विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामना खेळता आला नाही. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. पण, ५० किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशचे १०० ग्रॅम वजन अधिक भरले आणि त्यामुळे तिला सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर हताश झालेल्या विनेशनेही कुस्ती खेळप्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली. तिला अंतिम सामन्यात खेळता न आल्याचे दु:ख संपूर्ण भारताला झाले. तिच्या हरियाणा राज्यामधील राजकीय पक्षदेखील तिला पाठिंबा देण्यासाठी तिच्यामागे एकवटले आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.

हेही वाचा : पश्चिम बंगालवर सहा दशके राज्य करणाऱ्या डाव्यांचा शेवटचा नेता हरपला; अशी होती बुद्धदेव भट्टाचार्य यांची कारकीर्द

illegal migration in parts of Jharkhand
Bangladeshis marrying Jharkhand tribal women: बांगलादेशी नागरिक झारखंडच्या आदिवासी महिलांशी लग्न करतायत? भाजपाच्या दाव्याला केंद्रीय गृहखात्याची चपराक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
jammu and kashmir polls 2024 bjp likely to get major seats in jammu
Jammu And Kashmir Assembly Polls: …तरीही जम्मूमध्ये मते भाजपलाच!
CM bhagwant mann AAP Punjab
Punjab AAP: मोफत देण्याच्या घोषणा ‘आप’च्या अंगलट; पंजाबमध्ये विजेवरील अनुदान रद्द, इंधनावरही कर
Vinesh Phogat and Bajrang Punia in Congress
Vinesh Phogat : विनेश फोगट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात, कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात
Vadodara Politics Gujarat Floods
Vadodara Politics : भाजपाला वडोदरामध्ये लोकांच्या रोषाचा सामना का करावा लागतोय? जनतेच्या संतापाचं कारण काय?
west bengal bandh violence
West Bengal : पश्चिम बंगालमधील ‘बंद’ला हिंसक वळण; तृणमूल-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, गोळीबार झाल्याचाही दावा, नेमकं काय घडतंय?
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत

गुरुवारी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी जाहीर केले की, विनेश फोगाटलाही कास्यपदक विजेत्यांच्या बरोबरीनेच सन्मानित केले जाईल आणि भारतात परतल्यावर तिचे भव्य स्वागत केले जाईल. नायब सिंह सैनी यांनी आपल्या ‘एक्स’वर लिहिले, “हरियाणाची धाडसी कन्या विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करून अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. ती अंतिम सामन्यात खेळू शकली नसली तरीही ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियनच आहे. पदकविजेत्याचा जसा सन्मान केला जातो, तसाच तिचाही सत्कार केला जाईल, असा आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे. हरियाणा सरकार तिला कास्यपदक विजेत्याच्या बरोबरीनेच सन्मानित करील. सरकार कास्यपदक विजेत्याला जे पुरस्कार आणि सुविधा देते, तेच विनेश फोगाट यांना कृतज्ञतापूर्वक दिले जाईल. विनेश, आम्हाला तुझा अभिमान आहे.”

सरकारच्या क्रीडा धोरणानुसार, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्यांना सहा कोटी रुपये, रौप्यपदक जिंकणाऱ्यांना चार कोटी रुपये, तर कास्यपदक जिंकणाऱ्यांना अडीच कोटी रुपये दिले जातात. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा म्हणाले की, सरकारने विनेशचा सुवर्णपदक विजेत्याच्या बरोबरीने सन्मान केला पाहिजे आणि त्यानुसारच तिला बक्षीस दिले पाहिजे. हुड्डा म्हणाले, “तिचे मनोबल वाढवले ​​पाहिजे. लवकरच राज्यसभेची निवडणूक येणार आहे. जर आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असते, तर आम्ही नक्कीच तिला राज्यसभेवर पाठवले असते. ती आमची चॅम्पियन आहे.” हुड्डा यांचे सुपुत्र व लोकसभेचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांनीही म्हटले की, विनेशला राज्यसभेवर पाठवले पाहिजे. “ती पराभूत नाही, तर ती जिंकली आहे. तिने लोकांची मने जिंकली आहेत. ती तरुणांसाठीची प्रेरणा आहे. हरियाणातील राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. निवडणुकीची सूचनाही आली आहे. हुड्डासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे तिला राज्यसभेवर नियुक्त केले पाहिजे. हरियाणातील सर्व राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर विचार करावा, अशी विनंती करतो.”

दीपेंद्र हुड्डा लोकसभेवर निवडून गेल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. सध्या विधानसभेचे संख्याबळ ९० वरून ८७ वर आले आहे. प्रत्येक पक्षाचे संख्याबळ पाहता, भाजपाकडे ४१, काँग्रेसकडे २९, जननायक जनता पार्टीकडे १०, अपक्ष ५ आणि इंडियन नॅशनल लोक दल व हरियाणा लोकहित पार्टी यांचा प्रत्येकी एक आमदार आहे. त्यामुळे राज्यसभेवर भाजपाचा उमेदवारच नियुक्त होण्याची अधिक शक्यता आहे. मात्र, विनेशचे काका व कुस्तीपटू महावीर फोगाट यांनी भूपिंदर सिंग हुड्डा यांचे विधान राजकीय स्टंट असल्याचे म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलताना म्हटले, “आज भूपिंदर सिंग हुड्डा म्हणाले की, त्यांनी विनेशला शक्य असल्यास राज्यसभेवर पाठवले असते. त्यांचे सरकार सत्तेवर असताना त्यांनी गीता फोगाटला का पाठवले नाही?” गीता फोगाट ही महावीर फोगाट यांची कन्या असून, त्यांच्यावर ‘दंगल’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खानने महावीर फोगाट यांची भूमिका केली होती. गीता फोगाट ही विनेशची चुलतबहीण आहे. “गीताने अनेक विक्रम रचले. जेव्हा हुड्डा यांचे सरकार सत्तेत होते, तेव्हा त्यांनी गीताला पोलीस उपअधीक्षकही बनवले नाही. मग ते आता असा दावा कसा करू शकतात?”

हेही वाचा : सत्तेचा निर्णय महिलांच्या हाती! जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

आयएनएलडीचे एलेनाबादचे आमदार अभय चौटाला यांनीही सांगितले की, त्यांचा पक्ष येत्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्तेवर आल्यावर विनेशचा सन्मान करील. “आयएनएलडी आणि बसपा यांचे युती सरकार २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर येईल तेव्हा आम्ही विनेश फोगाटला सात कोटी रुपयांचे बक्षीस, तसेच कुस्तीचे प्रशिक्षण देणारी अकादमी उभी करण्यासाठी जागाही देऊ,” असे ते म्हणाले. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही फोगाट प्रकरणामध्ये भूमिका घेतली आहे. सध्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेदेखील राज्यामध्ये सातत्याने दौरे करीत आहेत. विनेशच्या अपात्रतेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी (७ ऑगस्ट) चरखी दादरी या तिच्या गावाला भेट देणारे ते पहिले राजकीय नेते होते. विनेशच्या अपात्रतेमागे षडयंत्र असल्याचा आरोप करीत मान यांनी भाजपावर टीका केली होती. तसेच या प्रकरणामध्ये सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली होती. भाजपाचे ब्रिजभूषण शरण सिंग हे कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख होते. त्यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करीत मोठे आंदोलन केले होते. विनेश या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होती. तिला अद्यापही न्याय मिळालेला नाही, हा मुद्दा काँग्रेस पक्षाकडून लावून धरला जात आहे. सत्ताधारी भाजपाच्या विरोधात काँग्रेस याच मुद्द्यावरून रान पेटवण्याच्या प्रयत्नात आहे.