यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांमध्ये जोरदार दणका बसला आहे. त्यातील महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यांमध्ये आता लवकरच विधानसभेच्या निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील वातावरणाचा परिणाम या दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीवर पडणे साहजिक आहे. हरियाणामध्ये त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. हरियाणामध्ये पक्षांतर, पदयात्रा, कल्याणकारी योजनांची खैरात अशा सर्व प्रकारच्या घडामोडी शिगेला पोहोचल्या आहेत. राज्यातील जातींची समीकरणे आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्नही सत्ताधारी भाजपाकडून केले जात आहेत. विरोधक आणि सत्ताधारी आघाड्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे निवडणूक तोंडावर असल्याचे वातावरण हरियाणामध्ये जाणवताना दिसत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हरियाणामध्ये भाजपाने सुमार कामगिरी केली असून, पक्षाच्या जागा १० वरून पाचवर घसरल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमधील त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न भाजपाकडून केले जात आहेत. ६ जूनला लोकसभा निवडणुकीमुळे लागू असलेली आदर्श आचारसंहिता हटविण्यात आली आणि तेव्हापासून आजतागायत मुख्यमंत्री नायब सिंह सैनी जवळपास दररोजच कल्याणकारी योजनांची घोषणा करीत आहेत. भाजपाने ओबीसी चेहरा असलेल्या नायब सिंह सैनी यांनाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंचकुला येथे पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सुमारे ४,५०० भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली असून, लवकरच अशीच दुसरी बैठक १७ जुलै रोजी रेवाडी येथेही होत आहे.

हेही वाचा : ना किमान समान कार्यक्रम ना समन्वयक! आताची एनडीए वाजपेयींच्या काळापेक्षा वेगळी कशी?

राज्यातील जातीय समीकरणे आपल्या बाजूने वळविण्यासाठीच भाजपाने मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करीत सैनी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. त्यानंतर ब्राह्मण जातीचे प्रतिनिधित्व करणारे मोहन लाल बडोली यांना भाजपाचे राज्य प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. मूळचे पंजाबी असलेल्या मनोहर लाल खट्टर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. दिपेंदर हुडा यांनी रोहतकमधून लोकसभेची निवडणूक जिंकल्याने त्यांची राज्यसभेतील जागा रिकामी झाली आहे. जुलै अथवा ऑगस्टमध्ये या जागेसाठी निवडणूक होणार असून, त्याची तयारी भाजपाने आतापासूनच सुरू केली आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाकडून बंतो कटारिया यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. कारण- त्यांना अंबाला लोकसभा मतदारंसघामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. याआधी एप्रिल महिन्यामध्ये भाजपाने जाट समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुभाष बराला यांना राज्यसभेवर पाठविले आहे. दुसऱ्या बाजूला हरियाणातील काँग्रेसनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. ११ जुलै रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उदय भान व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते भूपिंदर सिंह हुडा यांनी पक्षाची निवडणूक प्रचारासाठीची रणनीती काय असेल, याची माहिती दिली. त्यांच्याबरोबर बिरेंदर सिंहदेखील होते. तब्बल १० वर्षांनंतर ते भाजपामधून पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्याबरोबरच या बैठकीमध्ये अनेक खासदार आणि आमदारही होते. काँग्रेस पक्षाकडून हरियाणातील सर्व ९० मतदारसंघांमध्ये रथयात्रा आणि पदयात्रा काढल्या जाणार आहेत, अशी माहिती पक्षाने दिली. “दररोज किमान दोन मतदारसंघांमध्ये जाणे, हे आमचे उद्दिष्ट असेल,” असे उदय भान म्हणाले. काँग्रेसच्या कुमारी सेलजा यांनी नुकताच सिरसा मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे. भूपिंदर सिंह हुडा आणि कुमारी सेलजा यांच्यामधील धुसफूस याआधीही चव्हाट्यावर आली होती. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र पदयात्रेची घोषणा केली आहे. त्या हरियाणाच्या शहरी मतदारसंघातून नजीकच्या कालावधीत पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघांत भाजपा काँग्रेसपेक्षा आघाडीवर राहिली आहे. त्यामुळेच त्यांनी या मतदारसंघांची निवड केली आहे.

हेही वाचा : पुन्हा काय झाडी, काय डोंगर? महाराष्ट्रात ‘हॉटेल पॉलिटिक्स’ परतण्यामागे काय आहे कारण?

दुसऱ्या बाजूला हुडा यांच्या आणखी एक प्रतिस्पर्धी असलेल्या किरण चौधरी यांनी काँग्रेस पक्षाला राम राम केला आहे. किरण चौधरी या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर राहिलेल्या आमदार आहेत. तोशाम मतदारसंघाच्या आमदार असलेल्या किरण चौधरी यांनी आपल्या कन्या श्रुती चौधरी यांच्यासमवेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या बाजूला इंडियन नॅशनल लोक दल हा हरियाणातील प्रादेशिक पक्षही सध्या चर्चेत आहे. या पक्षाने बहुजन समाज पार्टीसमवेत युती केली आहे. त्यांनी राज्यातील जनतेला तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला असून, अभय चौटाला यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे. अभय चौटाला सध्या संपूर्ण हरियाणाचा दौरा करून, आपल्या पक्षासाठी पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या हरियाणा विधानसभेमध्ये इंडियन नॅशनल लोक दलाचे ते एकमेव आमदार आहेत. बहुजन समाज पार्टीचा एकही आमदार हरियाणाच्या विधानसभेमध्ये नाही. भाजपापासून वेगळे झाल्यानंतर जननायक जनता पक्ष (जेजेपी) नेते व माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि त्यांचे वडील व पक्षप्रमुख अजय चौटाला असा दावा करीत आहेत की, भाजपासोबतची युती त्यांना महागात पडली आहे. मात्र, भाजपापासून फारकत घेतल्यानंतर जननायक जनता पार्टीच्या अनेक आमदारांनी पक्षाला राम राम केला असून, त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यानंतर या पक्षाने जिल्हा स्तरावरील सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आणि विधानसभा निवडणुकीआधी नव्याने पक्षसंघटना बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या हा पक्ष काँग्रेसबरोबर युती करण्याच्या विचारात असून, त्या संदर्भातील हालचाली सुरू आहेत. मात्र, हा पक्ष पुन्हा भाजपाबरोबर जाण्याच्या शक्यता फारच कमी आहेत. हरियाणामध्ये भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांव्यतिरिक्त प्रादेशिक पक्षांचेही प्राबल्य अधिक आहे. इंडियन नॅशनल लोक दल आणि जननायक जनता पार्टीसारखे पक्ष आधीपासूनच अस्तित्वात असताना आम आदमी पार्टीला आपला विस्तार हरियाणामध्ये करता येणे फारच कठीण आहे. राज्यातील काँग्रेसने आधीच स्पष्ट केले आहे की, लोकसभा निवडणुकीमध्ये आपबरोबर युती केलेली असली तरीही विधानसभा निवडणुकीमध्ये युती होणे अशक्य आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये हरियाणामध्ये आम आदमी पार्टीला एक जागा मिळाली होती; मात्र, या जागेवर पक्षाचा पराभव झाला. हरियाणामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा पुन्हा सत्तेवर आली होती. त्यावेळी भाजपाने जननायक जनता पार्टीबरोबर युती केली होती. आता ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपाची धडपड सुरू आहे.