नांदेड : साईबाबांचे शिर्डी, बालाजीचे तिरूपती, सत्य साईबाबांचे पुट्टपार्थी ही महाराष्ट्रातल्या आजी-माजी राजकीय नेत्यांची प्रचलित श्रद्धास्थाने. त्यात आता बडोद्याजवळ कर्नाळी येथील ‘कुबेर भंडारी’ या देवस्थानाची गेल्या काही महिन्यांत भर पडली आहे. ‘धनप्राप्तीसह सुख-समृद्धीचा देव’ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या कुबेर भंडारी मंदिरात महाराष्ट्रासह अन्य राज्यातील व्यावसायिक वर्षानुवर्षे भक्तिभावाने जातात, पण नांदेडमधील अशोक व अमिता चव्हाण, डी.पी.सावंत, अमरनाथ राजूरकर, बालाजी कल्याणकर, मोहन हंबर्डे, माधव जवळगावकर आदी आजी-माजी आमदार मागील काही महिन्यांपासून प्रत्येक महिन्यातील अमावस्येची वेळ साधत ‘कर्नाळी वारी’ नियमितपणे करत आहेत. या नामावलीत नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार वसंतराव चव्हाण यांची आता नोंद झाली आहे. नांदेडच्या नेत्यांची ही वारी समजल्यानंतर शेजारच्या जिल्ह्यातील काही नेतेही ‘कुबेर भंडारी’ला जाऊ लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदेडमधील व्यापारी घनश्याम मंत्री हे वरील देवस्थानाशी जोडले गेले आहेत तर गोपाल वर्मा यांनी राजकीय नेत्यांना या मंदिराची महती कथन केल्यानंतर गेल्या सप्टेंबरपासून राजकीय नेते आणि त्यांच्या समर्थकांची ‘कर्नाळी वारी’ सुरू आहे. दर महिन्याच्या अमावस्येला नांदेडमधून व्यावसायिक, नोकरदार आणि राजकीय कार्यकर्ते ‘कुबेर भंडारी’ला जातात, असे येथील टॅक्सी व्यावसायिक देवानंद स्वामी यांनी सांगितले. टॅक्सी, खाजगी वाहने, रेल्वे किंवा विमान अशा वेगवेगळ्या माध्यमांतून तेथे जाणार्‍यांची संख्या दोन हजारांहून अधिक असल्याचे स्वामी यांनी नमूद केले.

हेही वाचा : विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी सरकारला म्हणाले, निवडणूक आयुक्त निवड प्रक्रिया वेळेत करायची तर…

बडोद्यापासून ६० कि.मी. अंतरावर नर्मदा नदीच्या काठावरील कर्नाळी गावातील कुबेर भंडारी मंदिराला फार मोठा इतिहास आहे. या मंदिरात सलग ५ अमावस्यांदरम्यान मनोभावे दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होतात, असा प्रचार तेथे नियमित जाणार्‍या व्यावसायिकांकडून नांदेडच्या राजकीय वर्तुळात करण्यात आल्यानंतर अमिता अशोक चव्हाण यांनीच ‘कर्नाळी वारी’चा परिपाठ सुरू केला. मग चव्हाण परिवाराचे समर्थकही वरील देवस्थानी नियमित जात आहेत, असे सांगण्यात आले.

हेही वाचा : शरद पवार यांच्या खेळीबाबत उत्सुकता

गेल्या महिन्यात भाजपात प्रवेश करणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘कुबेर भंडारी’चे दर्शन घेऊन आले. अमिता चव्हाण व त्यांच्या दोन कन्या तसेच राजूरकर परिवार आणि काही आजी-माजी आमदारांनी काही महिन्यांपूर्वी दर्शन घेतल्यानंतर वरील मंदिराच्या बाहेरचे एक समूह छायाचित्र समाजमाध्यमांत जारी केले होते, पण तेव्हा त्यावर बाहेर विशेष चर्चा झाली नाही. अशोक चव्हाण तेथे सलग ५ महिने गेले नाहीत, पण आता ते राजकीयदृष्ट्या सुरक्षित कवचाखाली आल्यावर पुट्टपार्थीनंतर कर्नाळी हे चव्हाण परिवाराचे नवे श्रद्धास्थान झाले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी नमूद केले.

हेही वाचा : शरद पवारांचे बेरजेचे राजकारण बारामतीत अजितदादांसाठी अडचणीचे

मागील तसेच वर्तमान काळातील राजकीय नेत्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धांना ठळक बातम्यांत स्थान मिळाले. काँग्रेसचे नेते दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय नेते पुट्टपार्थीच्या सत्य साईबाबांचे अनुयायी-भक्त होते. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना सत्य साईबाबांना आपल्या शासकीय निवासस्थानी आदरपूर्वक पाचारण करून त्यांची पाद्यपुजा केली होती. त्यावरून टीकाही झाली होती.

कुबेर भंडारी देवस्थानाची महती समजल्यावर गेल्या सप्टेंबरमध्ये मी पहिल्यांदा तेथे गेलो. सलग पाच वार्‍या केल्यावर हेतू सफल झाल्यामुळे मी वारीत खंड पडू दिला नाही. हे देवस्थान केवळ धनप्राप्तीसाठी नाही तर तेथे गेल्याने समस्यांचे निराकरण होते. मी विज्ञानवादी असलो, तरी विश्व कल्याणासाठी संत, देवादिक काम करत असतात असा माझा अनुभव आहे.

संतोष पांडागळे (काँग्रेसचे माजी प्रवक्ते)
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat s kuber bhandari temple is the new place of worship for political leaders of nanded print politics news css