Haryana BJP News : हरियाणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील एका तरुणीच्या तक्रारीनंतर हिमाचल प्रदेश पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यावरून काँग्रेसह विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. तर ब्राह्मण समुदायातील एका गटाने बडोली यांच्यावरील आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी बडोली यांच्या समर्थनार्थ हरियाणात मोर्चा देखील काढला आहे. मोहनलाल बडोली यांच्या राजकीय कारकीर्दीला कलंकीत करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
बडोली यांच्या समर्थनार्थ ब्राह्मण समुदाय एकवटला
“भाजपा प्रदेशाध्यक्षांची राजकीय प्रतिमा स्वच्छ असून ते सुसंस्कृत नेते मानले जातात. त्यांना बीडीचेही व्यसन नाही. मोहनलाल बडोली यांना हरियाणा भाजपाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त होण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी रचलेलं हे षडयंत्र आहे”, असंही ब्राह्मण समुदायातील गटाचं म्हणणं आहे. अलिकडेच उचाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिंद ब्राह्मण सभेचे माजी सरचिटणीस रामचंद्र अत्री म्हणाले, “मोहलाल बडोली यांनी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला पुन्हा सत्तेत आणण्याची किमया करून दाखवली. त्यामुळे काही लोकांना त्यांची प्रगती पचवता येत नाही. कदाचित त्यांच्याच पक्षातीचे कार्यकर्ते हे बडोली यांचे विरोधक असतील.”
तरुणीने भाजपा प्रदेशाध्यक्षांवर काय आरोप केले?
दरम्यान, बडोली यांच्या समर्थनार्थ ब्राह्मण समुदायाने जिंद जिल्ह्यात पाच दिवसांत पाच पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. तसेच हिसार आणि गोहाणामध्येही माध्यमांशी संवाद साधला आहे. मोहनलाल बडोली आणि हरियाणातील गायक जय भगवान उर्फ रॉकी मित्तल यांच्यावर एका तरुणीने सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. तक्रारदार तरुणी मूळ दिल्लीतील रहिवासी असून ३ जुलै २०२४ रोजी तिच्या मित्राबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला आली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी वेगवेगळी प्रलोभनं दाखवून मला एका हॉटेलमध्ये नेलं. तिथे माझ्यावर सामूहिक बलात्कार केला, असं तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं.
काँग्रेस नेत्यांची भाजपा सरकारवर टीका
तरुणीच्या तक्रारीनंतर गेल्यावर्षी १३ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेश पोलिसांनी मोहनलाल बडोली आणि गायक जय भगवान उर्फ रॉकी मित्तल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. भाजपा प्रदेशाध्यक्षांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल होताच विरोधी पक्षांनी त्यांच्या अटकेची मागणी जोरकसपणे लावून धरली आहे. सामाजिक आणि कामगार संघटनांनी जिंद, भिवानी आणि रोहतक या तीन जिल्ह्यांमध्ये निदर्शनेही केली आहे. काँग्रेसचे रोहतकचे खासदार दीपेंदर सिंग हुड्डा म्हणाले, “या प्रकरणाने भाजपा नेत्यांचा खरा चेहरा आणि चारित्र्य उघड केलं आहे. एकीकडे भाजपा नेते ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ असा नारा देतात आणि दुसरीकडे महिलांवर अत्याचार करतात.”
भाजपाने संघटनात्मक निवडणुका पुढे ढकलल्या
दरम्यान, या मुद्द्यामुळे भाजपाला हरियाणातील पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. जानेवारीमध्ये भाजपाच्या संघटनात्मक निवडणुका होणार होत्या. मात्र, आता त्या थेट फेब्रुवारीतील नगरपालिकेच्या निवडणुकांनंतर होणार आहेत. ब्राह्मण समाज बडोली यांना दिलेला उघड पाठिंबा देऊन विरोधकांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. हिसार जिल्ह्यातील ब्राह्मण सभेचे अध्यक्ष राजकुमार भारद्वाज म्हणाले, “बडोली यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा एका कटाचा भाग आहे. आम्ही त्यांच्यासोबत एकजूटपणे उभे आहोत आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करीत आहोत. जर चौकशीशिवाय त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली तर आम्ही याचा तीव्र विरोध करू आणि रस्त्यावर उतरून आंदोलनं करू.”
बडोली यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी
गोहानातील ब्राह्मण समाज कल्याण समितीचे सचिव राजकुमार फौजी म्हणाले की, “सहा महिन्यांपूर्वी एका खासदाराला अशाच एका प्रकरणात अडकवण्यात आले होते. मोहनलाल बडोली यांना याप्रकरणात कोणी आणि का गोवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपा प्रदेशाध्यक्षांची प्रतिमा स्वच्छ असून त्यांना बीडीचेही व्यसन नाही. राजकीय भविष्य उज्ज्वल असल्याने त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न होत आहे. सीबीआयने या प्रकरणाची खोलवर चौकशी करायला हवी, असंही ते म्हणाले. दरम्यान, “प्रत्येक मुलगी सीता किंवा सावित्री नसते,” असं कांडेलाचे माजी सरपंच दिलीप भारद्वाज यांनी जिंद येथील ब्राह्मण धर्मशाळेतील बैठकीत म्हटलं आहे. मोहनलाल बडोली यांच्यावरील गुन्हा तातडीने रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा : Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?
मोहनलाल बडोली कोण आहेत?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले मोहनलाल बडोली २०१९ मध्ये पहिल्यांदाच आमदार झाले. त्यांनी राय विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जय तीरथ यांचा दोन हजार ६६३ मताधिक्याने पराभव केला. राजकारणात येण्यापूर्वी बडोली हे कापड विकण्याचा व्यवसाय करत होते. सोनीपतजवळील बहलगडच्या कापड बाजारात त्यांचे दुकान होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना सोनीपतमधून उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेस उमेदवार सतपाल ब्रह्मचारी यांनी त्यांचा जवळपास २२ हजार मताधिक्याने त्यांचा पराभव केला. यानंतर भाजपाने राज्यातील नेतृत्वात मोठे फेरबदल केले आणि विद्यमान मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या जागी मोहनलाल बडोली यांची प्रदेशाध्यपदी नियुक्ती केली.
बडोली यांच्या राजीनाम्याची भाजपातून मागणी
पक्षाचा ब्राह्मण चेहरा असलेल्या बडोली यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला आणि भाजपाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बडोली यांचा राजीनामा मागणाऱ्या पक्षाच्या नेत्यांमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राज्य परिवहन मंत्री अनिल वीज यांचा समावेश आहे. “पक्षाचे पावित्र्य राखण्यासाठी बडोली यांनी राजीनामा देणे गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यसभा खासदार सुभाष बारला यांनी देखील बडोली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पक्ष नेतृत्व योग्य निर्णय घेईल, अशी त्यांना आशा आहे. दुसरीकडे मोहनलाल बडोली यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बडोली यांच्या पत्नी गीता कौशिक यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.