दीपक महाले

शिवसेनेचे अठरापैकी बारा खासदार आणि वीस माजी आमदार शिंदे गटासोबत येणार असल्याचा दावा जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे बंडखोर आमदार तथा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. काही खासदारांना आपण भेटलो असून, ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यावर आता पडदा पडला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची युती सत्तेवर आली आहे. जिल्ह्यातून शिंदे गटात गुलाबराव पाटील यांच्यासह लता सोनवणे, किशोर पाटील, चिमणराव पाटील, चंद्रकांत पाटील हे सहभागी झाले आहेत. बंडानंतर प्रथमच जिल्ह्यात दाखल झालेल्या गुलाबराव पाटील यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी घोषणा देत पाठिंबा दर्शविला. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. शिंदे गटाकडे ४० आमदार असल्याने आता खासदारांमध्येही अस्वस्थता आहे. आमच्याकडे येण्यासाठी शिवसेनेचे अठरापैकी बारा खासदार आणि वीस माजी आमदार सज्ज आहेत, ठाकरे यांच्याकडे असणारे काही आमदारही संपर्कात असल्याचा दावा पाटील यांनी केला. आम्ही शिवसेना पक्ष वाचविण्यासाठी उठाव केला. विधानसभेत शिवसेना गट म्हणून आम्ही बसलो आहोत. आगामी काळात शिवसेना म्हणून आमच्या गटाला मान्यता मिळेल आणि संख्याबळावर धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळेल. शिवसेना नेते संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मगच आमच्याविषयी बोलावे, असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना उभी करणार आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. उलट शिवसेना आम्ही वाचविली आहे. आम्ही बंडखोर नसून, आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे, ती आग विझविण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत. उद्धव ठाकरेंना फसविले गेले असून, अजूनही त्यांनी सावध राहून फसविणार्‍यांना दूर करावे. ठाकरेंना आम्ही सोडले नाही, ठाकरेंनी आम्हाला सोडले. वेळोवेळी ठाकरेंना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचविण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे; तर उठाव केला, असे पाटील यांनी सांगितले.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर गुलाबरावांना महसूलमंत्रिपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असे पाटील यांनी सांगितले. बर्‍याचशा आमदारांचे काम होत नव्हते. याबाबत मी वैयक्तिक उद्धव ठाकरेंना भेटून सांगितले होते, तसेच शिंदेंसोबत जे आमदार आहेत, त्यांच्यासह शिंदेंना परत आणा, असेही सांगितले होते. मात्र, माझे कोणी ऐकले नाही. जिल्ह्यातील चारही आमदार फुटल्यानंतर मी शेवटी बाहेर पडलो. एकाचवेळी चाळीस आमदार बाहेर पडतात, ही मोठी फूट आहे. आमचे कोणी ऐकून घेत नव्हते. शिंदे समजून घेत होते. काही कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करू, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Story img Loader