२५ फेब्रुवारीला गुजरातमधील विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. गुजरात सरकारचे मंत्री जगदीश विश्वकर्मा यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसचे आमदार खूपच भडकले. काँग्रेस आमदार इमरान खेडावाला हे गुजरातमधील एकमेव मुस्लिम आमदार आहेत. विधानसभेत भाजपाचे जगदीश विश्वकर्मा यांनी म्हटले की, राज्यात धार्मिक स्थळांच्या अवतीभोवती अधिकाधिक अतिक्रमण हे एका विशेष समुदायाकडून करण्यात आले आहे. त्यावर काँग्रेसचे आमदार खेडावाला यांनी त्यांच्या या विधानाचा कडाडून विरोध केला. विश्वकर्मा हे त्यांच्या समुदायाला निशाणा करीत असल्याचा आरोप इमरान खेडावाला यांनी यावेळी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इमरान खेडावाला यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा संपूर्ण मुद्दा मांडला. खेडावाला यांनी सांगितले, “विधानसभेत त्यांनी जगदीश विश्वकर्मा यांना म्हटले की, तुम्ही राज्य सरकारमध्ये मंत्रिपदावर आहात आणि विधानसभेत अशा प्रकारचं विधान करणं योग्य नाही. गुजरातची लोकसंख्या ६.५ कोटी इतकी आहे आणि प्रत्येकाचे आपापले विचार आहेत. पूर्ण गुजरात तुम्हाला पाहत आहे.” इमरान खेडावाला यांनी सांगितल्याप्रमाणे जगदीश विश्वकर्मा यांनी दावा केला की, गुजरातमध्ये २००२ नंतर कोणताही कर्फ्यू लावण्यात आलेला नाही किंवा दंगलीही झालेल्या नाहीत. मात्र असं असेल, तर राज्य सरकार सुरत, राजकोट, अहमदाबाद व बडोदा यासारख्या शहरांमध्ये डिस्टर्ब्ड एरिया अॅक्ट (अशांत क्षेत्र कायदा) का लागू करत आहे?

मुसलमानांवर निशाणा साधल्याचा आरोप
काँग्रेस आमदार खेडावाला यांनी सांगितले, “जगदीश विश्वकर्मा यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत. कारण- त्यांचा हेतू केवळ मुसलमानांवर निशाणा साधणे हा होता. सभागृहात काँग्रेस आमदारांची संख्या फक्त १२ आहे. त्यामुळे आम्हाला बोलायला फार कमी वेळ मिळतो. परंतु, जेव्हा मला बोलायला वेळ दिला जाईल, तेव्हा मी निश्चितच बोलेन आणि विश्वकर्मा यांना जाबही विचारेन”.

आम्ही कायम राज्यात शांतता राखण्याबाबत बोलत आलो. दरवर्षी अहमदाबादमधील जगन्नाथ रथयात्रा अगदी शांततेत पार पडते, असेही इमरान यांनी यावेळी सांगितले. सभागृहातील विधानाचा विरोध करताना त्यांनी म्हटले, “विश्वकर्मा म्हणाले की, आम्हाला विकासाबाबत चर्चा करायची आहे; परंतु भाजपाच्या सत्तेत तर तोडफोडीची राजनीती सुरू आहे.”

“याआधीही मुसलमान आमदारांवर साधला होता निशाणा”
“सभागृहात मुसलमान म्हणून मला लक्ष्य केले जाते. कारण- १८२ आमदारांमध्ये मी एकमेव मुसलमान आमदार आहे. जेव्हाही मुसलमान समुदायाबाबतचे काही मुद्दे समोर येतात, तेव्हा माझ्याकडेच बोट दाखवले जाते. मी विश्वकर्मा यांना केवळ माफी मागायला सांगितलं. मी जेव्हाही बोलण्यासाठी उभा राहतो, तेव्हा त्यांच्या मनात केवळ एकच भावना असते आणि ती म्हणजे मी मुसलमान असण्याची. मी निवडणुकीत जिंकून आलो आहे; हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायांनी मला मतं दिलेली आहेत”, असे इमरान यांनी सांगितले. मी हिंदू-मुस्लिम राजनीती करीत नाही. हा आपला देश आहे आणि याच मातीत आम्ही विलीन होणार आहोत असे ठाम वक्तव्यही त्यांनी केले.
दुसरीकडे नोव्हेंबर २०२२ च्या दरम्यान, इमरान खेडावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक यशस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून स्तुती केली होती. पंतप्रधान मोदींचा मला गर्व आहे, असे विधान त्यांनी केले होते. त्यावेळी भाजपाचा एजंट असल्याचे म्हणत त्यांच्याच पक्षातील काही कार्यकर्त्यांनी इमरान यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.

दरम्यान, काँग्रेस लवकरच गुजरातमध्ये आपले वार्षिक अधिवेशन घेणार असल्याचे म्हटले जातेय. हे अधिवेशन अहमदाबाद किंवा गांधीनगरमध्ये होण्याची शक्यता आहे.