Haryana Assembly Election 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांत राज्यातील काँग्रेसमधली दुफळी उघड झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एकीकडे निश्चित मानला जाणारा विजय हाती का आला नाही? यावर काँग्रेस पक्षात चर्चा व विचारमंथन चालू असताना दुसरीकडे पक्षात या पराभवामुळे दुफळी निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. खुद्द काँग्रेसच्या राज्यातील खासदार कुमारी सेलजा यांनीच आपल्याला प्रचार करू दिला नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात हरियाणा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांनुसार भाजपाला ५० जागांवर विजय मिळाला असून पूर्ण बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे काँग्रेसला ३४ जागा जिंकता आल्या आहेत. अपक्ष व इतर अशा ६ जागा निवडून आल्या आहेत. निवडणूक निकालांआधी काँग्रेसचाच यंदा विजय होणार असून भाजपाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, असाच अंदाज वर्तवला जात होता. एग्झिट पोल्समध्येही तशाच स्वरूपाची आकडेवारी समोर आली होती. पण प्रत्यक्षात निकाल भाजपाच्या बाजूने लागल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कुमारी सेलचा यांचा गंभीर आरोप

दरम्यान, या निकालांच्या पार्श्वभूमीवर हातातोंडाशी आलेला विजय कसा दूर लोटाला गेला, याचं विश्लेषण पक्षात सुरू झालं असून त्यात पहिला आरोप पक्षाच्या खासदार व अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीस कुमारी सेलजा यांनी केला आहे. आमचा किती वाईट पराभव झालाय, यावर विश्वास बसत नाही असं म्हणताना सेलजा यांनी या पराभवासाठी पक्षाची हरियाणातील संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

“राहुल गांधींनी विजयासाठीचं जे काही मैदान तयार करून दिलं होतं, त्याचा योग्य प्रकारे फायदा घेण्यात राज्य काँग्रेस अपयशी ठरली. आमचा किती वाईट पराभव झालाय यावर विश्वास बसत नाहीये”, असं त्या म्हणाल्या आहेत. त्यांचा रोख प्रामुख्याने हरियाणातील पक्षाचे प्रभारी दीपक बाबारिया, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष उदयभान, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते भूपिंदर सिंग हुड्डा व त्यांचे पुत्र आणि रोहतकचे खासदार दीपंदर हु्ड्डा यांच्या दिशेने असल्याचं मानलं जात आहे.

सेलजा तीन आठवडे प्रचारातून गायब!

लोकसभेत काँग्रेससाठी विजय साकार करणाऱ्या कुमारी सेलजा या हरियाणातील मतदानाच्या तीन आठवडे आधी संपूर्ण प्रचार कार्यक्रमातूनच गायब असल्याचं पाहायला मिळालं. त्यासंदर्भात त्या म्हणाल्या, “मग त्यांनी मला प्रचार का करू दिला नाही? पक्षाच्या राज्यातील संघटनेनं तिकीट वाटपाबाबतचे निर्णय घेताना एकाधिकारशाही पद्धतीने निर्णय का घेतले? मी फक्त शांत बसले. मी आणखी काय करू शकणार होते? की मग मी तिथल्या तिथे मोठ्यानं हसून मोकळं व्हायला हवं होतं? तथाकथित धोरणकर्त्यांनी सगळी सूत्रं त्यांच्या हातात ठेवली. आम्ही फक्त सांगत राहिलो की पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. पण त्यावर काहीही झालं नाही”, असं त्या म्हणाल्या.

“हाय कमांडनं काहीही केलं नाही”

दरम्यान, हाय कमांडला सगळं सांगूनही त्यांनी काहाही केलं नसल्याचा आरोप कुमारी सेलजा यांनी केला. “हाय कमांडनं आम्हाला बोलवलं. आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आम्ही त्यांना आमच्या पसंतीच्या उमेदवारांची यादीही दिली. पण त्यावर त्यांनी काहीच केलं नाही. आता लागलेले निकाल आपल्या सगळ्यांसमोर आहेत”, असं त्या म्हणाल्या.

पक्षात गटबाजी आहे का? सेलजा म्हणाल्या..

पक्षात गटबाजी असल्याच्या चर्चेला त्यांनी दुजोरा दिला. “हे तर उघडच होतं की ते (पक्षाचे राज्यातील नेते) माझ्याशी बोलत नाहीत. बाबरिया यांनी तर जाहीरपणे सांगितलंय की ते माझ्याशी बोलत नाहीत. ते सुद्धा त्यांच्याच बाजूला होते. याशिवाय आमचे महान दलित नेतेदेखील (भान) या निवडणुकीत पराभूत झाले आहेत”, अशा शब्दांत सेलजा यांनी काँग्रेसच्या हरियाणातील नेत्यांवर आगपाखड केली.

पक्षाचा पराभव का झाला? सेलजा यांची हुड्डांवर टीका

“लोक आम्हाला काय दाखवायचा प्रयत्न करत होते, हे पाहण्यात आम्ही अपयशी झालो. फक्त लोकांचा एक गट आम्हाला जे दाखवू इच्छित होता, तेच आम्ही पाहिलं. जर आम्ही ते गांभीर्यानं घेतलं असतं, तर आम्ही काही गोष्टी व्यवस्थित केल्या असत्या, तर आज वेगळे निकाल लागले असते. हुड्डांनी अनेक पक्ष कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचं आश्वासन दिलं. पण तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी शेवटी निवडणूक काळात बंडखोरी केली. कदाचित त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नसेल किंवा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूकही लढवली नसेल. पण ते सगळे एक बंडखोर म्हणूनच आपापल्या मतदारसंघात काम करत होते”, अशा शब्दांत कुमारी सेलजा यांनी काँग्रेसच्या पराभवाचं विश्लेषण केलं.

Video: हरियाणातील निकालांचा नेमका काय अर्थ घ्यायचा? योगेंद्र यादव यांनी केलं विश्लेषण; म्हणाले, “आता भाजपा…”!

“पक्षाच्या धोरणकर्त्या गटानं जे काही चित्र निर्माण केलं आणि ज्याचं नियोजन त्यांच्या गटानंच केलं, त्यामुळे आजची परिस्थिती उद्भवली आहे. कुणीही मला काही विचारलं नाही. कुणीही माझं काही ऐकलं नाही. त्यांचे स्वत:चेच सर्व्हे, त्यांचे स्वत:चेच निष्कर्ष, त्यांच्याच पसंतीचे उमेदवार.. सगळंच बिघडलं. त्यांनी हरियाणाला गृहीत धरायला नको होतं. अगदी जाट मतदारांनीही यावेळी काँग्रेसला मत न देता भाजपाला पसंती दिली. आता याचं तुम्ही कसं विश्लेषण करणार?” असा प्रश्नच कुमारी सेलजा यांनी उपस्थित केला आहे.

उमेदवार जाहीर झाल्यापासून सेलजा गायब!

हरियाणातील उमेदवार जाहीर झाल्यापासून कुमारी सेलजा काँग्रेसच्या निवडणूक कार्यक्रमापासूनच लांब गेल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांनी जवळपास दोन आठवडे पक्षाचा प्रचारच केला नाही. २६ सप्टेंबर रोजी राहुल गांधींनी असंधमध्ये पहिली प्रचारसभा घेतली, तेव्हाच त्या प्रचारसभेत दिसल्या. त्यानंतरही त्यांनी ३ ऑक्टोबरपर्यंत अगदी मोजक्याच सभांना हजेरी लावली.

इतर नेत्यांचीही हुड्डांवर टीका

कुमारी सेलजा यांच्याप्रमाणेच पक्षाच्या आणखी एक माजी ज्येष्ठ नेत्या किरण चौधरी यांनीही भूपिंदर सिंग हुड्डा यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप केला होता. हुड्डांशी मतभेदांमुळेच किरण चौधरी व त्यांच्या कन्या श्रृती यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. किरण सध्या भाजपाच्या तिकिटावर राज्यसभेवर असून त्यांच्या कन्या श्रृती या तोशम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.