Haryana Municipal Election 2025 Results : हरियाणातल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाची सरशी झाली आहे. या निवडणुकांमध्ये भाजपाने ९ ठिकाणी विजय मिळवला आहे. जिंकल्या आहेत. कुरुक्षेत्र, करनाल, फरिदाबाद, गुरुग्राम या ठिकाणच्या निवडणुकीत भाजपाने भगवा फडकवला आहे. सात महापालिकांसाठी महापौर आणि प्रभाग सदस्य, चार नगर परिषदा आणि २१ पंचायत समितींसाठी अध्यक्ष तसंच सदस्य निवडीसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. सोहना, असंध आणि इस्माइलबाद या तीन ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक पार पडली.
नेमकं काय घडलं?
लोकसभा निवडणुकीत भाजपाला अनेक जागा जिंकता आल्या नाही. ४०० पारचा नारा तर घोषणेपुरताच मर्यादित राहिला. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान झाले. मात्र एक प्रकारचं नैराश्य भाजपात आलं होतं कारण भाजपाला २३८ जागाच एकट्याच्या बळावर जिंकता आल्या. इंडिया आघाडीने त्यांना चांगली टक्कर दिली. हे नैराश्य झटकण्याचं काम हरियाणा विधानसभा निवडणूक निकालाने २०२४ मध्ये केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातही भाजपासह महायुतीला २३७ जागांचं रेकॉर्डब्रेक बहुमत मिळालं. आता हरियाणाच्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाची सरशी झाली आहे. भाजपाच्या विजयाची त्सुनामी या ठिकाणी पुन्हा पाहण्यास मिळाली आहे.
नगर परिषद, महापौर पदाची निवडणूक यातही भाजपाची सरशी
हरियाणील महापालिका, नगरपालिका या निकालांमध्ये गुरुग्राम, करनाल, सिरसा या जिल्ह्यांचा समावेश आहे. हरियाणातील या निकालांमुळे विरोधी पक्षांचा सुपडा साफ झाला आहे अशी प्रतिक्रिया अनिल विज यांनी दिली आहे. काँग्रेसची आमदार आणि माजी रेसलर विनेश फोगाटच्या जुलाना या महापालिकेतही भाजपाचा विजय झाला आहे. फरिदाबाद येथील महापौर निवडणुकीत भाजपाच्या प्रवीण पत्रा जोशी यांनी ३ लाख १६ हजार ८५२ मतं मिळवली आहेत आणि नवा विक्रम स्थापन केला आहे. हा विक्रम आधी भाजपाच्या उमेदवार सुनीता दयाळ यांच्या नावे होता. त्यांना २ लाख ८७ हजार मतं मिळाली होती.
अंबाला कँटमध्येही भाजपाचा डंका
छावणी नगरपरिषद निवडणुकीत ३२ पैकी ३५ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. अंबाला छावणी येथील जनतेने मला निकालांच्या रुपाने बक्षीसच दिलं आहे असं अनिल विज यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा पराभवच आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या या निवडणुकांमध्ये भाजपाची सरशी झाली आहे. २ मार्चला या विविध जागांसाठीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आज त्यांचे निकाल समोर आले.
भाजपाचा डंका वाजणार हे जवळपास निश्चित होतं
हरियाणातील विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत भाजपाचाच डंका वाजणार हे निश्चितच मानलं जात होतं त्याचप्रमाणे घडलं आहे. महापालिकेसाठीच्या महापौर पदांच्या १० पैकी ९ निवडणुकांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री नायब सैनी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या निवडणुकांसाठी मेहनत घेतली होती. त्यांनी प्रचारसभा आणि रोड शो केले होते. तर काँग्रेसकडून सचिन पायलट आणि माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा प्रचारात उतरले होते. मात्र या सगळ्या निवडणुका काँग्रेसला जड गेल्या आहेत हेच निकाल सांगत आहेत. हरियाणातल्या अनेक शहरांमध्ये २ तारखेला मतदान पार पडलं. तर पानिपत या ठिकाणी ९ मार्चला मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानाची टक्केवारी ४१ टक्के इतकीच होती. मतदान कमी झालं त्याचा फायदा भाजपाला झाला अशी चर्चा आता रंगली आहे.