Haryana Assembly Election 2024 CM Candidate: हरियाणा विधानसभेसाठी मतदान (दि. ५ ऑक्टोबर) पार पडल्यानंतर आता ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची प्रतीक्षा सुरू झाली आहे. तत्पूर्वी मतदान संपताच अनेक माध्यमांनी त्यांचे एग्झिट पोल्सचे अंदाज जाहीर केले. बहुतेक एग्झिट पोल्सनी हरियाणाची सत्ता काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सत्ता मिळणार, पण मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. शनिवारी मतदान पार पडत असताना काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी बहुमत मिळणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी स्वतःला उघडपणे मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द इंडियन एक्स्प्रेसने यासंबंधात एक लेख प्रकाशित केला आहे. ज्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी रस दाखविला त्यांनी हेही सांगितले की, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत, विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते भूपिंदरसिंह हुडा. २००५ ते २०१४ या काळात ते दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

हे वाचा >> Haryana Exit Polls: ‘एग्झिट’ पोलमधून विनेश फोगटच्या राजकीय ‘एंट्री’वर शिक्कामोर्तब? आमदारकीचं पदक गळ्यात पडण्याचा अंदाज!

माध्यमांशी बोलताना ७७ वर्षीय हुडा म्हणाले की, मी अद्याप निवृत्ती घेतलेली नाही. राज्यात काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन करणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे. दुसरीकडे त्यांच्या प्रतिस्पर्धी सिरसा लोकसभेच्या खासदार, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा यादेखील मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार मानल्या जातात. राज्यातील आघाडीच्या दलित नेत्या आणि गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.

माजी केंद्रीय मंत्री, खासदार कुमारी शैलजा इच्छुक

६२ वर्षीय शैलजा माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “माझा आतापर्यंतचा दीर्घ अनुभव आणि काँग्रेसशी असलेली माझी एकनिष्ठा नजरआड केली जाणार नाही, असे मला वाटते. मी काँग्रेसची एक प्रामाणिक सैनिक आहे आणि मी कायम पक्षाबरोबरच राहणार आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे मात्र पक्षश्रेष्ठीच ठरवतील, यात दुमत नाही.”

हे वाचा >> कोण आहेत कुमारी शैलजा?; हरियाणातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आहे मोठी मालमत्ता, पक्षात नाराज असल्याची चर्चा

दीपेंदरसिंह हुडांनीही दिले संकेत

काँग्रेसच्या वर्तुळात अशीही चर्चा आह की, भूपिंदर हुडा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यास त्यांचा मुलगा आणि रोहतकचा खासदार दीपेंदरसिंह हुडा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून पुढे येईल. शैलजा यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला असताना दीपेंदरसिंह हुडा म्हणाले की, शैलजा यांनी जे काही सांगितले त्यात काहीच चूक नाही. काँग्रेस पक्षात एक पद्धत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आधी बहुमताचा आकडा गाठणे, ही पक्षाची प्राथमिकता असेल. त्यानंतर पक्षश्रेष्ठी निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतील. निवडून आलेल्या आमदारांचा सल्ला घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय जाहीर करतील.

प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवालाही स्पर्धेत

राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी शनिवारी मतदान केल्यानंतर म्हटले, “मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणे यात गैर काहीच नाही. राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.” ५७ वर्षीय सुरजेवाला हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधील प्रबळ दावेदार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडा यांचे निकटवर्तीय आणि दलित नेते उदय भान हेदेखील स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याचे सांगतात. द इंडियन एक्स्प्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय भान यांनी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय नेत्यांच्या बैठकीत दलित नेत्याला मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी केली होती. वरील सर्व नेत्यांनी प्रचारादरम्यान स्वतःच्या मुख्यमंत्रिपदाची इच्छा दाबून ठेवली नाही. काँग्रेसच पुन्हा सत्ता स्थापन करेल, या आत्मविश्वासातून त्यांनी काही विधानं केली आहेत.

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, काँग्रेस पक्षश्रेष्ठी २००५ प्रमाणे यंदाही अनपेक्षितपणे नवे नेतृत्व समोर आणू शकते. तेव्हा पक्षाने ६७ जागा जिंकल्या होत्या आणि भजनलाल मुख्यमंत्री बनण्यासाठी तयार होते, पण शेवटच्या क्षणी काँग्रेसने भूपिंदरसिंह हुडा यांचे नाव जाहीर केले. पण एक गोष्ट मात्र नक्की की, हुडा हे भजनलाल नाहीत आणि काँग्रेस श्रेष्ठींना ही बाब माहीत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana assembly election 2024 congress faces a problem of plenty as cm aspirants swell kvg