Gulfam Singh Yadav : उत्तर प्रदेशातला संभल जिल्हा काही महिन्यांपासून चर्चेत आहे. हिंसा आणि मंदिर-मशीद वाद यामुळे संभलची चर्चा रंगते आहे. मात्र संभल मध्ये १० मार्च मध्ये एका वरिष्ठ भाजपा नेत्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे पोलीस प्रशासनालाही धक्का बसला आहे.

नेमकं काय घडलं?

भाजपाचे संभलमधले वरिष्ठ नेते गुलफाम सिंह यांची १० मार्च रोजी हत्या कऱण्यात आली. ही हत्या ज्या प्रकारे झाली त्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. सिंह यांच्या कुटुंबाने म्हटलं आहे की सिंह यांची हत्या व्यक्तीगत शत्रुत्व डोक्यात ठेवून करण्यात आली. नेमकी या हत्येची इनसाइड स्टोरी काय आपण जाणून घेऊ.

विषारी इंजेक्शन देऊन सिंह यांची हत्या

संभलमधल्या दबथरा गावात गुलफाम सिंह यादव यांची विषारी इंजेक्शन देऊन हत्या करण्यात आली. ७० वर्षीय गुलफाम यादव त्यांच्या घराच्या जवळ बसले होते. त्यावेळी बाईकवर बसलेले तीन जण त्यांच्या दिशेने आले. बाईक लावली त्यानंतर गुलफाम यांच्या पाया पडले. मग या तिघांनी गुलफाम यांना विषारी इंजेक्शन दिलं आणि तिथून पळ काढला. गुलफाम यांच्यावर हा अनपेक्षित हल्ला झाल्याचं पाहून त्यांच्या कुटुंबाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपा नेत्याची हत्या झाल्याचं कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसंच अलीगढ या ठिकाणी सिंह यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींची धरपकडही सुरु केली.

नेमकी घटना काय आणि कशी घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी बाईकवर बसलेले तिघेजण गुलफाम सिंह यादव यांच्या घराजवळ पोहचले. तिथे गुलफाम घराच्या बाहेर बसले होते. तिघेजण त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी वाकून गुलफाम यांना नमस्कार केला. त्यानंतर हे तिघंही गुलफाम यांच्याशी चर्चा करु लागले. याच दरम्यान एकाने गुलफाम यादव यांच्या पोटात इंजेक्शन खुपसलं आणि पळ काढला. गुलफाम यादवही या तिघांच्या मागे धावले. पण मधे त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. यानंतर गुलफाम यादव यांच्या कुटुंबाने त्यांना आधी आरोग्यकेंद्रात नेलं, त्यानंतर अलीगढ या ठिकाणी नेत होते मात्र गुलफाम यादव यांचा जीव वाटेतच गेला. या घटनेनंतर गुलफाम यांच्या गावावर आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांचे अश्रू थांबत नाहीयेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीमने हातांचे ठसेही घेतले. पोलिसांना घटनास्थळी एका आरोपीचं हेल्मेट सापडलं आहे. तसंच एक सुईही आढळून आली आहे. गुलफाम यादव यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षकांनी नेमकं काय सांगितलं?

गुलफाम यांच्या मृत्यूनंततर या ठिकाणी पोलीस अधीक्षक के. के. बिश्नोई लगेच पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसंच त्यांनी यादव कुटुंबाशी चर्चाही केली. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्याआधारे मारेकऱ्यांचा शोध लावून त्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास बिश्नोई यांनी व्यक्त केला आहे. यादव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या संदर्भातला अहवाल आल्यानंतर आम्ही हे सांगू शकतो की इंजेक्शन कुठलं होतं? आम्हाला काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. यादव यांना इंजेक्शन देणाऱ्या लोकांना आणि त्यांची हत्या करणाऱ्यांना लवकरच अटक करु असंही बिश्नोईंनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

गुलफाम सिंह यादव कोण होते?

गुलफाम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. गुलफाम सिंह यादव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह, भाजपाचे जिल्हा महामंत्री आणि उत्तर प्रदेश पश्चिम भागाचे भाजपाचे उपाध्यक्षही होते. भाजपातली त्यांची कारकीर्द प्रदीर्घ होती.

Story img Loader