लोकसभा निवडणूक निकालात भाजपाला ( BJP ) मोठा धक्का दिला तो विरोधकांच्या इंडिया आघाडीने. इंडिया आघाडी विखुरली आहे असं चित्र नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या नेत्यांनी निर्माण केलं होतं. अशात इंडिया आघाडीने काँटे की टक्कर दिली. आता एक नवा प्रश्न निर्माण होतो आहे तो म्हणजे भाजपा ( BJP ) वृद्धांचा पक्ष होतो आहे का?
वयाची चर्चा का सुरु झाली आहे?
यावेळी भाजपा ( BJP ) एनडीएसह सत्तेत आली आहे. मात्र त्यांना स्वबळावर बहुमताची संख्या गाठता आलेली नाही. ४०० पारचा नारा देऊनही काही उपयोग झालेला नाही. तसंच तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतरही भाजपाने मंत्रिमंडळ हे बऱ्यापैकी आधीसारखंच ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (वय ७३), अमित शाह (वय ५९) यांच्याकडे गृह खातं आणि इतर खात्यांचा कार्यभार आहे, राजनाथ सिंह (वय ७३), नितीन गडकरी (वय ६७), निर्मला सीतारमण (वय ६४) आणि एस जयशंकर (वय ६९) अशा वयाचे हे सगळे मंत्री आहेत. अशात विरोधी पक्षात वेगळं चित्र दिसून येतं आहे. यामुळे या वयांची चर्चा सुरु झाली आहे.
विरोधी पक्षांचे खासदार भाजपाच्या तुलनेत तरुण
राहुल गांधी (वय ५४) राहुल गांधी ५४ वर्षांचे असले तरीही त्यांचं दिसणं तरुण आहे. सपाचे खासदार अखिलेश यादव (वय ५१), अभिषेक बॅनर्जी (वय ३६), महुआ मोईत्रा (वय ४९) सुप्रिया सुळे (वय ५५) असे सत्ताधाऱ्यांपेक्षा तरुण असलेले चेहरे विरोधी पक्षात आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा वारसा चालवणारे आदित्य ठाकरे हे ३४ वर्षांचे आहेत. राहुल गांधींबरोबर जे खासदार आहेत त्यापैकी गौरव गोगोई (वय ४१), दीपेंदर हुडा (वय ४६), वर्षा गायकवाड (वय-४९), प्रणिती शिंदे (वय ४३), कार्ती चिदंबरम (वय ५२) अशी तरुण खासदारांची फळी आहे. भाजपा आणि त्यांच्या विरोधी पक्षात असलेल्या खासदारांची तुलना केली तर विरोधी पक्षांचे खासदार हे भाजपाच्या तुलनेत ‘तरुण’ आहेत.
काही वर्षांपूर्वी भाजपातही ( BJP ) तरुणांची फळी होती जसे की अनुराग ठाकूर, स्मृती इराणी यांना संधी देण्यात आली होती. मात्र यावेळी स्मृती इराणी निवडणूक हरल्या. पूनम महाजन यांना तिकिट देण्यात आलं नाही. सध्या भाजपाच्या तरुण खासदारांमध्ये बांसुरी स्वराज यांचा उल्लेख करावा लागेल. त्या भाजपातला तरुण चेहरा म्हणून उदयाला येतील.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने काय सांगितलं?
भाजपाच्या ( BJP ) वरिष्ठ नेत्याने असं मत व्यक्त केलं आहे की अनेकदा मंत्रिपदं देताना ५० किंवा त्यावरच्या वयात असलेल्या खासदारांचा विचार होतो. अश्विनी वैष्णव ५४ वर्षांचे आहेत. धर्मेंद्र प्रधान हे ५५ वर्षांचे आहेत. काँग्रेसकडे तरुण चेहरे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न होतो मात्र काँग्रेसमधलं दहा वर्षांपूर्वीचं नेतृत्व किंवा तसे चेहरेही आता दिसत नाहीत. असा दावा या वरिष्ठ नेत्याने केला. भाजपाकडे नेत्यांची कमतरता नाही. मात्र सद्यस्थितीत अनुभवी लोकांना जबाबदारी देण्यावर आम्ही भर दिला असंही या नेत्याने सांगितलं. भाजपाच्या मित्र पक्षांमध्येही तरुण लोक आहेत. टीडीपीचे नारा लोकेश, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, आरएलडीचे जयंत चौधरी, एलजेपीचे चिराग पासवान ही नाव घेता येतील. असं या नेत्याने म्हटलं आहे.
‘एज फॅक्टर’ भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याला मान्य
अशात इंडियन एक्स्प्रेसशी चर्चा करताना आणखी एका भाजपा ( BJP ) नेत्याने मान्य केलं की भाजपात ( BJP ) वयाचा मुद्दा आहे. कारण विरोधी पक्षांना आता तरुण नेतृत्वामुळे धार आली आहे. भाजपा नेते अनेकदा पारंपरिक मूल्यं पाळत आहेत. याऊलट काँग्रेसकडून सोशल मीडियाचा वापर चांगल्या प्रकारे होतो आहे. भाजपाचे तरुण नेते सोशल मीडियावर म्हणावं तेवढे सक्रिय नाही हे मान्य करावं लागेल. तसंच या वरिष्ठ नेत्याने असंही सांगितलं की भाजपासारखा पक्ष हा जुन्या आणि नव्या विचारधारेचा पक्ष असणार आहे. घराणेशाही सांभाळणारे जे पक्ष आहे त्याचप्रमाणे हे स्वरुप आहे. भाजपाच्या उभारणीसाठीही अनेकांनी मेहनत घेतली आहे. मात्र आता जे मिश्र विचारधारा आहे ती तरुणांपर्यंत नेणं काहीसं आव्हानात्मक आहे. मात्र आम्ही तरुणांना संधी देतो.
लालकृष्ण आडवाणी यांनी अरुण जेटली, प्रमोद महाजन यांना पुढचा वारसा दिला होता. आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा आहेत, किशन रेड्डी आहेत. तर तामिळनाडू अन्नामलाई आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व भाजपाने आणलं असही या वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केलं.