भाजपाच्या एका माजी आमदाराला काही नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अटक करण्यात आली आहे. अपक्ष आमदाराशी वाद आणि भांडण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
खानापूरचे अपक्ष आमदार उमेश कुमार यांच्या रुरकी या ठिकाणी असलेल्या कार्यालयावर गोळीबार केल्याचा आणि त्यांना तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप कुंवर प्रणव सिंह चँपियन यांच्यावर आहे. कुंवर प्रणव सिंह यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ते भाजपाचे माजी आमदार आहेत.
उमेश कुमार यांनाही घेण्यात आलं ताब्यात
उमेश कुमार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे कारण उमेश कुमार यांनी प्रणव यांच्या घरी जाऊन त्यांना ललकारलं होतं. उमेश कुमार शनिवारी प्रणव चँपियन यांच्या घरी गेले आणि त्यांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर रविवारी म्हणजेच २६ जानेवारीच्या दिवशी प्रणव चँपियन अपक्ष आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयात गेले आणि तिथे तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही नेत्यांच्या गटातील पाच जणांना अटक केली आहे. तसंच यामुळे या भागात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.
कुंवर प्रणव सिंह कोण आहेत?
प्रणव सिंह यांनी लक्सर या मतदारसंघातून अपक्ष म्हणून २००२ मध्ये निवडणूक लढवली होती आणि ते विधानसभा आमदार झाले होते. त्यानंतर ते काँग्रेस या पक्षात गेले. २००७ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर २०१२ ला त्यांनी खानापूरमधून निवडणूक लढवली आणि वजीय झाले. २०१६ मध्ये त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या हरीश रावत यांच्या विरोधात बंड करणाऱ्या आठ आमदारांची भाजपात प्रवेश केला त्यापैकी एक प्रणव सिंहही होते. पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं मात्र ते पुन्हा निवडून आले. आता ते आमदार नाहीत. मात्र त्यांनी जो हल्ला केला आणि मारहाण केली त्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. नंतर प्रणव यांना भाजपाने निलंबित केलं. मात्र २०२२ मध्ये त्यांच्या पत्नीला तिकिट दिलं होतं. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. खानापूरमधून उमेश कुमार निवडून आले. तेव्हापासून म्हणजेच मागच्या तीन वर्षांपासून उमेश कुमार विरुद्ध कुंवर प्रणव सिंह यांच्यात सोशल मीडियावरुन वाद सुरु आहेत. ज्याचा परिणाम २६ जानेवारीला पाहण्यास मिळाला.
उमेश कुमार कोण आहेत?
उमेश कुमार २०१२ मध्ये स्थापन झालेल्या समाचार प्लस या मीडिया हाऊसचे संस्थापक आहेत. ते समाचार प्लसचे संपादकही होते. त्यांच्याविरोधात दंगल, धमक्या देणे यासह विविध गुन्ह्यांच्या १३ तक्रारी दाखल आहेत.