कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेले दशकभर एकत्रित राजकारण करणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या आहेत. याचे राजकीय, सहकार, निवडणुका यावर परिणाम संभवत असून ते कशाप्रकारे राहणार यावर तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. राजकीय पातळीवर हा निर्णायक टप्पा मानला जात आहे.
राज्यातील राजकारणाचे पडसाद म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत चालली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोट्यातून मंत्रिपद मिळवले. पाठोपाठ मुश्रीफ यांनी नव्या सत्ताधाऱ्यांना जागत आपला इरादा व्यक्त केला. त्यांनी थेट ‘सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत यावे; तरच त्यांच्याशी मैत्री राहील,’ अशी शब्दफेक करीत टाळीसाठी हात पुढे केला. काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील यांनी ‘मुश्रीफ यांनी सोबत येण्याचे आवाहन केले असले तरी मी महायुतीसोबत जाणे शक्य नाही,’ असा उल्लेख करीत मुश्रीफ यांच्या टाळीस प्रतिसाद देण्याचे टाळले आहे. यातून या दोन प्रमुख नेत्यांच्या राजकीय वाटा वेगळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचे पडसाद आगामी काळात कसे उमटणार याची चर्चा आहे.
हेही वाचा – पश्चिम बंगाल, राजस्थान ते दिल्ली! मणिपूरच्या घटनेवरून सत्ताधारी-विरोधकांत घमासान!
समविचारी प्रवास
कोल्हापूरचे राजकारण गेले दशकभर हसन मुश्रीफ – सतेज पाटील यांच्या समविचारी नेत्यांभोवती फिरत राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडी सत्ताकाळात दोघेही मंत्री होते. मुश्रीफ हे कामगार, ग्रामविकास मंत्री होते. सतेज पाटील गृह राज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री राहिले. या दोन नेत्यांचा प्रवास एकमताने सुरू झाला. त्याला जिल्ह्यातील वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये एकत्र राहण्याची अपरिहार्यताही कारणीभूत ठरली. या निवडणुकात सतेज पाटील यांचा प्रामुख्याने राजकीय संघर्ष होता तो महाडिक परिवाराशी. गोकुळ दूध संघाच्या आधीच्या निवडणुकीमध्ये महाडिक यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा पाटील यांचा प्रयत्न अपयशी ठरला. कारण तेव्हा मुश्रीफ हे महाडिक यांच्या बाजूने होते. गेल्या निवडणुकीमध्ये या दोघांनी एकत्रित येऊन जिल्ह्यातील अन्य नेत्यांना सोबत घेऊन गोकुळवर झेंडा रोवला. पुढे कोल्हापूर महानगरपालिका, बाजार समिती, जिल्हा बँक अशा महत्त्वाच्या ठिकाणीही या जोडगोळीने यशाची पुनरावृत्ती केली. दोघे बरोबरीने जात असताना काही वेळा अंतर्गत कुरबुरी दिसून आल्या. पाटील हे राज्यमंत्री असताना दोन्हीवेळा त्यांना पालकमंत्रीपद मिळते आणि वरिष्ठ मंत्री असताना ते मिळू शकत नाही ही सल तेव्हा मुश्रीफ समर्थक बोलून दाखवत असत.
मैत्रीमध्ये अंतर
या दोघांचा राजकारणातील प्रभाव लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. तो अधिक ठळक होत चालला असताना मुश्रीफ यांनी वेगळी राजकीय वाट पकडल्याने दोघांमधील मैत्रीमध्ये अंतर आले आहे. साहजिकच त्याचे राजकीय परिणाम उमटण्याची शक्यता आहे. नव्या सत्ताधाऱ्यांची सोबत केली असल्याने त्यांच्यासमवेत लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मुश्रीफ यांना लढवणे अपरिहार्य ठरले आहे. जोडीलाच सहकारी संस्थांमध्येही बदल व्हावा अशी अपेक्षाही केली जात आहे. ती प्रत्यक्षात येणार का याबाबत मतांतरे आहेत.
हेही वाचा – बदलत्या राजकीय समीकरणांमुळे रायगड जिल्ह्यातील खासदार-आमदार सारेच सत्ताधारी गटात
समझोता एक्स्प्रेसचे भवितव्य
सहकारी संस्थांच्या निवडणुका या गटातटातून लढवल्या जातात. गोकुळच्या निवडणुकीमध्ये महाडिक यांना शह देण्यासाठी सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे यांच्यासह युतीतील प्रमुख नेते पक्षीय बंधने विसरून एकत्र आले होते. जिल्हा बँक, बाजार समिती येथे हीच परिस्थिती राहिली. हे समीकरण पाहता सहकारात समझोता एक्स्प्रेस पूर्वीसारखीच धावणार का याचे कुतूहल आहे. मुश्रीफ महायुतीमध्ये गेले असल्याने सतेज पाटील यांना एक महत्त्वाची साथ गमवावी लागली आहे. जिल्ह्यात त्यांच्याशिवाय काँग्रेसचा प्रभावी नेता नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद पूर्वीच्या राष्ट्रवादी इतकी राहिलेली नाही. ठाकरे सेनेकडून प्रतिसाद कसा मिळणार याचा पुरता अंदाज आलेला नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या नात्याने बांधणी करत असताना आमदार पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात आपला गट निर्माण करून जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य निवडून आणताना विविध सहकारी संस्थांमध्ये संचालक म्हणून अनेकांना संधी दिली आहे. ही त्यांची जमेची बाब असली तरी जिल्ह्याचे नेतृत्व करताना ती पुरेशी ठरणार नाही. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा कल महत्त्वाचा असणार आहे. महापालिकेच्या राजकारणात आजवर दोन्ही काँग्रेसचे राजकारण एकजिनसी राहिले होते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला नव्या विचारधारेतून जावे लागणार आहे. हे सर्व समजून घेणे त्यांच्या दृष्टीनेही आव्हानात्मक असणार आहे.