लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच कारणामुळे हरियाणआमध्ये भाजपा, काँग्रेससह सर्व स्थानिक पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सध्या येथे भाजपा-जेजेपी पक्षांचे युतीचे सरकार आहे. मात्र आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढणार, की एकत्रच निवडणुकीला सामोरे जाणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. असे असतानाच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षाचे प्रभारी योग्य तो निर्णय घेतील- खट्टर

भाजपा-जेजेपी यांच्यातील युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत विचारले असता खट्टर यांनी हरियाणा भाजपाचे प्रभारी बिप्लब देब हेच याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे म्हणत प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे टाळले. “बिप्लब देब हे आमच्या पक्षाचे प्रभारी आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका आणि पक्षाचे हित समोर ठेवून ते योग्य तो निर्णय घेतील. सध्यातरी भाजपा-जेजेपी या दोन पक्षांत युती कायम आहे,” असे खट्टर म्हणाले आहेत.

हेही वाचा >> सुधीर मुनगंटीवार गटाचे वर्चस्व; हंसराज अहीर समर्थकांना डावलले!

जनहित समोर ठेवूनच युती केली होती- खट्टर

बिप्लब देब यांनी चार अपक्ष आमदार आणि हरियाणा लोकहित पार्टीचे आमदार गोपाल कांडा यांच्याशी बैठक घेतली. या बैठकीचे वृत्त आल्यानंतर खट्टर यांनी शनिवारी (१० जून) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपा आणि जेजेपी यांच्यातील युतीवर भाष्य केले. “आम्ही याआधीची निवडणूक युतीत लढवली नव्हती. २०१९ च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे जनतेचे हित समोर ठेवून ही युती केली होती. आमच्यात चर्चा झाल्यानंतर जेजेपी पक्ष युती करण्यास राजी झाला होता. काही अपक्ष आमदारांनीदेखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेकडे अवघे ३० आमदार होते,” असे खट्टर यांनी सांगितले.

बिप्लब देव यांची माझ्याशी वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा- खट्टर

“पक्षाचे हित लक्षात घेऊन आगामी काळात काय निर्णय घ्यायचा हे आमच्या पक्षाचे प्रभारी ठरवतील. बिप्लब देब यांनी काही अपक्ष आमदारांसोबत बैठक का घेतली, याचे उत्तर तेच देऊ शकतात. त्यांनी माझीदेखील भेट घेतली. मात्र या भेटीत आम्ही वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली,” अशी माहितीही खट्टर यांनी दिली.

हेही वाचा >> अमित शहांच्या भाषणात उद्धव ठाकरेंचा ११ वेळा उल्लेख

‘युतीचा निर्णय दिल्लीतूनच होईल’

देब यांनी अपक्ष आमदार रंजित सिंह यांचीदेखील भेट घेतली होती. सध्या रंजित सिंह खट्टर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. ४५ मिनिटे चाललेल्या या बैठकीत विधानसभेचे अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता उपस्थित होते. या बैठकीनंतर रंजित सिंह यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “भाजपा आणि माझ्यातील संबंधांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपा आणि जेजेपी यांच्यातील युतीसंदर्भातील निर्णय हा दिल्लीतूनच घेतला जाईल. माझ्याशी या युतीसंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही,” असे रंजित गुप्ता यांनी सांगितले.

आम्ही लोकसभेच्या सर्व जागांवर लढण्याची तयारी केली- दुष्यंत चौटाला

हरियाणा येथे घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर जेजेपीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपा आणि आमच्यात युती झालेली आहे. ही युती करताना कोणीही कसलेही आश्वासन दिलेले नाही. सध्या राज्यात स्थिर सरकार असून आमची युती शाबूत आहे. भविष्यात काही विचार बदलले तर मी त्यावर काय भाष्य करू शकतो. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीचा विचार करायचा झाल्यास आम्ही आमची तयारी सुरू केलेली आहे. आम्ही लोकसभेच्या सर्व १० जागांवर लढण्याची तयारी केली आहे. येत्या १ जुलैपासून आम्ही त्यासाठी प्रचार करणार आहोत,” असे चौटाला यांनी सांगितले.

हेही वाचा >> संजीव नाईकांचा स्वप्न भंग ?

दरम्यान, मागील काही दिवसांपासून या दोन पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जेजेपीचे शाहबाद मतदारसंघातील आमदार रामकरण काला यांनी राज्य ऊस महामंडळाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. ६ जून रोजी काही शेतकरी सूर्यफुलाला हमीभाव देण्याची मागणी करत आंदोलन करत होते. या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला होता. पोलिसांच्या याच कारवाईच्या निषेधार्थ आमदार काला यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. हाच संदर्भ घेत नंतर मनोहरलाल खट्टर यांनी टीकात्मक भाष्य केले. एका व्यक्तीने राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. मात्र हा राजीनामा माझ्यापर्यंत अद्याप आलेला नाही, असे खट्टर म्हणाले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana election bjp jjp alliance manoharlal khattar comment prd
Show comments