Premium

धैर्यशील माने – राजू शेट्टी दोघांचाही बदलता राजकीय प्रवास

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी नेते राजू शेट्टी हे पुन्हा एकदा परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.

Hatkanangale Lok Sabha
धैर्यशील माने – राजू शेट्टी दोघांचाही बदलता राजकीय प्रवास (image credit – Dhairyasheel Mane/Raju Shetti/fb/loksatta graphics)

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी नेते राजू शेट्टी हे पुन्हा एकदा परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. नवा सामना करत असताना दोघेही मागील निवडणुकीपेक्षा यावेळी वेगळा पक्ष, नेतृत्व, झेंडा घेऊन रिंगणात उतरले आहेत. दोन्ही घराण्यांचा इतिहास पाहता त्यांचा हा बदलत गेलेला यावेळचा सहावा झेंडा आहे. या दोघांना प्रबळ आव्हान देणारे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या घराण्याने दोनदाच झेंडे बदलले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हातकणंगले मतदारसंघातील खासदारांची यादी तपासली तर त्यामध्ये मुख्यत्वेकरून माने घराण्यांचेच वर्चस्व राहिले आहे. त्यांच्या घरात आठ वेळा खासदारकी आली आहे. काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोनदा खासदारकी भूषवली आहे. आता माने – शेट्टी यांच्यात मुकाबला होत असताना दोन्ही घराण्यांतील बदलत गेलेले झेंडे हा मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा – भाजपा मंत्र्याच्या मुलाची जोडप्याला मारहाण; मध्य प्रदेशमध्ये पक्ष का आलाय अडचणीत?

तीन पिढ्या

काँग्रेसचे खासदार दत्ताजीराव कदम यांनी बाळासाहेब माने यांना संधी दिली. पुढे सलग पाच वेळा बाळासाहेब माने हे काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या स्नुषा निवेदिता माने यांनी तीन वेळा लढत दिली. पहिल्यांदा त्या अपक्ष म्हणून तर दुसऱ्यांदा शिवसेनेच्या उमेदवार म्हणून लढत असताना काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याकडून पराभूत झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी हातावर घड्याळ बांधून आवाडे यांच्यावर मात केली. मागील निवडणुकीवेळी निवेदिता माने व त्यांचे सुपुत्र धैर्यशील माने यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून मातोश्रीवर शिवबंधन बांधले. या पक्षाकडून धैर्यशील माने हे पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर धैर्यशील माने हे त्यांच्या छावणीत पोहोचले आहेत. शिंदे सेनेचे धनुष्यबाण घेऊन ते निवडणुकीत उतरले आहेत. काँग्रेसपासून सुरू झालेला माने घराण्याचा इतिहास आता शिंदे सेनेच्या भगव्यापर्यंत पोहोचला आहे.

शेट्टींचे झेंडे बदलले

राजू शेट्टी यांनी शेतकरी चळवळीत झोकून दिले आहे. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दमदार कामगिरी केली. पुढे जोशी यांचे राजकारण जातीयवादी – धार्मिक भाजपशी निगडित असल्याचा मुद्दा उपस्थित करून राजू शेट्टी यांनी स्वतःच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा रोवला. या संघटनेमार्फत ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना ते स्वाभिमानी पक्षाकडूनच लढले, पण तेव्हाच्या डाव्या, जनता दल, रिपब्लिकन यांच्या रीडालोसच्या माध्यमातून निवडणूक लढवून त्यांनी जिंकली होती. दुसऱ्यावेळी शेट्टी यांनी भाजपशी हातमिळवणी केली. या युतीचा त्यांना दुसऱ्यांदा संसदेत जाण्यासाठी लाभ झाला. गेल्या लोकसभा निवडणुकीला ते काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीचे उमेदवार होते. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी शेट्टी यांनी मविआअंतर्गत शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळावा असा प्रयत्न केला होता. ठाकरे यांनी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातली होती. ही अट स्वीकारली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ वाऱ्यावर सोडून द्यावी लागेल, असा विचार करून शेट्टी यांनी हा प्रस्ताव नाकारला. परिणामी, यावेळी शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ असे म्हणत वाटचाल सुरू केली आहे.

हेही वाचा – घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी

सरुडकर यांचे आव्हान

धैर्यशील माने व राजू शेट्टी या आजी – माजी खासदारांना तगडे आव्हान देण्यास ठाकरे सेनेचे सत्यजित पाटील सरुडकर यांनी सुरुवात केली आहे. सरुडकर पाटील घराण्याने आतापर्यंत विधानसभेच्या आठ निवडणुका लढवल्या आहेत. त्यापैकी बाबासाहेब पाटील सरूडकर – सत्यजित पाटील या पितापुत्रांनी प्रत्येकी दोनदा असा चारदा विजय मिळवला आहे. तितक्याच वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे सरूडकार्ण्णा सलग दोनदा विजय मिळाला नाही. एक जय – एक पराजय असा समान आलेख राहिला. सह्याद्रीच्या खोऱ्यातील डोंगराळ शाहूवाडी मतदारसंघात उदयसिंगराव गायकवाड यांच्यानंतर १९८० साली बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवून पहिला विजय मिळवला होता. पुढच्या निवडणुकीत ते संजयसिंह गायकवाड यांच्याकडून पराभूत झाले. बाबासाहेब पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन नंतरच्या म्हणजे १९९० मध्ये विजयाची पुनरावृत्ती केली. त्यांचाच वारसा पुढे चालवत सत्यजित पाटील सरूडकर यांनी सेनेकडून २००४ व २०१४ या वर्षांमध्ये विजयाचा झेंडा रोवला. दहा वर्षांनंतर विजय मिळवण्याचा हाच क्रम ठेवत ते २०२४ मध्ये विजयाची परंपरा पुढे ठेवणार का, हे निकालातून दिसून येईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hatkanangale lok sabha the changing political journey of both dhairyasheel mane and raju shetty print politics news ssb

First published on: 05-04-2024 at 12:50 IST
Show comments