पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृह राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपाला सत्ता कायम राखणे प्रतिष्ठेचे आहे. तरी गत वेळच्या तुलनेत भाजपाला एवढे आव्हान यंदा दिसत नाही. गुजरातमध्ये भाजपा आणि काँग्रेस असा दुरंगी सामना वर्षानुवर्षे होत असे. यंदा आम आदमी पार्टीमुळे तिरंगी लढती होणार असल्या तरी या तिरंगी लढतींचा भाजपालाच फायदा होईल, अशी चिन्हे आहेत. त्यातच आता काँग्रेसला एक धक्का बसला आहे.
गुजरातमध्ये १० वेळा आमदार राहणारे आणि आदिवासी समाजाचे प्रमुख नेते मोहनसिंह राठवा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मोहनसिंह राठवा छोटा उदेपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. १९७२ पासून २०२२ पर्यंत २००२ ची दंगल वगळता एकदाही राठवा यांचा निवडणुकीत पराभव झाला नाही. मात्र, मुलाला काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने अखेर राठवा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
हेही वाचा : भारत जोडो यात्रा ही राजकीय हुकूमशाहीविरोधातील लढाई; जयराम रमेश यांची मोदीनीतीवर टीका
आदिवासी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या मोहनसिंह राठवा यांनी काँग्रेसकडे आपल्या मुलासाठी उमेवारीची मागणी केली होती. त्यासाठी मोहनसिंह राठवा यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. पण, उमेदवारी नाकारल्याने राठवा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला फटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत. तर, आपने दिलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर राठवा यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाला फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तापी जिल्ह्यातील सोनगढ या आदिवासी मतदारसंघातून प्रचाराला सुरूवात केली आहे.
राज्यसभेचे खासदार नारन राठवा आणि महेंद्रसिंह राठवा यांच्यात छोटा उदेपूर या विधानसभा उमेदवारीवरून वाद सुरु होता. दोघेही आपल्या मुलांच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनसिंह राठवा यांनी २०१७ पूर्वी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा शब्द दिला होता. मात्र, तरीही २०१७ साली विधानसभा निवडणूक त्यांनी लढली होती. तसेच, २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोहनसिंह राठवा यांचे पुत्र रणजितसिंह राठवा यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण, त्या निवडणुकीत रणजितसिंह राठवा यांचा पराभव झाला होता.
हेही वाचा : आयुष्यात कधीही चुकवलं नाही मतदान; श्याम सरन नेगी कसे बनले भारताचे पहिले मतदार?
तर, नारन राठव यांनी मुलाला उमेदवारी न दिल्यास पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नारन राठव यांचा मुलगा संग्रामसिंह यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षाने प्राधान्य दिल्याचं दिसतं आहे.
दरम्यान, उदेपूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. १९८५ ते २००२ पर्यंत सुखरान राठवा येथून निवडून येत होते. तर, २००२ आणि २००७ या जागेवर भाजपाचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर, मोहनसिंग राठवा यांनी २०१२ आणि २०१७ साली भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत पुन्हा काँग्रेसकडे ही जागा खेचून आणली होती.