नागपुरात हिंसाचार भडकावल्याप्रकरणी अटक झालेला मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा संस्थापक मोहम्मद हमीद इंजिनियर याची कारकीर्द चढउतारांनी भरलेली आहे. मोहम्मद हमीद इंजिनीयर हा मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष आहे. हमीद यानं सरकारी कर्मचारी म्हणून त्याचा प्रवास सुरू केला. त्यानंतर २००२ मध्ये नागपूरमधील एक मशीद ताब्यात घेण्यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनामुळे त्याचा मुस्लिम समुदायावरील प्रभाव वाढला.
शुक्रवारी नागपूर हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी इंजिनीयर याला अटक केली आहे. औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करीत उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी निदर्शनं केली. त्या निदर्शनांनंतर नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती. ही दंगल आणखी पेटवल्याचा आरोप हमीद याच्यावर करण्यात आला आहे.

कोण आहे हमीद इंजिनीयर?
नागपूरचा रहिवासी असलेल्या ६० वर्षीय हमीदनं महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. तिथे त्याला इंजिनीयर हे त्याचं टोपणनाव मिळालं. हमीद हा पुढे अहले सुन्नत जमातचा अनुयायी झाला. पारंपरिक सुन्नी आणि सुफी प्रथांचं जतन करण्यासाठी काम करणाऱ्या हमीद २००२ मध्ये या संघटनेशी जोडला गेला. त्यानंतर तो त्याच्या समुदायासाठी काम करू लागला. नागपूरमधील सुन्नी मशि‍दीवर तबलिगी जमातच्या काही सदस्यांनी कब्जा केला होता. त्याविरोधात केल्या गेलेल्या आंदोलनाचं हमीदनं नेतृत्व केलं. तबलिगींशी धार्मिक मतभेद असल्यानं एक धार्मिक चळवळ म्हणून हमीदनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे सुन्नी आणि सुफी समुदायावरील त्याचा प्रभाव वाढू लागला.

“नागपूरमध्ये मोमीनपुरा इथे एक सुन्नी मशीद होती. त्यावर तबलिगी जमातने नियंत्रण मिळवले होते. इथे अहले सुन्नत जमातचे नियंत्रण असावं यासाठी आम्ही लढलो. मात्र, प्रशासनाचा कल अनेकदा राजकीय प्रभाव असलेल्यांकडेच असतो हे आम्हाला समजलं आणि यातूनच इमान तन्झीम या संघटनेचा जन्म झाला”, असं त्यावेळी हमीदनं त्याच्या भाषणात म्हटलं होतं.

इमान तन्झीम ही संघटना २००२ मध्ये भारतातील बरेलवी प्रभावित सुन्नी प्रथा आणि ओळख जपण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात संघटनेचे संस्थापक अहमद रझा खान यांच्या जन्मस्थळी बरेली इथे ही संघटना स्थापन करण्यात आली. बरेलवी विचारसरणीचं पालन ही संघटना करीत असे. बरेलवी चळवळीमार्फत पैगंबर आणि सुफींबद्दल अत्यंत आदर आणि श्रद्धा बाळगली जाते. तसेच दर्ग्यातील परंपरेनुसार धार्मिक प्रथांचे समर्थनही ते करतात. भारतातील बहुसंख्य मुस्लिमांचं प्रतिनिधित्व बरेलवी विचारसरणी करीत असली तरी सुन्नी इस्लामच्या देवबंदी या पंथाइतकं राजकीय महत्त्व तिला नाही.

काही वर्षांपासून इंजिनीयर हा भारतातील काही प्रमुख मुस्लिम संघटनांचा टीकाकार होता. देवबंदी पंथाचं पालन करणारी जमियत उलेमा-ए-हिंद आणि तबलिगी जमातसारख्या संघटनांचा तो कट्टर टीकाकार होता. बहुतांश वेळा भारताचे स्वातंत्र्यसेनानी व पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यावरही इंजिनीयर टीका करीत असे. कलाम स्वत:ही याच परंपरेचे पाईक होते. बरेलवी विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार न केल्याबद्दल इंजिनियरच्या मनात कलाम यांच्याबद्दल अढी होती.

काही काळानंतर भारतीय मुस्लिमांमध्ये अहले सुन्नत जमातचा राजकीय प्रभाव कमी होत गेला. त्यामुळे इंजिनीयर यानं २००९ मध्ये मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पक्षाची स्थापना केली. अहले सुन्नत जमातच्या अनुयायांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या ध्येयासह या पक्षाची स्थापना करण्यात आली. “जे सुफी संतांबाबत बोलतील, तेच भारतावर राज्य करतील” (जो सुफी संत की बात करेगा, वही भारत पर राज करेगा) असं या पक्षाचं घोषवाक्य होतं. यातून सुफी शिकवण आणि ओळख जपण्यासाठी वैचारिक प्रभाव दिसून येतो. आतापर्यंत या पक्षानं अनेक निदर्शनं केली. पैगंबराचा अपमान केल्याप्रकरणी कारवाईचीही मागणी त्यांनी केली. या पक्षानं देशात अनेक ठिकाणी निवडणुका लढवल्या, तसेच कित्येक राज्यांमध्ये उमेदवारही उभे केले.

२०१५ मध्ये सुफी समुदायाचं प्रतिनिधित्व इंजिनीयर करीत होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणाऱ्या मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व तो करीत होता. तेव्हा त्यानं राष्ट्रीय स्तरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्या वेळच्या व्हिडीओत इंजिनीयर शिष्टमंडळातील इतर सदस्यांची पंतप्रधानांशी ओळख करून देताना दिसत होता. या बैठकीत इंजिनीयर यानं पंतप्रधानांसमोर भारतातील, तसेच इतर सुन्नी संघटनांमध्ये वहाबी विचारसरणीच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच त्यांच्या वाढत्या धोक्याबाबत इशाराही दिला होता. वहाबी हा पुराणमतवादी आणि कठोरतावादी विचारसरणी असलेला १८ व्या शतकातील मुस्लिम समुदायच आहे.

“सुन्नी वक्फ बोर्डावर एक कट्टरपंथी विचारसरणी प्रभावी ठरली आहे. अतिरेकी विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या अनेक सुन्नी संस्था ताब्यात घेण्यात आल्या आहेत. जर ही विचारसरणी भारतात रुजली, तर ते देशासाठी खूप धोकादायक ठरेल. सुन्नी वक्फ बोर्डाचे व्यवस्थापन हे अहले सुन्नत जमातकडे द्यावे आणि वहाबींना त्यांचे स्वत:चे वहाबी वक्फ बोर्ड राहू द्या”, असे इंजिनीयर याने पंतप्रधानांना बैठकीत सांगितले होते.

त्यानंतर एमडीपीने महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात निवडणुका लढवल्या; मात्र, राजकीदृष्ट्या त्यांचा प्रभाव त्यांना सिद्ध करता आला नाही.

असं असलं तरी इंजिनीयर पुन्हा एकदा चर्चेत आला तो त्याच्याच पक्षातील फहीम खान या कार्यकर्त्यामुळे. फहीम खान हा एमडीपीचा कार्यकर्ता आहे. १९ मार्चला नागपूर पोलिसांनी हिंसाचाराचा मास्टरमाईंड म्हणून त्याला अटक केली. त्यानंतर इंजिनीयरनं खान याच्या बचावासाठी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या; मात्र इंजिनीयर यालाच हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली शुक्रवारी अटक करण्यात आली.