसाड नगरपालिका वॉर्ड क्र. ३ मधून निवडणूक लढवत आहेत. “आमच्या चारही उमेदवारांचे पॅनल नगरपालिकेत निवडून येईल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या ५५ ​​वर्षांपासून काँग्रेसमध्ये असलेले ७८ वर्षीय देसाई म्हणाले, “पक्षाची संघटनात्मक रचना कमकुवत आहे, कारण आम्ही बऱ्याच काळापासून राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेमधून बाहेर आहोत. निवडणुका आणि निकालानंतर निवडून आलेल्या काँग्रेस नेत्यांना आकर्षित करण्यासाठी भाजपा सर्व तंत्रांचा वापर करतो.”

‘भाजपाकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दबाव’

“भाजपाने काँग्रेस उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभनं दिली. काही उमेदवार आपला निवडणूक अर्ज मागे घेण्यास तयार नव्हते. मात्र, भाजपाने त्यांच्या सरकारी नोकरीत असलेल्या नातेवाईकांना शोधून काढलं आणि बदली करण्याच्या धमक्या दिल्या”, असा दावाही गिरीश देसाई यांनी केला. ते म्हणाले की, “वलसाड महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने अपक्ष उमेदवारांसाठी जागा सोडण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही २९ उमेदवार उभे केले होते, त्यापैकी दोघांनी भाजपाच्या दबावामुळे माघार घेतली. परंतु, बहुमत मिळवण्यासाठी गरज पडल्यास आम्ही अपक्षांची मदत घेऊ.”

वलसाड जिल्ह्यातील तीन नगरपालिकांमधील ७२ जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र, त्याआधी काँग्रेसच्या नऊ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यापैकी सात जागा एकट्या वलसाड नगरपालिकेतील आहेत. गेल्या महिन्यात काँग्रेससाठी मोठा धक्का देणारी घटना घडली. भाजपाने नगरपालिका निवडणुकीसाठी वलसाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष रोनक शाह आणि त्यांच्या पत्नीला निवडणूक तिकीट देण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघांनीही काँग्रेसच्या प्राथामिक सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला.

काँग्रेसचे उमेदवार नेमकं काय म्हणाले?

वलसाड नगरपालिका वॉर्ड क्र. १० मधून काँग्रेस उमेदवार ममता ढोलात्रे यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. “माझ्या सासरच्या लोकांकडून, नातेवाईक आणि मित्रांकडून खूप दबाव होता. माझा पती विक्रम यांनीही इतरांशी वैर निर्माण होऊ नये म्हणून उमेदवारी मागे घेण्यास सांगितले. मी गृहिणी आहे आणि ही माझी पहिली निवडणूक होती”, असं त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.

धर्मपूर नगरपालिका वॉर्ड क्र. ३ मधून काँग्रेसचे उमेदवार संदीप दाभाडिया यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ते म्हणाले, “ही माझी पहिली निवडणूक असल्याने मी खूपच उत्साही होतो. परंतु, समुदायातील लोकांनी माझ्यावर दबाव टाकला आणि मी ते सहन करू शकलो नाही. कारण राजकारण हा माझा व्यवसाय नाही, त्यामुळे मी ३ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतला.”

काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीतून माघार का घेत आहेत?

दाभाडिया म्हणाले की, प्रभाग क्रमांक १ मधील चार काँग्रेस उमेदवारांनीही आपली नावे मागे घेतली आहेत. तरुण पिढी सोशल मीडियाशी जोडली गेल्याने भाजपाकडे आकर्षित होत आहे. काँग्रेसची काम करण्याची पद्धत त्यांनी पाहिलेली नाही. भाजपानेही माझ्याशी अनेक वेळा संपर्क साधला, पण मी काँग्रेस सोडण्यास नकार दिला. धरमपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजित गरसिया म्हणाले, “काँग्रेसचे अनेक उमेदवार भाजपाच्या दबावतंत्राला बळी पडून आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत. राज्यात भाजपाचे अनेक वर्षांपासून सरकार आहे. लोक आपल्या सत्तेला कंटाळले याची जाणीव त्यांना आहे. परिणामी निवडणूक जिंकण्यासाठी ते साम, दाम, दंड भेद असे सर्व उपाय वापरत आहेत.”

गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी यांनी सांगितले, “धर्मपूरमध्ये भाजपाने काँग्रेसच्या चार उमेदवारांचे अपहरण केले आणि त्यांना जबरदस्तीने अर्ज मागे घ्यायला लावला. अनेक दिवसांपासून आमचा त्यांच्याशी संपर्क तुटला होता, आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली, परंतु कोणताही एफआयआर दाखल करण्यात आला नाही. अशाप्रकारे इतर उमेदवारांवरही भाजपाने दबावतंत्राचा वापर केला आणि आमच्या २६ उमेदवारांना माघार घ्यावी लागली.”

हेही वाचा : Buddhists Maha Kumbh: बौद्ध, आदिवासी यांचीही कुंभ मेळ्यात हजेरी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सनातन ‘संगम’ काय आहे?

काँग्रेसकडून अनेक उमेदवारांची हकालपट्टी

गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तिसिंह गोहिल यांनी गुरुवारी जुनागड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार केला. यावेळी ते म्हणाले, “आमचा पक्ष भाजपाला कडवी झुंज देण्यास सज्ज आहे आणि मतदारांमध्येही भाजपाविरोधी लाट आहे. म्हणूनच भाजपा नेते पैशांचा, ताकदीचा आणि पोलिस प्रशासनाचा गैरवापर करत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या २१५ जणांची पक्षाने हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे”, असंही त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या आरोपांचं भाजपाकडून खंडण

दरम्यान, काँग्रेसच्या या आरोपांचं भाजपा नेत्यांनी खंडण केलं आहे. भाजपाला दोष देणे हा काँग्रेसचा स्वभावच आहे, असं भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने म्हटलं आहे. ते म्हणाले, “भाजपाने आपले दरवाजे उघडल्यानंतर सर्व प्रभावशाली नेते काँग्रेस सोडून आमच्या पक्षात येत आहेत, ज्यामुळे काँग्रेसला उमेदवार शोधणे कठीण झाले आहे. एका चिन्हाशिवाय काँग्रेसकडे त्यांच्या उमेदवारांना देण्यासाठी काहीही नाही, त्यामुळे त्यांचे अनेक नवीन उमेदवार निराश होत आहेत.” सूरत शहर काँग्रेसचे अध्यक्ष धनसुख राजपूत यांनी सांगितले की, राज्यात पक्ष बळकट होत चालला आहे. नीलेश कुंभानी यांनी काँग्रेसशी विश्वासघात करून ऐनवेळी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. आम्ही खात्री केली आहे की, आता कोणताही काँग्रेस नेता अशी चूक पुन्हा करणार नाही.”