Kharkhauda Constituency in Haryana Assembly Election 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, आम आदमी पक्ष, जननायक जनता पार्टी अशा सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या ५ ऑक्टोबर रोजी हरियाणामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. शेतकरी आंदोलन, त्यापाठोपाठ झालेलं कुस्तीपटूंचं आंदोलन आणि नुकतंच विनेश फोगटच्या अपात्रतेचा मुद्दा हरियाणात चर्चेत राहिला होता. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये या मुद्द्यांचे पडसाद उमटत असताना दिसत आहेत.

हरियाणात भाजपानं सत्ता कायम राखण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार असलं तरी काही मतदारसंघ हे भाजपासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. हरियाणातील खारखौडा हा त्यातलाच एक मतदारसंघ. खारखौडा मतदारसंघात आजतागायत भारतीय जनता पक्षाला विजय मिळवता आलेला नाही. २००९ साली मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेत हा मतदारसंघ तयार झाला. मात्र, तेव्हापासून दिल्लीच्या सीमेला लागून असणाऱ्या सोनीपत जिल्ह्यातील या मतदारसंघात काँग्रेसचंच प्रामुख्याने वर्चस्व राहिलं आहे.

जातीचं गणित भाजपाच्या पथ्यावर पडेल का?

खारखौडा हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. भाजपानं यंदाच्या निवडणुकीसाठी हरियाणाचे माजी अनुसूचित जाती वित्त व विकास मंडळाचे संचालक पवन खारखोडा यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पवन खारखोडा यांच्या रुपात भाजपाला या मतदारसंघातली कामगिरी सुधारण्याची आशा आहे.

खराखोडा यांनी याआधी २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपलं नशीब आजमावलं होतं. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक अर्ज भरला. यावेळी त्यांनी जननायक जनता पार्टी अर्थात जेजेपीच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण याहीवेळी त्यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव झाला. अखेर आता भारतीय जनता पक्षानं त्यांना या मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.

पवन खारखोडा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये त्यांची आगामी राजकीय वाटचाल, खारखौडा मतदारसंघातील गणितं व त्यांच्या विजयाची समीकरणं याबाबत भाष्य केलं आहे.

यावेळी विजय मिळेल असं का वाटतं?

स्वत: पवन खारखोडा यांना या मतदारसंघातून विजय मिळालेला नाही. शिवाय, भारतीय जनता पक्षालाही हा मतदारसंघ कधी जिंकता आलेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवण्यासाठी कोणती समीकरणं जुळवली आहेत? अशी विचारणा केली असता त्यांनी त्यावर भाष्य केलं. “खारखौडामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. प्रचाराचा आत्तापर्यंतचा प्रवास चांगला राहिला आहे. या मतदारसंघातल्या ५८ गावांमधल्या ३६ समुदायांनी मला पाठिंबा दर्शवला आहे. त्याशिवाय शहरी भाग व जाणकारांकडूनही मला समर्थन मिळत आहे. त्याशिवाय अपक्षांचाही मला पाठिंबा आहे”, असं पवन खारखोडा म्हणाले.

“काँग्रेसचे स्थानिक आमदार जयवीर सिंह यांच्याविरोधातही वातावरण पाहायला मिळत आहे. लोकांना आता जयवीर सिंह यांना हरवायचं आहे. लोकांनीच ही निवडणूक खारखोडा विरुद्ध सिंह अशी केली आहे. शिवाय ही स्थानिक विरुद्ध बाहेरचे अशीही निवडणूक आहे. लोकांचा यावर विश्वास आहे की सिंह यांचा पराभव झाला तरच त्यांच्या समस्या सुटणार आहेत”, असंही पवन खारखोडा यांनी नमूद केलं.

दलित मतांचं गणित कसं जुळवणार?

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या काळात विरोधकांकडून आरक्षण व राज्यघटना हे मुद्दे मोठ्या प्रमाणावर उचलून धरण्यात आले. त्यामुळेच दलित मतदान इंडिया आघाडीकडे वळल्याचं सांगितलं जात असून आता तुम्ही अनुसूचित जातींच्या मतदारांना कसं सामोरं जात आहात? असा प्रश्न खारखोडा यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज्यघटना गीतेपेक्षा श्रेष्ठ असल्याचं नमूद केलं. “भारतीय जनता पक्षासाठी राज्यघटना हा एक पवित्र ग्रंथ आहे. याचा अर्थ आम्हाला राज्यघटना ही भगवदगीतेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. भाजपा कधीही राज्यघटना बदलू देणार नाही. त्याउलट काँग्रेसनंच १९७५ साली राज्यघटनेला धक्का पोहोचवला आणि आणीबाणी लागू केली. त्यांनी शेकडो वेळा राज्यघटना बदलली”, असं ते म्हणाले.

काँग्रेस प्रवेशानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या गावात नाराजी, विनेश फोगटच्या गावात मात्र सहानुभूती; गावकरी म्हणतात…

कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा किती परिणाम?

गेल्या वर्षभरात महिला कुस्तीपटूंनी भाजपाचे माजी खासदार ब्रिज भूषण शरण सिंह यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केलं. त्याचा कितपत परिणाम यंदाच्या हरियाणातील निवडणुकीत होईल? असा प्रश्न करताच पवन खारखोडा यांनी तसा परिणाम दिसणार नसल्याचं म्हटलं. “कुस्तीपटू व इतर खेळाडूंनी आपल्या देशासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या देशाचा आणि तिरंग्याचा गौरव केला आहे. एखाद्या व्यक्तीमुळे जर काही समस्या निर्माण झाली, तर तिचा व्यापक स्तरावरच्या परिणामाशी काही संबंध नसतो. अनेकदा तो विचारसरणींचा लढा ठरतो. काँग्रेसकडून या आंदोलनाचं राजकीयीकरण करण्यात आलं होतं. भाजपा कायमच कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे”, असा दावा पवन खारखोडा यांनी केला.

Live Updates