Haryana Election Result : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे हरियाणात भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे, तर या निवडणुकीत काँग्रेस बहुमत गाठेल, अशी शक्यता सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तविली होती. मात्र ८ ऑक्टोबर रोजी समोर आलेल्या मोतमोजणीच्या काही तासांतच भाजपाने आघाडी गाठली आणि मतमोजणी पूर्ण होईपर्यंत त्यांनी बहुमताचा आकडा पार केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. कारण हरियाणाच्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. दरम्यान, हा निकाल हरियाणा राज्याचा असला तरी खरी धडकी आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला भरली आहे. कारण हरियाणात आप आदमी पक्षाला खातेही उघडता आलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरियाणात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीबरोबर न जाता आम आदमी पक्षाने स्वबळावर ८९ जागांवर निवडणूक लढवली होती. आता या ८९ उमेदवारांपैकी एक उमेदवार वगळता सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले आणि एकही उमेदवार निवडून आला नाही. यातच पुढील चार महिन्यांत राजधानी दिल्लीत देखील विधानसभेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. दिल्लीच्या आगामी निवडणुका पाहता आम आदमी पक्षाने तयारीही सुरु केली. मात्र, असं असतानाच आम आदमी पक्षाला (AAP) हरियाणामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीत हरियाणातील निकालाचा काही परिणाम होणार का? दिल्लीच्या निवडणुकीतही आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार की काँग्रेसला बरोबर घेणार? असे अनेक प्रश्न आता आम आदमी पक्षा समोर उभे राहिले आहेत.

हेही वाचा : पराभवानंतरचे धक्के, हरियाणा काँग्रेसमधील दुफळी उघड; कुमारी सेलजा म्हणाल्या, “मला प्रचारच करू दिला नाही”!

हरियाणा निवडणुकीत तब्बल एक महिन्यांपासून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया, संजय सिंह, राघव चढ्ढा यांच्यासह पक्षाचे राज्यातील स्थानिक नेते विविध मतदारसंघात प्रचार करत होते. एवढंच नाही तर निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केजरीवाल आणि सिसोदिया यांनी आपल्या भाषणात असंही म्हटलं होतं की, कोणाच्याही पाठिंब्याशिवाय आपलं सरकार हरियाणात स्थापन होईल. मात्र, सरकार स्थापन होणं हे दूर राहीलं आणि जवळपास सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं.

दरम्यान, एका निवेदनात आम आदमी पक्षाने असं म्हटलं होतं की, हरियाणाच्या निकालाचा दिल्ली निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. भारतीय जनता पक्षाने २०१४ आणि २०१९ मध्ये हरियाणाच्या निवडणुका जिंकल्या. मात्र, त्या निकालाचा दिल्लीवर परिणाम झाला नव्हता. दिल्लीत कामाच्या राजकारणाला मतं मिळतं, पोकळ आश्वासनांसाठी नाही. दिल्लीचे हृदय अरविंद केजरीवाल यांच्यासाठीच धडधडते हे भाजपाने समजून घेतले पाहिजे, असं म्हणत आम आदमी पक्षाने एकप्रकारे भाजपावर हल्लाबोल केला.

दरम्यान, आम आदमी पक्षातील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष कुरुक्षेत्र तसेच पंजाबच्या सीमेवरील जागांवर चांगली कामगिरी करेल अशी आशा होती. मात्र, ‘आप’च्या हाती निराशा आली. हरियाणातील जगाधरी ही एकमेव जागा होती, जिथे आम आदमी पक्षाने त्यांचे डिपॉझिट गमावले नाही. त्या मतदरासंघात ‘आप’चे उमेदवार आदर्श पाल सिंह यांना ४३,८१३ मते मिळाली, तर हरियाणात ‘आप’ला एकही जागा मिळाली नाही. ९० जागांपैकी ११ जागांवर ‘आप’चा तिसरा क्रमांक होता.

हेही वाचा : हरियाणात पराभव होताच, काँग्रेसची मित्रपक्षांकडून कोंडी; शिवसेना, सपा, तृणमूल, द्रमुक पक्षानं सुनावलं

हरियाणा निवडणुकीच्या आधी महिनाभरापूर्वी राज्यातील आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमधील आघाडीची चर्चा जागावाटपावरून तुटली. हरियाणाचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर ‘आप’ने राज्यात परस्पर फायदेशीर निर्णय घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. मतांची मोजणी सुरू असताना केजरीवाल यांनी दिल्लीतील पक्षाच्या नगरसेवकांना संबोधित करताना ताशेरे ओढले होते. हरियाणातील अंतिम निकाल काय ते पाहूया? मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे की, सर्वात मोठा धडा म्हणजे निवडणुकीत कधीही अतिआत्मविश्वास ठेवू नये, असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले होते.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी म्हटलं की, काँग्रेस सर्वांना बरोबर घेण्यात अपयशी ठरली. आम्ही म्हटलं होतं की, एकत्र येऊन भाजपाचा पराभव करू. समाजवादी पक्षानेही प्रयत्न केले. पण असं झालं असतं तर काँग्रेसचे सरकार आले असते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. मात्र, काँग्रेसने कोणालाही बरोबर घेतले नाही, असं संजय सिंह यांनी म्हटलं. या निवडणुकीबाबत बोलताना एका नेत्याने म्हटलं की, २०१९ मध्ये आम्ही पहिल्यांदा हरियाणात निवडणूक लढवली तेव्हा परिस्थिती वेगळी होती. यावेळी प्रचाराला म्हणावा तसा जोर नव्हता. हरियाणात इतक्या कमी मतदानामुळे लोक नक्कीच चिंतेत आहेत. हरियाणात आम आदमी पक्षाला फक्त १.७ टक्के मते मिळाली आहेत. दरम्यान, आता दिल्लीत आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या आघाडीचे काय होणार? याबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana election result deposits of 88 candidates of aam aadmi party in haryana assembly elections seized arvind kejriwal tension increased in delhi politics gkt