महेश सरलष्कर

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीच नव्हे तर, सोनिया गांधी यांच्यावरही घणाघाती टीका करून पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. गांधी कुटुंबावर इतका थेट आणि आक्रमक शाब्दिक हल्लाबोल केल्यामुळे आझाद यांना जम्मू-काश्मीरमध्ये (भाजपच्या मदतीने) नवा राजकीय डाव सुरू करायचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षाअखेरीस वा पुढील वर्षाच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसच्या प्रचार समितीचा तसेच, राजकीय सल्लागार समितीच्या सदस्यत्वाचा आझाद यांनी नुकताच राजीनामा दिला. जम्मू-काश्मीरच्या प्रदेशाध्यक्ष निवडीवरूनही आझादांचे काँग्रेस अंतर्गत कमालीचे मतभेद झाले. सोनिया गांधींच्या वतीने आझाद यांचे मन वळवण्याचा प्रयत्न फोल ठरला. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस मोठी जबाबदारी देत नाहीच, जम्मू-काश्मीरमध्येही पक्षात आपले वर्चस्व राहिलेले नाही, ही भावना आझाद यांचे काँग्रेसशी नाते कायमचे तुटण्यामागील अखेरचे कारण ठरले! राहुल गांधींनी ज्येष्ठ नेत्यांना निर्णयप्रक्रियेतून डावलल्याची टीका आझाद यांनी पत्रात केली आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, आरपीएन सिंह, सुनील जाखड, अश्वनी कुमार, कपिल सिबल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामध्ये इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या आझादांची भर पडली आहे. आझाद यांच्या राजीनाम्यामुळे बंडखोरांचा ‘’जी-२३’’ गट मात्र कमकुवत झाला आहे.

हेही वाचा- तीन दिशांना तोंडे असल्याने महाविकास आघाडी निष्प्रभ

आझादांच्या राज्यसभेतील निरोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आझादांची प्रचंड स्तुती केली. मोदी आणि आझाद यांनी एकमेकांचे कौतुक केले होते, ते भावनिक झाले होते. तेव्हापासूनच आझाद नवी राजकीय इनिग्ज खेळू शकतील असे काँग्रेसमध्ये मानले जात होते. त्यामुळे आझाद यांचा राजीनामा अपेक्षितच होता, तो इतक्या उशिरा का दिला गेला, असे विचारले जात आहे. आझादांच्या राजीनाम्याचा काँग्रेसमध्ये कोणालाही धक्का बसलेला नाही.

दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधील ‘’जी-२३’’ गटाने सोनिया गांधींना दिलेले पत्र राहुल गांधी यांच्या निष्ठावान नेत्याने प्रसारमाध्यमात ‘’लीक’’ केले. त्यानंतर झालेल्या पहिल्या कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी आझाद यांच्यासह ‘’जी-२३’’ गटातील नेत्यांवर शरसंधान साधले होते. ‘’हे नेते संघ आणि भाजपचे सहानुभूतीदार आहेत’’, अशी थेट टीका राहुल यांनी केल्याची चर्चा रंगली होती. आझाद, आनंद शर्मा आदी बंडखोर नेत्यांशी सोनिया गांधी यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, राहुल गांधी यांनी जुन्या-जाणत्या नेत्यांना दूर ठेवले आहे. या विरोधातून आझाद यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारली गेली.

आझाद यांनी पाच पानी राजीनामा पत्रात, ‘’मी व माझे सहकारी आयुष्यभर ज्या वैचारिक भूमिकेशी एकनिष्ठ राहिलो, त्यासाठी आता काँग्रेसच्या बाहेर राहून प्रयत्न करू’’, असे म्हटले आहे. या विधानांमधून आझाद यांची नजिकच्या भविष्यातील राजकीय वाटचाल स्पष्ट झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या फेरचनेचे काम पूर्ण झाले असून तिथे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजपेतर विरोधी पक्षांच्या गुपकर आघाडीलाही घरघर लागली आहे. अशा वेळी विधानसभा निवडणुकीनंतर वेगळा राजकीय गट मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, याचा अचूक अंदाज आझाद यांनी बांधलेला आहे. पूर्वी मेहबुबा मुफ्ती यांची ‘’पीडीपी’’ व भाजप युतीचे सरकार जम्मू-काश्मीरमध्ये स्थापन झाले होते. काश्मीरचा विशेषाधिकार काढून टाकल्यानंतर निर्माण झालेल्या नव्या राजकीय परिस्थितीमध्ये याच प्रयोगाची पुनरावृत्ती भाजपला आझादांच्या माध्यमातून होऊ शकते. मोदी व आझाद यांचे सलोख्याचे संबंध पाहता हा प्रयोग अशक्य नसल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा- मंत्रिमंडळाच्या पुढील विस्ताराची लोणीकरांना प्रतीक्षा

‘’भाजपविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करत असताना आझाद यांनी पक्षाचा राजीनामा देणे दुर्दैवी आहे‘’, अशी कडवट टिप्पणी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत केली. या विधानातून रमेश यांनी, आझाद यांची वाटचाल कुठल्या दिशेने होऊ लागली आहे, हेच अप्रत्यक्षपणे सूचित केले. आझाद यांच्या राजीनामा पत्रातील राहुल यांच्यावरील टिकेसाठी वापरलेल्या शब्दांतूनही ही बाब स्पष्ट होते. ‘’हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी कळसुत्री बाहुलीसारख्या असून पक्षातील सर्व निर्णय राहुल गांधी वा त्यांचे सुरक्षा रक्षक व खासगी सचिव घेत आहेत’’… ‘’निवडलेले लोकही (अध्यक्षपदासाठी) कळसुत्री बाहुल्याच असतील’’… ‘’प्रॉक्सी नेमून पक्ष कधीही उभा राहू शकत नाही, पक्षाचे कायमस्वरुपी नुकसान होईल’’… ‘’मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाला अव्हेरून वटहुकूमाचे कागद फाडून टाकण्याची राहुल गांधींची कृती बालिश होती. त्यामुळे पंतप्रधान व केंद्र सरकारच्या अधिकारालाच धक्का बसला’’… ‘’राहुल गांधींनी ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करून लांगुनचालन करणाऱ्या अननुभवी लोकांचा गोतावळा निर्माण केला. राहुल यांनी ज्येष्ठ नेत्यांचा पावलोपावली अपमान केला’’…अशा विधानांतून आझाद यांनी घणाघाती प्रहार केल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून गांधी वगळता इतर नेत्याची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. सध्या अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा असून सोनिया गांधींनी गेहलोत यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. गांधीतर नेता पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरला तर, बंडखोर गटातील नेत्यांपैकी कोणीही आव्हान देण्याची शक्यता होती. या नेत्यांमध्ये आझाद यांचाही समावेश होता. पण, आझाद यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षांतर्गत स्तरावर अखेरचा संघर्ष करण्याचीही संधीही आझाद यांनी गमावली आहे. संभाव्य नव्या रचनेतही राहुल गांधी यांच्या विरोधामुळे आझाद यांना पक्षात महत्त्वाचे स्थान दिले गेले नसते. त्यामुळे आझाद यांनी वेगळी वाटचाल सुरू केली आहे.

Story img Loader