अविनाश कवठेकर
पुणे : राज्यातील सरकार बदलले असले तरी जिल्ह्यातील सरकार बदलले आहे, असे वाटत नाही. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घ्यावा लागणार आहे, अशा शब्दात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील पवार कुटुंबाच्या प्रशासनावरील अप्रत्यक्ष प्रभावाबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे मंगळवारी खंत व्यक्त केली.
हेही वाचा… लातूर जिल्ह्यात पालिका निवडणुकीची धामधूम
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीमध्ये येऊन आढावा घेतला. त्यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले की, राज्यातील सत्ता बदलली आहे. मात्र जिल्ह्यातील सरकार बदलले आहे, असे दिसत नाही. हा विषय गांभीर्याने कसा घ्यायचा, हे या मोठ्या व्यासपीठावर सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या अडीच वर्षात भाजप कार्यकर्त्यांनी साधा अर्ज दिला तरी तो फेकून दिला जायचा. आता विरोधी पक्षातील लोक रात्री-अपरात्री भाजप नेत्यांना भेटत आहेत. मी तुमचाच आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. आमची कामे करा, असे ते सांगत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजप नेत्यांना भेटू नये, असे नाही. मात्र यापुढे राजकारण करताना दक्ष रहावे लागणार आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर काही गोष्टी कराव्या लागतील. बूथ पातळीपर्यंत काम करावे लागणार आहे. बऱ्याच तालुक्यात यंत्रणा सक्षम नाही. शेवटच्या काही दिवसांत कार्यकर्ते कमी पडतात. त्यामुळे बूथनिहाय पक्ष संघटन मजबूत करावे लागणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.