नागपूर: यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची आणि तेवढीच आगळी वेगळी ठरण्याची शक्यता आहे. दोन प्रमुख पक्षांमधील फूट आणि भिन्न विचारसरणीच्या पक्षांची युती यांमधील ही लढत चुरशीची होणार आहे. या निवडणुकीला हरियाणात झालेल्या विधानसभा सभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. तेथील निवडणुकीत सरकार विरोधी मतांचे विभाजन हा प्रमुख घटक सत्ताधारी भाजपला विजयी करण्यास कारणीभूत ठरला होता. त्यामुळे राज्यात सुध्दा हा पॅटर्न लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचे प्रत्यंतर विदर्भात पहिल्या दिवशी विक्री झालेल्या उमेदवारी अर्जांच्या संख्येत दिसून येत आहे. एकूण ६२ जागांसाठी तब्बल २०३४ अर्ज विकल्या गेले. अजून पाच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे ही संख्या दहा हजारावर जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात आणि विदर्भात महायुती विरूद्ध वातावरण आहे. भाजपने दोन प्रमुख पक्षात फूट पाडल्याने या पक्षाविरुद्ध व त्यांच्या नेत्यांविरोधात संताप अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा सर्व शक्ती पणाला लावून,मोदींचे ब्रॅण्ड वापरून सुध्दा पराभव झाला होता. अशीच स्थिती हरियाणा राज्यात तेथील भाजप सरकारच्या विरोधात होती. तेथील सरकारने सरकार विरोधी मतांचे विभाजन करण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभे करण्याचा प्रयत्न केला. ही खेळी यशस्वी ठरली आणि जनमत विरोधात असूनही तेथील भाजप सरकारला पुन्हा सत्ता स्थापन करता आली. याला हरियाणा पॅटर्न म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात भाजप ही खेळी खेळेल,अशी चर्चा आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी गेलेल्या अर्जाची संख्या ही हरियाणा पॅटर्नचे संकेत देणारी आहे.

हेही वाचा : घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष

एकाच दिवशी २ हजार अर्ज

विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहे. पहिल्या दिवशी २०३४ अर्जांची उचल झाली. नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी सरासरी २०० ते ४०० अर्ज गेले. नागपूर जिल्ह्यात इच्छुकांकडून ४६२ अर्जांची उचल करण्यात आली. काटोल विधानसभा मतदारसंघात २८ अर्ज, सावनेर विधानसभा मतदारसंघात १८ अर्ज, हिंगणा विधानसभा मतदारसंघात २४ अर्ज, उमरेड विधानसभा मतदारसंघात ३५ अर्ज, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात ४१ अर्ज, नागपूर दक्षिण ३८, नागपूर पूर्व विधानसभा ४७, नागपूर मध्य ९९, नागपूर पश्चिम ३३, नागपूर उत्तर ५२, कामठी विधानसभा २९, रामटेक १८ अर्ज असे एकूण बारा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून ४६२ अर्जांची उचल करण्यात आली आहे. सर्वात जास्त अर्ज उमरेड मतदारसंघांतून (९९) गेले आहे .

हेही वाचा : भाजपाच्या ८० आमदारांना पुन्हा तिकीट; उमेदवारी देताना भाजपाने यावेळी अधिक खबरदारी का घेतली?

u

काँग्रेस, सेना ( ठाकरे)यादीची प्रतीक्षा

आतापर्यंत फक्त भारतीय जनता पक्षाची निम्मी यादी जाहीर झाली. त्यात विदर्भातील २३ जागांचा समावेश आहे, अजून तेवढ्याच जागांची घोषणा व्हायची आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवारांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे) पक्षाच्या यादी कडे आहे. ती जहीर झाल्यावर अर्ज खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.