Haryana Election : हरियाणा राज्यात सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. ५ ऑक्टोबर रोजी हरियाणामध्ये विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, असं असलं तरी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यापासून भाजपाला धक्यावर धक्के बसत आहेत. उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यापासून अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. हरियाणा राज्य महिला मोर्चाच्या सरचिटणीस गायत्री देवी यांनी देखील भाजपाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर गायत्री देवी यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा हे देखील उपस्थित होते. दरम्यान, गायत्री देवी यांना भारतीय जनता पक्षाने हांसी मतदारसंघामधून तिकीट नाकारल्यामुळे त्या नाराज झाल्याचं बोललं जात होतं. गायत्री देवी यांनी भाजपा का सोडली? याचं कारण इंडियन एक्स्प्रेसशी बोलतना सांगितलं आहे.

हेही वाचा : BJP leaders : हरियाणात भाजपा नेत्यांविरोधात निदर्शनं; शेतकऱ्यांचा रोष भाजपाला भोवणार?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात तुम्ही दावा केला होता की, तिकीट वाटपादरम्यान महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, तसेच भाजपात नेहमीच असे होते का? असा प्रश्न विचारण्यात आला गायत्री देवी यांनी सांगितलं की, “२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षा लतिका शर्मा यांना कालका येथून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, इतर कोणालाही देण्यात आलेली नाही. याआधीही विधानसभा निवडणुकीत भाजपाने महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली नव्हती. यावेळी लतिका शर्मा यांनी विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने पक्षावर टीकाही केली होती. तसेच हरयाणाच्या माजी आमदार आणि मंत्री कविता जैन यांनीही तेच केले”, असं त्या म्हणाल्या.

महिला कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचेही तुम्ही तुमच्या पत्रात म्हटलं आहे? या प्रश्नावर बोलताना गायत्री देवी म्हणाल्या, “हो खूप अन्याय झाला. मी माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून (ABVP) केली. तसेच संघ परिवाराशी संबंधित कुटुंबामधून इथपर्यंत आले. मी हरियाणामध्ये महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस आणि भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) चे राज्य उपाध्यक्ष अशी पदे देखील भूषवली आहेत. २०१४ मध्ये मी तिकीट मागितले तेव्हा मला सरकार स्थापन होईपर्यंत थांबा असे सांगण्यात आले होते. त्यामुळे ते मान्य केले होते. त्यानंतर पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे आता मी इतर कशाचाही विचार न करता हा निर्णय घेतला. कारण माझा स्वाभिमान पुन्हा पुन्हा दुखावला जात होता. भाजपामध्ये कार्यकर्त्यांचे कोणी ऐकत नाही. पंचायतींमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्याचे सांगून त्यांचे नेते केवळ मोठमोठी भाषणे करतात. पण ज्या महिलांनी आपले स्थान निर्माण केले त्यांना जागा मिळाली का? भारतीय जतना पक्ष फक्त केवळ आमदारांच्या पत्नींना किंवा आमदारांच्या मुलांच्या उमेदवारी देते. मग घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय?”, असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली

तुम्ही हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी तिकीटाची अपेक्षा करत आहात का? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, मला माझ्या नावाची चर्चा असल्याने हंसी मतदारसंघामधून मला तिकीट मिळण्याची आशा होती. मात्र त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी असतानाही हांसी विधानसभा मतदारसंघातून विनोद भयाना यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी मतदारसंघात फक्त वसाहती स्थापन करण्याच काम केलं आहे. खरं तर हांसी हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे, कारण येथे पृथ्वीराज चौहान यांचा किल्ला आहे, असं गायत्री देवी यांनी सांगितलं.

तुम्ही म्हणालात की अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दीनदयाळ उपाध्याय आणि सुषमा स्वराज यांच्या काळात भाजपा पक्ष जसा होता, तसा आता राहिला नाही. याबाबत काय सांगाल? त्या म्हणाल्या, “एकेकाळी भाजपा हा ‘संघटन’वर आधारित पक्ष होता. पण आज तो भांडवलदारांचा पक्ष झाला आहे. हरियाणा असो, महाराष्ट्र असो वा राजस्थान, पक्ष १०-१५ लोक चालवतात. मी बूथ स्तरावरून पक्ष पाहिला आहे आणि त्यावर आधारित माझा निष्कर्ष आहे.”

भाजपा सरकारमध्ये गरीब आणि शेतकरी अडचणीत आल्याचा तुमचा आरोप आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे? तुम्ही हा मुद्दा आधी का काढला नाही? यावर गायत्री देवी यांनी म्हटलं की, “आपण चुकीचे काम करत आहोत, याची जाणीव मी वरिष्ठ नेत्यांना करून दिली होती. माझे सासरे शेतकरी आहेत आणि मी तीन युद्धात लढलेल्या सैनिकाची मुलगी आहे. माझे काका आणि आजोबाही सैन्यात होते. काय आहे ही अग्निवीर योजना? अवघ्या चार वर्षांसाठी आपल्या मुलाला सैन्यात कोण पाठवणार? शेतकरी आंदोलन करत होते आणि महिला खेळाडू देखील आंदोलन करत होत्या. काही अंतर्गत समस्या असतील. मात्र, जे झाले ते चुकीचे होते. शेवटी महिला कुस्तीपटू आमच्या मुली आहेत”, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीबद्दल तुमचे काय आकलन आहे? यावर त्या म्हणाल्या, “काँग्रेस हरियाणा जिंकेल”, असंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana election general secretary of bjps state mahila morcha gayatri devi joins congress gkt