गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवरील पूल दुर्घटनेत १३० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हा पूल १०० वर्षे जुना असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आज (१ नोव्हेंबर) पंतप्रधान मोदी यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. तर दुसरीकडे या घटनेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. या नेत्यांकडून राज्यातील भाजपा तसेच केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली जात आहे. ३१ मार्च २०१६ साली पश्चिम बंगालमध्ये अशीच दुर्घटना घडली होती. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकावर टीका केली होती. ही घटना म्हणजे ‘देवाची करणी’ आहे की निष्काळजीपणा, असा खोचक सवाल तेव्हा मोदी यांनी केला होता. मोदींच्या याच विधानाचा संदर्भ घेत आता काँग्रेसचे नेते मोदी तसेच भाजपावर टीका करत आहेत.
काँग्रेसने मोरबी पूल दुर्घटना ही सरकारच्या निष्काळजीपणाचे तसेच चुकीच्या कारभाराचे घडली आहे, असा आरोप केला आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. सध्या भारत जोडे यात्रेत अससेल्या राहुल गांधी यांनीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मात्र या घटनेचे राजकारण करणार नाही. या दुर्दैवी घटनेचे राजकारण करणे म्हणजे मृत्युमुखी पडलेल्यांचा अनादर करण्यासारखे आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत
हेही वाचा >>> नड्डा, शाह यांचा आदेश डावलला, हिमाचल प्रदेशमध्ये ५ माजी आमदारांसह एका बड्या नेत्याची हकालपट्टी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह सध्या गुजरातमध्ये मुक्काम ठोकून आहेत. त्यांनी मात्र या घटनेनंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी दुर्घटना स्थळाची भेट घेतली होती. त्यांनी या घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी तसेच या समितीने तीन महिन्यांच्या अहवाल सादर करावा, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा >>> केरळ भाजपामध्ये नाराजीनाट्य! राज्य कोअर कमिटीत स्थान न दिल्यामुळे प्रदेश उपाध्यक्षांनी व्यक्त केली खदखद
दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी रात्री उशिरा एक बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी घटनेची माहिती घेतली. तसेच आज घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी मोरबी येथील रुग्णालयात जाऊन जखमींची भेटही घेतली.