आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या राज्यात आम आदमी पार्टीकडून (आप) तयारी केली जात आहे. मात्र हरियाणा राज्यात या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हरिणायातील महत्त्वाचे नेते अशोक तंवर यांनी आपला सोडचिठ्ठी दिली आहे. ते लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान, तंवर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षापासून केली होती. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते आप पक्षाला सोडचिठ्ठी देत लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता निर्णय

आपने अशोक तंवर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्याकडे निवडणूक मोहीम समितीचे अध्यक्षपद होते. मात्र त्यांनी आता पक्षालाच सोडचिठ्ठी दिल्यामुळे आपपुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तसेच अरविंद केजरीवाल यांची काँग्रेस पक्षाशी निर्माण होत असलेली जवळिक पाहता हा निर्णय घेतल्याचे तंवर यांनी सांगितले.

राज्यसभेचे तिकीट मिळेल, अशी तंवर यांना अपेक्षा

गेल्या काही दिवसांपासून अशोक तंवर हे आपपासून दुरावले होते. आप पक्षाकडून राज्यसभेचे तिकीट मिळेल, अशी तंवर यांना अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेस, नंतर आप

तंवर हे दलित समाजातून येतात. विद्यार्थी दशेत असताना ते युवक काँग्रेसमध्ये सक्रिय होते. राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जायचे. २००३ सालापासून पुढचे दोन वर्षे ते काँग्रेसच्या राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

पत्नी अवंतिका गांधी घराण्याच्या जवळच्या

अशोक तंवर यांच्या पत्नीचे नाव अवंतिका आहे. त्यादेखील गांधी घरण्याच्या फार जवळ होत्या. अवंतिका यांचे आई-वडील ललित आणि गीतांजली यांची १९८५ सालच्या जातीय दंगलीत दिल्लीमध्ये हत्या झाली होती. या घटनेनंतर अवंतिका लहान असताना गांधी कुटुंबानेच त्यांचा सांभाळ केला होता.

तंवर यांच्याकडे काँग्रेसचे प्रेदशाध्यक्षपद

२००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत अशोक तंवर यांना सिरसा या मतदारसंघातून तिकीट देण्यात आले. या मतदारसंघातून ते विक्रमी मतांनी विजयी झाले. फेब्रुवारी २०१४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांची हरियाणा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

सोनिया गांधींवर नाराजी, काँग्रेसला सोडचिठ्ठी

मात्र हरियाणात तंवर आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते भूपिंदरसिंह हुड्डा यांच्यात मदभेद व्हायचे. तंवर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी हुड्डा यांच्याकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र तंवर हे गांधी घराण्याच्या जवळचे असल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तंवर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करत दुसऱ्या दलित नेत्याला हे पद दिले. निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील फूट टाळण्यासाठी सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला होता.

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

या निर्णयानंतर अशोक तंवर काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज झाले. त्यांनी २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत जननायक जनता पार्टीच्या अनेक उमेदवारांना उघड पाठिंबा दिला. आगामी काळात त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी अपना भारत मोर्चा या नावाने राजकीय-सामाजिक संघटनेची स्थापना केली होती.

एप्रिल २०२२ मध्ये आपमध्ये प्रवेश

एप्रिल २०२२ मध्ये तंवर यांनी तृणमूलला रामराम करत आपमध्ये प्रवेश केला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते आपपासूनही दुरावले. आता ते लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana aap leader ashok tanwar resigns may soon join bjp prd
Show comments